वऱ्हाडवृत्त डिजिटल
मोफत वीज, रयतू बंधू, रयतू विमा योजनांचा आधार
शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी अनेक राज्ये विविध योजना राबवत आहेत. महाराष्ट्र मात्र त्या तुलनेत मागे पडल्यामुळे शेतकऱ्यांपुढे समस्यांचे डोंगर उभे राहिले आहेत. त्या तुलनेत शेजारच्या तेलंगणातील शेतकरी सुखी झाला आहे.
अवघ्या आठ वर्षांपूर्वी, जून २०१४ मध्ये अस्तित्वात आलेल्या तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन २०१८मध्ये सरकारने रयतू बंधू योजना सुरू केली. प्रत्येक खरीप आणि रब्बी हंगामात राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला एकरी पाच हजार रुपयांची मदत या योजनेतून दिली जाऊ लागली. त्यामुळे दरवर्षी पेरणीसाठी बँका किंवा सावकाराकडे हात पसरण्याच्या फेऱ्यातून शेतकऱ्याची सुटका झाली आहे.खरीप आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला, शेतीची मशागत आणि पेरणीपूर्वी ही मदत धनादेशांद्वारे दिली जात असल्यामुळे ती मिळविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने बँक खाते उघडले आहे. लहान-मोठ्या, गरीब-श्रीमंत अशा सर्वच शेतकऱ्यांना ही मदत दिली जात असल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडतो. परंतु गरीब शेतकऱ्यांना यातून मोठा आधार मिळत आहे. दोन हंगामांचे एकरी पाच हजार रुपये मिळत असल्यामुळे दोन एकरांच्या शेतकऱ्याला वर्षाकाठी २० हजार रुपये मिळतात. याशिवाय केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात वर्षाकाठी ६ हजार रुपये जमा होत आहेत. डिसेंबर २०२१ पर्यंत या योजनेतून ६६.५६ लाख शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. आतापर्यंत सरकारने या योजनेतून ५० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.