वॉशिंग्टन : पृथ्वीवर एक अशी जागा आहे, ज्याला उपग्रहांचे स्मशान म्हणतात. अंतराळातील आयुष्य पूर्ण करणारे उपग्रह याच ठिकाणी नष्ट केले जातात. पॅसिफिक महासागरातील या पॉइंट निमो नावाच्या जागेला उपग्रहांचे स्मशान म्हणूनही ओळखले जात असून याठिकाणी १९७० पासून किमान तीनशे उपग्रह बुडवण्यात आले आहेत. अंतराळातून ३०३१ मध्ये निवृत्तीनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचाही याच ठिकाणी अंत्यविधी करण्याची म्हणजेच बुडवण्याची योजना आखण्यात आली आहे.
पॅसिफिक महासागरातील या पॉइंट निमो हे ठिकाण अतिशय दुर्गम असून या ठिकाणाहून पृथ्वीचा भूभाग सुमारे २,७०० किलोमीटर दूर आहे. या ठिकाणी लोकांना पोहोचण्यासाठी अनेक दिवस लागतात. या भागात केवळ काही लहान बेटे अस्तित्वात असून ज्यावर पक्ष्यांशिवाय कोणतेही प्राणी राहत नाहीत. त्याच ठिकाणी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस) चे दफन करण्याची योजना आखण्यात आली आहे. पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी वसलेले पॉइंट निमो हे उपग्रहांचे स्मशान अथवा कब्रस्तान म्हणून ओळखले जात असून जिथे कोणीही सहज पोहोचू शकत नाही. इस्टर बेटाच्या दक्षिणेला आणि अंटार्क्टिकाच्या उत्तरेला असलेले हे ठिकाण नजर पोहेचेपर्यंत समुद्राच्या पाण्याने वेढलेले आहे. या क्षेत्राची सरासरी खोली १३ हजार फूट म्हणजेच ४ हजार मीटरपेक्षा जास्त असून याठिकाणी मोठी जहाजेही क्षणार्धात गायब होऊ शकतात. त्यामुळेच याठिकाणी १९७० च्या दशकापासून कालावधी संपलेले सुमारे तीनशेहून अधिक उपग्रह आणि अंतराळ स्थानके नष्ट करण्यात आली आहेत. यात जगभरातील विविध देशांच्या उपग्रहांचा समावेश आहे. आता अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने याच पॉइंट निमोमध्ये त्यांचे मागील २५ वर्षांपासून अवकाशत कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (आयएसएस) देखील बुडवण्यात येणार असून त्याचा आकार ३५७ फूट (१०९ मीटर) उंच आणि वजन जवळपास ४२० मेट्रिक टन असलेले आयएसएस या ठिकाणी बुडवण्यात येणारे मोठे अंतराळ उपकरण असल्याचेही नासाने स्पष्ट केले आहे.