योगाचार्य भगवंतराव गावंडे, आसलगावकर यांनी आपला अमृतमहोत्सवी जन्मदिन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. त्यांनी आपल्या कुटुंबियांचा सत्कार करून त्यांचा गुणगौरव केला. या आगळ्यावेगळ्या अमृत महोत्सवी जन्मदिनी सोहळ्याला संत महात्म्यांचे आशीर्वाद लाभले. सोहळा आगळा वेगळा यासाठी की त्यांनी घरीच टेरेसवर साजरा केला. त्यांचे 14 जनांचे एकत्र कुटुंब हेही आजच्या काळात आदर्शच म्हणावे लागेल. भगवंतराव योगशास्त्र पदवीधर असून संस्कृतचे व्यासंगी आहेत.

‘संयोगी’ व्यक्तिमत्वाचे धनी
भगवंतराव हे संयोगी व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. सं- म्हणजे संस्कृत, यो- म्हणजे योग आणि गी- म्हणजे गीता अशा प्रकारे ते संयोगी व्यक्ती आहेत. त्यांचे संयोगी शिबिराचा कार्यक्रम श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघात संपन्न झाला असून अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ झाला. त्यांची जीवनशैली बदलली. योगाचार्य भगवंतराव गावंडे आसलगावकर हे माझे चार दशकांपासून परममित्र आहेत आम्ही दोघेही अकोला जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत होतो. आमचा स्नेहबंध आजही दृढ आहे.
लेकी सुनांचा सत्कार.
मी त्यांना ज्यावेळी लेकी सुनांच्या सत्कारा बद्दल विचारले तेव्हा त्यांनी आपल्या जोडीदाराचे आणि तीनही सुनांचे एकत्रित कुटुंबाच्या दृष्टीने योगदान कथन केले. त्यांनी आपल्या घरातील मातृशक्तीचा सत्कार हा सुप्रसिद्ध डॉ.अर्चना ढोणे, डॉ सुधीर ढोणे राज्य प्रवक्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आर.सी.सी च्या विभाग प्रमुख डॉ श्रृती मुकुंद यांच्या हस्ते चिन्मय मिशनचे अध्यक्ष आप्पासाहेब तिडके, नेपाळ निवासी चिन्मय मिशनचे संन्यासी श्रीमान भुवनजी, यांच्या प्रमुख उपस्थितीत केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतः भगवंतरावांनी केले.
वारसा सुसंस्कारांचा
त्यांच्या तीनही लेकीसुना ह्या सुशिक्षित असून त्या सुसंस्कारीत माहेरवासिनी आहेत. आदर्श संस्कारांची जपणूक होण्यासाठी त्यांचे घरामधील दूरदर्शन संच गेल्या दहा वर्षापासून बंद आहेत. कोणतीही सुनबाई दूरदर्शन सीरियल पाहण्याचा विषय काढत नाही. घरकामासाठी कुठल्याही मोलकरीण ताई नाही स्वतःची कामे स्वतः करून मुलाबाळांचे आरोग्य उत्तम ठेवतात
भगवंतरावांविषयी इतक्या आपुलकीने लिहिण्याचे कारण असे की आम्ही एकमेकांचे सुख दुःखात नेहमी सहभागी असतो. तसेच सामाजिक कार्यात माझे सहकारी म्हणून योगदान देत असतात. ते माझ्या शिर्ला (अंधारे) येथील श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे, तसेच अकोला जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती समितीचे, जगद्गुरु .. साहित्य परिषद जिल्हा अकोल्याचेही सदस्य आहेत .त्याच प्रमाणे ते सहकार भारती, संस्कृत भारती मध्ये कार्यरत आहेत. ते अस्खलित संस्कृत संभाषण करतात संस्कृत दिनाचे दिवशी लोक त्यांना निमंत्रित करतात. भगवंतराव कवी हृदयाचे आहेत त्यांचे प्रासंगिक लेखनही सातत्याने सुरू आहे. ते प्राथमिक शाळे पासूनच रा.स्व सेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांचा आदर्श इतर कुटुंबप्रमुखांनी सुद्धा घ्यावा यासाठी हा शब्दप्रपंच केला आहे.
नारायण अंधारे, अध्यक्ष, अकोला, जिल्हा ज्येष्ठ नागरिक, समन्वय समिती.