वर्गात फोटो लावण्याबाबत शासनाने केली भूमिका स्पष्ट
वऱ्हाडवृत्त डिजिटल
शाळांमध्ये वर्गात शिक्षकांनी आपला फोटो लावावा, या शासनाच्या आदेशाविरोधात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिक्षक संघटनांनी याला विरोध केला आहे. काही ठिकाणी आंदोलनेही केली आहेत. मात्र, या मागचे कारण आता शासनाने स्पष्ट केले असून, तोतया शिक्षकाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. असे असले तरी शिक्षकांची भूमिका मात्र अजूनही आक्रमकच आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये नियुक्त केलेल्या अधिकृत शिक्षकाऐवजी तोतया शिक्षकांनी शिकवण्याचे प्रकार रोखण्यासाठी नियुक्त शिक्षकाचे छायाचित्र प्रत्येक वर्गात लावण्याची नामी शक्कल शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने लढवली आहे.
जिल्हापरिषदशाळांमध्येशिकवणार्याशिक्षकांवर अतिरिक्त, अशैक्षणिक कामेही मोठ्या प्रमाणात लादली जातात. पण, त्याचबरोबर या शाळांमधील काही शिक्षकांबाबत कामचुकारपणाच्याही तक्रारी वारंवार येत असतात. या पैकी काही शिक्षकांची तर आपल्याऐवजी दुसरीच व्यक्ती संबंधित शाळेमध्ये अध्यापनासाठी बेकायदेशीरपणे नेमण्यापर्यंत मजल गेली असल्याचे मध्यंतरी उघडकीस आले. या तोतयेगिरीला आळा घालण्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाने ही उपाययोजना केली आहे.
या संदर्भात पाठवण्यात आलेल्या परिपत्रकानुसार ‘आपले गुरुजी’ या नावाने ‘ए -४’ आकाराचे छायाचित्र शाळेतील संबंधित वर्गामध्ये लावणे बंधनकारक असून तशी कार्यवाही झाल्याची खातरजमा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना समक्ष भेट देऊन करणे अपेक्षित आहे. तसेच त्याबाबतचा अहवाल शिक्षण खात्याला सादर करावयाचा आहे. काही जिल्ह्यांमधून शिक्षकांनी वर्गामध्ये फोटो लावून शासनाच्या आदेशाचे पालन केले आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात या आदेशाला संघटनांनी विरोध दर्शविला आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने आक्षेप घेत प्राथमिक शिक्षणाधिकार्यांना निवेदनही सादर केले आहे. तोतया शिक्षक कोणी ठेवत असतील तर संबंधित शिक्षकांना कायमचे घरी पाठवा आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करा, पण राज्यात आतापर्यंत कारवाईच झालेली नाही. या आदेशातून सर्वच शिक्षकांना बदनाम करणे योग्य नाही. शाळेत शिक्षकांचे छायाचित्र लावण्यासाठी सक्ती करू नये आणि त्यांना वेठीस धरण्यात येऊ नये, अशी मागणी असे निवेदनात केली आहे.