एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे सोशल मीडिया अकाऊंटचे बंद करावे लागणार आहे. देशात लवकरच याबद्दल आता नियमावली बनवली जाणार आहे. भारतात “डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट रूल- २०२५” मध्ये ही तरतूद करण्यात आली आहे. #Digital Personal Data Protection Act Rule-2025

या कायद्यातील तरतुदींनुसार व्यक्तीचा खासगी डेटा कसा प्रोसेस केला जावा आणि तो कसा स्टोअर केला जावा याबद्दलचे नियम करण्यात आलेले आहेत. नागरिकांची गोपनीयता आणि खासगीपणाचा अधिकार अबाधित राहावा, असा या कायद्याचा उद्देश आहे. तसेच जी व्यक्ती, कंपनी किंवा संस्था व्यक्तीचा डेटा प्रोसेस करते, त्याबद्दलाचे निर्णय घेत आणि हा डेटा स्टोअर करते त्यासाठी डेटा फिडुसिअरी अशी संज्ञा वापरण्यात आलेली आहे. तसेच हा नवा कायदा असे सांगतो की, डेटा फिडुसिअरींनी जर काही कायदेशीर बाबींच्या पूर्ततेबद्दलची गरज नसेल तर असा पर्सनल डेटा नष्ट केला पाहिजे. याचाच अर्थ असा की सोशल मीडिया कंपनी, ई-कॉमर्स आणि ऑनलाईन गेमिंग कंपन्यांनी जे अकाऊंट सक्रिय नाहीत ते पुढाकार घेऊन बंद करायचे आहेत, म्हणजे ज्या व्यक्तींचा नजिकच्या काळात मृत्यू झाला आहे, त्यांचे अकाऊंट बंद करावे लागणार आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटले आहे की कंपन्यांना या नियमांची पूर्तता करण्यासाठी २ वर्षांचा कालावधी मिळेल, यासंदर्भात चर्चा सुरू आहेत.
सोशल मीडिया कंपन्यांचे मृत व्यक्तींच्या अकाऊंटबद्दल वेगवेगळे नियम आहेत. नातेवाईकांनी जर विनंती केली तर मृत व्यक्तीचे अकाऊंट फेसबुक तसेच सुरू ठेवते. यासाठी फेसबुकला संबंधित नातेवाईकांनी अर्ज करावा लागतो. तर ट्विटरवर (एक्स) जी खाती सक्रिय नाहीत ती हटवली जातात. ट्विटरवर २०१६ मध्ये ६ महिन्यांपेक्षा दीर्घकाळ सक्रिय नसणारी खाती हटवण्यास सुरुवात झाली होती, यावरून मोठा वादही झाला होता. एलन मस्क यांनी ट्विटरवर ताबा घेतल्यानंतर त्याचे नाव एक्स असे केले आणि मे २०२३ पासून सक्रिय नसलेली खाती हटवायला सुरुवात केली.