मोबाईल आणि समाजमाध्यमांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तकाकडे वळवण्यासाठी एक-दोन दिवसाचे नव्हे तर संपूर्ण पंधरवड्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यांनी अजून अभ्यासक्रमबाह्य वाचनाच्या क्षेत्रात पहिले पाऊलही टाकलेले नाही, त्यांना पुस्तक वाचनाचा आनंद काय असतो, पुस्तक वाचन म्हणजे नेमके काय, हे कळण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमाचे अंतिम उद्दिष्ट हे वाचनसंस्कृती निर्मा व्हावी, वाढावी हा आहे. यामध्ये विशेष म्हणजे राज्यातील सर्व शासकीय ग्रंथालयांचाही सहभाग असणार आहे. या उपक्रमामध्ये अनेक विद्यार्थी प्रथमच अवांतर वाचन कौशल्याकडे जाणार आहेत. काही विद्यार्थ्यांकडे हे कौशल्य पूर्वीपासूनच असणार आहे. बरेचसे विद्यार्थी केवळ ऑनलाईन येणारे बरेचसे टुकार साहित्य वाचणारे असणार आहेत. या सर्वांना एकत्र आणण्याचे काहीजणांसाठी अनिच्छेने असले, तरीही या उपक्रमात सहभागी होण्याचे कार्य या उपक्रमातून साध्य होणार आहे. वाचनाचे महत्त्व सांगणारी व्याख्याने काही विद्यार्थ्यांवर निश्चितच वाचन संस्कार करणार आहेत. म्हणूनच मोबाईल युगात हा अभिनव उपक्रम महत्त्वाचा ठरतो. मनापासून वाचणारी मंडळी निश्चितच वाचन संस्कृतीपर्यंत पोहोचणार यात शंका नाही. वेळ किती लागणार हे त्या वाचकाच्या वाचन गतीवर आणि शास्त्रशुद्धतेवर अवलंबून असणार आहे. वाचन मूलतः मानवाला ज्ञानसंपन्न बनवते. ज्ञानसंपन्न व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आपोआपच चारचौघांत उठून दिसते. नव्याने वाचनप्रवाहात येणाऱ्या वाचकांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे की, वाचन ते व्यक्तिमत्त्व विकास व्हाया वाचनसंस्कृती या प्रवासातील वाचन हा पहिला टप्पा आहे. #reading#culture

या प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्यांचा काय वाचावे, असा प्रश्न असतो, वाचणार कधी? आपल्याकडे वाचनासाठी बिलकूल वेळ नाही, असे अनेकांचे मत असते. वेळ नाही ही तक्रार अत्यंत चुकीची आहे. सर्वांकडे केवळ दिवसाचे २४ तासच असतात. या २४ तासांत आपण काय करतो, याचा हिशेब आपणच मांडायला हवा. दिवसभर आपण किती वेळ वाया घालवतो, हे आपोआपच लक्षात येते. त्याचप्रमाणे आपली कोणाशी तरी बैठक ठरलेली असते. आपण वेळेवर जातो, मात्र समोरची व्यक्ती वेळेवर येत नाही. हा प्रतीक्षा कालावधी तर खूप त्रास देणारा असतो. मात्र अशा वेळी जर आपल्याबरोबर एखादे पुस्तक असेल तर आपला वेळ निश्चितच चांगला जातो. आपली चिडचिड होत नाही. त्यामुळे वेळ नाही ही सबब योग्य नाही. मात्र वाचनाची सुरुवात करताना आपल्या आवडीच्या विषयाच्या हलक्या पुस्तकांनी करावी. पुढे आपले वाचन जसे समृद्ध होत जाते, तसे आपले हात इतर विषयांकडे या विषयातील अभिजात पुस्तकांकडे आपोआप जायला सुरुवात होते.
वाचन करायचे तर पुस्तक वाचायचे. मात्र कोणते पुस्तक वाचावे, असा प्रश्न अनेक वाचक विचारतात. काय वाचावे, असाही काहींचा प्रश्न असतो. खरे सांगायचे तर जे मिळेल ते वाचावे. त्यातून आपण वाचनासाठी पुस्तक निवडताना पुस्तकाची प्रस्तावना आणि ब्लर्ब किंवा पाठराखण वाचून ठरवता येते. पुस्तकाचे वाचन करताना आपण त्या भूमिकेत शिरून पुस्तक वाचायला हवे. पुस्तकाचे वाचन मन एकाग्र करून वाचन करण्याची गरज असते. आपण वाचन केलेले पुस्तकातील विचार आपल्या मेंदूपर्यंत पोहोचले पाहिजेत. पुस्तकातील चांगले विचार, अनुभव हे आपण निवडायला हवेत. मेंदू हा आपल्यासाठी वरदान आहे. याचा वापर करूनच आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरलो आहोत. आपल्याला संगणकाची, मोबाईलची मेमरी किती आहे, हे माहीत असते. मात्र आपल्याच मेंदूची मेमरी किती आहे, हे अनेकांना माहीत नसते. मानवी मेंदू साधारण १३०० ते १४०० ग्रॅम वजनाचा असतो. त्याची स्मृती क्षमता किंवा साठवण क्षमता २५ लक्ष गिगाबाईट इतकी आहे. आजमितीला कोणाकडेही एवढी मेमरी असणारा संगणक किंवा मोबाईल असणे शक्य नाही. असे असतानाही आपण त्याचा वापर अत्यल्प करतो. आपण जर त्याचा वापर कमी करत गेलो, तर डार्विनच्या सिद्धांतानुसार भविष्यात मानवी मेंदू आकाराने घटत जाईल. त्यामुळे त्याचा वापर आपण जास्तीत जास्त केला पाहिजे. विशेष म्हणजे आपल्या शरीराने तयार केलेल्या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर हा मेंदूच करत असतो. त्यामुळे आपण वाचलेल्या पुस्तकातील चांगले विचार, अनुभव आपण येथे साठवायला हवेत. असे आपण लाखो पुस्तकांतील चांगले विचार, अनुभव आपल्या मेंदूमध्ये साठवू शकतो. आपल्या मेंदूचा केवळ सहा ते सात टक्के भाग वापरला जातो. सर्वाधिक दहा टक्के मेंदू वापरला जातो, असे वैद्यकशास्त्र सांगते. त्यामुळे वाचताना वेचलेले या मेंदूमध्ये साठवायला हवे. वाचताना वेचलेले आणि मेंदूत साठवलेले मोकळ्या वेळात आठवायला हवे. जे काही साठवलेले आठवते, त्यावर आपल्या मेंदूमध्ये विचार करायला हवा. हा विचार सर्व बाजूंनी करायला हवा. यातून आपण ज्या व्यक्तीबाबत, घटनेबाबत वाचलेले, साठवलेले आता आठवत असते, त्या व्यक्तीला घटनेला समजून घेण्यासाठी खूप उपयुक्त आणि गरजेचे असते.
– डॉ. व्ही. एन. शिंदे