पाकिस्तानला चिकटून असलेले भारताचे शेवटचे शहर म्हणजे छोटेसे जैसलमेर सीमेच्या पलीकडे आणि सीमेच्या अलीकडे पसरलेले अथांग थार वाळवंट! छोट्या झुडपांपलीकडे या वाळवंटात काहीच दिसत नाही. हा संपूर्ण परिसर इतका रखरखीत आहे की इथे माणसे का राहतात? दुसरीकडे स्थलांतरित का झाली नाहीत? हा प्रश्न सतावत राहतो. जैसल राजाने इथे किल्ला बांधला आणि त्याभोवती वस्ती झाली. किल्ल्यात राजाची सेवा करायला काही कुटुंबे राहायची. अजूनही तीच व्यवस्था आहे. राजाचे कुणीही वंशज इथे राहत नाहीत, पण राजाला सेवा देणाऱ्यांची कुटुंबे अजूनही किल्ल्याच्या आत राहतात. त्यामुळे किल्ल्यात ३५० घरे, त्यांचीच हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने, गल्लीबोळ अशी व्यवस्था आहे. जी माणसे किल्ल्यात राहतात त्यांचा आधार कार्डवर पत्ता ‘किल्ल्याच्या आत’ असा आहे, जैसल राजाचा जैसलमेर किल्ला, एक प्रमुख रस्ता आणि किल्ल्याला वेढलेली वस्ती अशी अगदी गाठोडे बांधलेली ही शहराची सीमारेखा आहे.
जैसलमेरला ‘गोल्डन जैसलमेर’ म्हणतात कारण इथे सर्व घरे सॅण्डस्टोनची आहेत. येथील सॅण्डस्टोन हा जयपूरला मिळतो तसाच पिवळा आहे. पण त्याला सोनेरी छटा आहे. इथे घर बांधायचे तर याच सोनेरी दगडाचे आणि पुरातन काळापासून आलेल्या नक्षीचाच वापर करायचा असा दंडक आहे. त्यामुळे जैसलमेर ‘गोल्डन जैसलमेर’ झाले आहे. राजस्थानात जयपूर पिक सिटी, उदयपूर लेक सिटी आणि जैसलमेर गोल्डन सिटी आहे. जैसलमेरचा किल्ला देखणा आहे. भलीमोठी हवेली आहे असेच वाटते. दगडांवर कोरलेली वेगवेगळी नक्षी लक्ष वेधून घेते. किल्ल्यात लोक राहत असल्याने किल्ला बंदच होत नाही, कधीही उठावे आणि किल्ल्यात फिरायला जावे.
किल्ल्याबाहेर असलेल्या हवेल्या उंचच उंच म्हणजे तीन मजली आहेत. त्या काळात ते बांधकाम केले म्हणजे अप्रूपच आहे. पटवा गुमनमल बाफना यांच्या पाच हवेली आहेत. पाच पुत्रांसाठी त्यांनी पाच हवेली बांधल्या. पाचही हवेली पूर्ण होण्यास ६० वर्षे लागली. एक हवेली बांधायला एक कोटी रुपये लागले. म्हणजे बाफना किती श्रीमंत असतील याचा विचार करा. यातील दोन हवेली सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. दुर्दैवाने यांचे कुणीही वंशज इथे राहत नाहीत. त्यांचे वंशज आता मुंबईत राहतात. दुसऱ्या एका हवेलीत वंशज राहतात आणि हवेलीतच दुकान उघडून त्यावर उदरनिर्वाह करतात. किल्ल्यापासून जवळच गड़ीसर तलाव आहे. हा मानव निर्मित तलाव पावसाच्या पाण्याने कायम
भरलेला राहतो. वाटसरूंना प्यायला पाणी मिळावे म्हणून अनेक वर्षांपूर्वी हा बांधला गेला तो अद्याप कायम आहे. या तलावाची एक गंमत आहे. जैसलमेर शहरात त्या काळात तिला नावाची नर्तकी होती. तिने या तलावाचे प्रवेशद्वार उभारले. त्यामुळे लोक संतापले. त्यांनी राजाकडे तक्रार केली. राजाने प्रवेशद्वार पाडायला सांगितले, पण नर्तिका हुशार होती. तिने प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर श्रीकृष्णाची मूर्ती आणून ठेवली. आता हे मंदिर कसे पाडायचे हा प्रश्न आला. त्यामुळे हे प्रवेशद्वार वाचले. पण गंमत म्हणजे हे नर्तकीने बांधलेले प्रवेशद्वार असल्यामुळे राजा कधीही त्या कमानी खालून गेला नाही. राजाचे वंशजही गेले नाहीत. ते दुसऱ्या मार्गाने तलावाजवळ जातात.
जैसलमेर एकेकाळी फार श्रीमंत प्रदेश होता. हा ‘सिल्क रूट’ आहे. इथून सोने, चांदी, मसाले यांचा व्यापार होत असे, उंटावरून सतत मालाची, व्यापाऱ्यांची ये-जा सुरू असायची, कालांतराने बंदरे बांधली गेली. बोटीने व्यापार सुरू झाला आणि हळूहळू हा सिल्क रूट बंद झाला. त्यानंतर जैसलमेरकडे कुणीही फिरकेना, शहराची फार वाईट अवस्था झाली. पुढे भारत आणि पाकिस्तानची दोन युद्ध झाली त्यात हे शहर आणखी होरपळले. नंतर मात्र इथून जवळ पोखरण इथे अणुचाचणी झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी इथे आल्या, त्यांनी जैसलमेर पाहिले आणि त्याला महत्त्व दिले. अलीकडे इथे अनेक चित्रपटाचे चित्रीकरणही झाले. त्यामुळे आता देशी व परदेशी पर्यटक इथे येऊ लागले आहेत. जुलै महिन्यात इथे स्पेन व फ्रान्सचे पर्यटक खूप येतात. भारतीय ऑगस्टपासून येऊ लागतात. मार्चपासून भयंकर उन्हाळा, मग पाऊस सुरू होतो, त्यामुळे मार्च ते जुलै जैसलमेरला पर्यटन ठप्पच असते. विमान सेवाही बंद ठेवतात.
जैसलमेरता आलात तर बेसनाचे तुपातील छोटुआ लाडू, केर सांगरीची भाजी, मंगुरी (कांदा पात) मूग भाजी, बाजरीची भाकरी, मिस्सी रोटी आणि लस्सी हे पदार्थ नक्की खा.