आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळ्या आपत्तीमध्येसुद्धा येणारे वेगवेगळे सण मानवामध्ये नवचैतन्य निर्माण करून आपले दुःख, दारिद्र्य विसरायला लावून नव्या उमेदीने जीवन जगायला लावतात हे वारंवार सिद्ध झाले आहे. सध्याच्या काळातील समाज माध्यम अर्थात सोशल मीडियाच्या वापरामुळे या सणांसाठी दिली जाणारी किंवा पोस्ट कार्यालयातून पाठविली जाणारी शुभेच्छापत्रे मात्र आता नामशेष होत आहेत.
या विविध सणांपैकी दिवाळी हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि कौटुंबिक जीवनातील मोठा सण आहे. भारतासह जगातील
अनेक देशांमध्ये मोठ्या दिमाखात दिवाळी साजरी केली जाते. देशातील अगदी गरिबातील गरीब मनुष्य सुद्धा आपापल्यापरीने हा सण साजरा करताना आपल्याला
दिसून येतो. दिवाळीच्या दिवशी श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले होते. आणि म्हणूनच प्रजाजनांनी संपूर्ण नगरीत दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते, असे सांगितले जाते. वसुबारस ते भाऊबीज या कालावधीत दिवाळी साजरी केली जाते. अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन सणाचा उत्साह व आनंद द्विगुणित केला जात आहे. (Diwali greeting cards on the verge of extinction)

गेल्या काही वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिवाळी ( ग्रीटिंग्स) शुभेच्छापत्राद्वारे अगदी सर्रासपणे दिल्या जात होत्या. ही शुभेच्छापत्रे बहुतांश वेळी बाजारात जाऊन खरेदी केली जात असत किंवा काहीजण घरीच आकर्षक अशाप्रकारे शुभेच्छापत्रे बनवत असत. शुभेच्छापत्रांमधील मजकूर हा बहुधा हाताने लिहिलेला असायचा. त्यामुळे ज्यांना ही शुभेच्छापत्रे मिळत असत त्यांना खराखुरा आनंद या शुभेच्छापत्रांद्वारे मिळत असे. दिवाळीच्या दहा-पंधरा दिवस आधी ती पोस्टाने पाठवली जात असत. तेव्हा ती कधी दिवाळीला तर कधी दिवाळीनंतर संबंधितांना मिळत असत.
सोशल मीडियाच्या वापरामुळे झाला परिणाम
मात्र, या शुभेच्छा पत्रांची बरेच जण आतुरतेने वाट बघत असत. मात्र, गत काही वर्षांचा इतिहास पाहिला तर फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, मेसेज आदी सोशल मीडियाच्याद्वारे शुभेच्छा दिल्या जात असल्याने शुभेच्छापत्रे ही दुर्मीळ झाली नसून ती पूर्णपणे नामशेष झाली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
विविध प्रकारची शुभेच्छापत्रे बाजारात येत होती. यामधून चांगले आकर्षक व सुंदर अक्षरांसह मनमोहक छायाचित्र असलेली शुभेच्छापत्रे खरेदी करून पाठविली जात होती. सोशल मीडियाच्या अतिहव्यासापोटी हे सर्व नामशेष होत आहे.