वातावरण बदलाचा आणि प्रदूषणाचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालल्याचा निष्कर्ष अनेक सर्वेक्षणे नोंदवतात. माणसाचे निसर्गावरचे आक्रमण नव्हे अतिक्रमण हे त्याचे एक मुख्य कारण मानले जाते. याचे गंभीर परिणाम सामान्य माणसांना मोठ्या प्रमाणात भोगावे लागतात. समाज माध्यमांमुळे याविषयीची माहितीदेखील अनेकांना असते. तथापि निसर्ग संवर्धनात सामान्य माणसेदेखील मोलाची भूमिका बजावू शकतात याची जाणीव सामान्य पातळीवर अभावाने आढळते. दैनंदिन आयुष्यातील सवयींचे अवलोकन माणसांनी केले तर त्यातील अनेक मार्ग त्यांच्याही लक्षात येऊ शकतील. पाणी हे जीवन आहे. ते अमूल्य आहे, पण त्याचा साठा मर्यादित आहे, हे माणसे जाणून आहेत. तरीही पाण्याची वारेमाप उधळपट्टी सर्रास आढळते. पावसाचे पाणी अडवून ते जिरवण्याचे आवाहन करणारे फलक माणसे वाचतात. तथापि वैयक्तिक किंवा गृहनिर्माण प्रकल्पातील कूपनलिकांचे पुनर्भरण किती जण करतात ? प्लास्टिकचा भस्मासुर आता माणसावरच उलटण्याचा धोका वारंवार व्यक्त केला जातो. एकदा वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर सरकार अनेकदा बंदी घालते. पण त्याचा फज्जा उडवला जातो.

अशा प्लास्टिकच्या वापराचा मोह माणसे टाळू शकत नाहीत. कुठेही फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकसह एकूणच कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. इतस्ततः पसरलेला कचरा ही माणसाची पाऊलखूण बनली आहे. कचरा कुठेही कसाही फेकून दिला जातो. नदी हे तर निर्माल्य फेकण्याचे हक्काचे ठिकाण बनले आहे. नदीचा श्वास त्यामुळे कोंडला आहे. या सगळ्या सवयी बदलणे ही काळाची गरज आहे. कारण निसर्गाचा समतोल बिघडला आहे. तो बिघडतच चालला आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, पाणी जपून वापरणे आणि पाण्याची बचत करणे, एकदा वापरून फेकून दिले जाणारे प्लास्टिक न वापरणे, त्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करणे, नदीत निर्माल्य न टाकणे अशा अनेक सवयी माणसे अंगी बाणवू शकतात, ज्या निसर्गाचे संवर्धन करतात. ज्याची सुरुवात ठरवली तर लगेच होऊ शकेल. निसर्ग संवर्धनाची चळवळ घराच्या उंबरठ्यापासून सुरू होणे आवश्यक आहे. (Nature conservation movement)