C-DAC सी-डॅकने सुरू केला पहिला एआय अभ्यासक्रम
‘ज्याची कॉम्प्युटरवर कमांड, त्यालाच जगभर डिमांड’ हे ब्रीद घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी संगणक क्षेत्रात करिअर केले, त्यांना किमान 25 वर्षे मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही. मात्र, आता काळाने कूस बदलल्याने ‘एआय शिकाल, तरच स्पर्धेत टिकाल’ असे नवे ब्रीद तयार झाले आहे.
एआय या विषयातील देशातील पहिला पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सी-डॅक संस्थेने (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग अर्थात प्रगत संगणक संस्था) सुरू केला असून, नोकरीची 90 टक्के गॅरंटी, तर पगाराचे दरमहा पॅकेज 7 ते 17 लाख रुपये इतके असेल. (Center for Development of Advanced Computing)
सध्या जे विद्यार्थी बारावीत आहेत, त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट आहे. त्यांच्यासह पाचवीच्या विद्यार्थ्यांना भविष्यात एआय अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये करिअर करण्याची इच्छा आहे.
बाजारात सहा महिन्यांपासूनचे अभ्यासक्रम आहेत. तसेच बीएस्सी, बीबीए, बीई आणि बीटेक या अभ्यासक्रमातही ज्याचे एआयमध्ये स्पेशलायझेशन आहे, त्यांना प्रचंड मागणी आहे. मग संगणक शास्त्र (आयटी) रोबोटिक्स क्षेत्रात करिअर करावे की नाही, असे प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. त्यांच्यासाठी तज्ज्ञ एकच उत्तर देतात, ‘आधी एआय साक्षर व्हा. मगच करिअर निवडा.
प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग माहिती करून घ्या
तज्ज्ञ म्हणतात की, पूर्वी संगणकाची भाषा शिकले तर त्याला त्या क्षेत्रात करिअर करता येणे सोपे जात असे. आता एआय तंत्रज्ञानाची भाषा आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. यात चॅट जीपीटी हाताळावे कसे हे शिकवले जाते. त्याचे शेकडो अभ्यासक्रम भारतात आहेत. मात्र तुम्हाला नेमके काय करायचे आहे, हे आधी ठरवा. मग त्यात एआयचा उपयोग शिकवता येतो. भारतात याचे कोचिंग क्लास अजून सुरू झाले नाहीत. मात्र कोर्सेरा सारख्या पोर्टलवर ते शिकता येतात.
एआयसोबत बोलायला शिका…
तज्ज्ञांनी सांगितले की,आपल्या मोबाईलवर, लॅपटॉप किंवा संगणकात एआय टूल दिले आहे. त्याचा वापर करायला शिका. त्याच्याशी आपण कसे बोलावे याचीही एक पद्धत आहे. तुम्ही काय प्रश्न विचारता त्यावर ते उत्तर देते. त्यामुळे आपण एआयकडे काय मागतो आहोत हे समजले पाहिजे. यासाठी सुरुवातीला छोटासा अभ्यासक्रम करण्यास हरकत नाही. अभ्यास ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यावरून प्राथमिक अंदाज येईल.
सी–डॅकने सुरू केला पहिला एआय अभ्यासक्रम
सी-डॅक अर्थात सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कॉम्प्युटिंग (प्रगत संगणन संस्था) ही इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची प्रमुख संस्था असून 1988 मध्ये संस्थेची स्थापना झाली. संस्थेचे संस्थापक संचालक संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे परम महासंगणक तयार केल्याने जगभरात या संस्थेचे नाव प्रसिद्ध आहे.
त्याचे मुख्यालय पुणे शहरातील पाषाण भागात आहे. एआयमधील पहिला अभ्यासक्रम या सरकारी संस्थेने देशात सुरू केला असून तो आठ महिने कालावधीचा असून ऑनलाईन आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर हा अभ्यासक्रम करू शकतो.
नोकऱ्यांची संख्या 10 पटींनी वाढणार
भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेची म्हणजेच एआय बाजारपेठ प्रचंड गतीने वाढण्याची चिन्हे असून, 2027 पर्यंत या बाजारपेठेचा आकार 17 अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल, असा नॅस्कॉमचा अंदाज आहे. अर्थात, या बाजारपेठेचे लाभ उठवण्याची सज्जता भारतीय शिक्षणव्यवस्थेत तूर्तास नाही.
एआय आणि मशिन लर्निंग क्षेत्रातील तज्ज्ञांसाठीची मागणी आणि पुरवठा, यात भारतात 51 टक्के तफावत आहे. आजघडीला एआय क्षेत्रात 6 लाख 29 हजार तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांची संख्या आहे 4 लाख 16 हजार! नोकऱ्यांची ही संख्या 10 पट वाढणार असून, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पगारापेक्षा या क्षेत्रातील पगार 4 पट अधिक असू शकतात. ही अफाट संधी लक्षात घेऊन आता निरनिराळ्या शिक्षण संस्थांमध्ये एआय अभ्यासक्रम सुरू होत असून, आयआयटी मद्रासनेही विशेष अभ्यासक्रम सुरू केला आहे.
नोकरीच्या संधी कुठे?
• हेल्थ केअर
• विनावाहक कार उत्पादन
• ड्रोन तंत्रज्ञान
• रोबोटिक्स
• बिझनेस प्रोसेस
• डेटा अॅनालिटिक्स
• माहिती निर्माण क्षेत्र
• विज्ञान आणि तंत्रज्ञान
तज्ज्ञ दीपक शिकारपूर यांनी दिलेल्या टिप्स…
• आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये यंत्र शिक्षण, त्यांचे बुद्धिमान व परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो.
• या शाखेतील संशोधन मुख्यतः स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांशी निगडित आहे; उदाहरणार्थ नियोजन, संयोजन, निदान याविषयक प्रश्नांची उत्तरे
शोधण्याची क्षमता, हस्ताक्षर, आवाज आणि चेहरा ओळखण्याची क्षमता इत्यादी.
• लर्निंग म्हणजे शिकणे. हे दुसरे तिसरे काही नसून आतापर्यंत जे काही अनुभवले आहे, त्यावरून अनेक निष्कर्ष समोर येतात. मग पुढच्या वेळेस शिकलेल्या माहितीचा वापर करून योग्य निर्णय घेणे होय.
• डीप लर्निंगमध्ये माणसाचा मेंदू माहिती कशी प्रोसेस करतो, कसा शिकतो, कसा निर्णय घेतो, यावरून मॉडेल बनवले जाते. आपला मेंदू माहिती साठविण्यासाठी, तिला प्रोसेस करण्यासाठी तिच्यावरून नवीन भाकीत करण्यासाठी आतल्या मज्जातंतूचे (न्यूरॉन्स) विस्तृत जाळे वापरतो.
• हे करोडो न्यूरॉन्स एकमेकांना माहितीची देवाणघेवाण करतात. याच न्यूरॉन्सच्या विस्तृत जाळ्यापासून न्यूरल नेटवर्क ही संकल्पना मांडली गेलेली आहे. आर्टिफिशल न्यूरल नेटवर्कचे अनेक प्रकार आहेत. त्यांच्या वापर करून ठरावीक माहितीसाठी निर्णय घेतले जातात.
• डीप लर्निंग अल्गोरिदम मोठ्या प्रमाणात डेटावर प्रशिक्षित केले जातात आणि त्याद्वारे ते त्या डेटामधील नमुने ओळखण्यास आणि त्यानुसार भविष्यवाणी करण्यास शिकतात.
• डीप लर्निंग हे एक जलद वाढणारे क्षेत्र आहे आणि यात अनेक करिअर संधी उपलब्ध आहेत.
काही लोकप्रिय करिअर पुढीलप्रमाणे…..
• डीप लर्निंग इंजिनिअर : हे इंजिनिअर डीप लर्निंग अल्गोरिदम विकसित आणि प्रयोग करतात.
• डेटा विश्लेषक : हे डीप लर्निंग मॉडेलसाठी डेटा तयार आणि विश्लेषण करतात.
• मशिन लर्निंग इंजिनिअर : हे इंजिनिअर मशिन लर्निंग आणि डीप लर्निंग मॉडेल विकसित आणि प्रयोग करतात.
• हे क्षेत्र अत्याधुनिक असल्याने पारंपरिक शिक्षण संस्थेत पूर्णवेळ दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम अजून तरी उपलब्ध नाहीत.
• डीप लर्निंग शिकण्यासाठी अनेक ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. उदा. कोर्सेरा, उडा सिटी, एडेक्स इत्यादी. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कार्यानुभव आवश्यक आहे.
आशिष देशमुख
