शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेत मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. या राज्याचे पहिले युवराज, मऱ्हाट देशीचा पहिला राजपुत्र, संभाजीराजे पुढे मराठ्यांचे दुसरे छत्रपती म्हणून राज्यावर आले. शिवछत्रपती हयात असतानाही युवराज म्हणून आणि गादीवर आल्यावर छत्रपती म्हणून संभाजीराजांची कारकीर्द मोठी वादळी ठरली. संघर्ष हा त्यांच्या वैयक्तिक व राजकीय जीवनाचा स्थायीभाव ठरला. त्यांच्या हयातीतही अनेक वाद उपस्थित झाले. एवढेच नव्हे, तर मृत्यूनंतरही त्यांच्याबद्दल वाद उपस्थित केले गेले. त्यांच्याबद्दल बहुदा प्रतिकूलच लिहिले गेले. प्रतिपादले गेले. त्यांच्या मृत्यूनंतर जे सत्तांतर झाले त्या कालखंडात त्यांची बाजू समर्थपणे मांडणारा असा कोणी राहिलाच नाही. त्यांच्याशी शत्रुत्व करणाऱ्या स्वकीयांनीही ‘मरणान्तानि वैराणि’ हे साधे नीतितत्त्वही पाळले नाही.
मराठ्यांच्या संपूर्ण इतिहासाकडे धावता दृष्टिक्षेप टाकला तरी हे सहज लक्षात येते की, एक शिवछत्रपतींचा अपवाद सोडल्यास छत्रपती संभाजी महाराजांइतका पराक्रमी, शूर व तेजस्वी व्यक्तित्व असलेला अन्य कुणी पुरुष सबंध छत्रपतींच्या घराण्यात झालेला नाही. संभाजी महाराजांच्या टीकाकारांचेही याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. छत्रपती घराण्यात संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज, शाहू महाराज (सातारा) आणि संभाजी महाराज (करवीर) असे तीन नाव घेण्यासारखे राज्यकर्ते होऊन गेले; पण पराक्रम, शौर्य, धाडसी व स्वाभिमानी वृत्ती इत्यादी गुणांच्या संदर्भात यापैकी कुणी संभाजी महाराजांची उंची गाठू शकत नाही.
संभाजीः एक सुसंस्कृत पराक्रमी युवराज
महाराष्ट्रातील भोसले घराणे हे दक्षिणेतील एक उच्च कुलीचे क्षत्रिय घराणे होते. संभाजीराजांचे आजोबा शहाजीराजे भोसले हे स्वतः संस्कृतज्ञ असून, अनेक शास्त्रे व कला यांचे भोक्ते होते. त्यांचे पुत्र शिवाजी महाराज हे अनेक विद्वान पंडितांना राजाश्रय देणारे होते. संभाजीराजांची तिसरी पिढीही त्यास अपवाद नव्हती. शिवाजी महाराजांसारखा असामान्य पिता आपल्या राज्याच्या वारसाच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केल्याशिवाय कसा राहील. युद्धकलेच्या शिक्षणाबरोबरच महाराजांनी पारंपरिक विद्या व शास्त्रे यांच्या अभ्यासाची संभाजीराजांसाठी सोय केशव पंडितांसारख्या विद्वान शास्त्राच्या देखरेखीखाली केलेली होती. युवराजपदी असतानाच संभाजीराजांनी ‘बुधभूषण’ हा राजनीतीपर ग्रंथ रचला होता. त्या ग्रंथांतर्गत त्यांनी आपण काव्यालंकार, शास्त्रे, पुराणे, संगीत आणि धनुर्विद्या यांचा सखोल अभ्यास केल्याचे म्हटले आहे.
पुस्तकी विद्येबरोबरच शिवाजी महाराजांनी युवराजास प्रत्यक्ष राज्यकारभाराचे शिक्षणही वयाच्या अवघ्या 14-15 व्या वर्षापासून (सन 1670) देण्यास सुरुवात केली होती. एवढेच नव्हे, तर लवकरच (सन 1672) त्याच्या हाताखाली फौज देऊन मुलूखगिरी करण्यास धाडण्याचाही प्रारंभ केला होता. या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणाऱ्या अँबे कॅरे या नावाच्या फ्रेंच प्रवाशाने युवराज संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी व पराक्रमाविषयी लिहिले आहे.
‘शिवाजीराजांनी आपल्या सैन्याचे विभाग करून शेजारील सर्व शत्रूंवर एकाचवेळी हल्ला चढविला आहे. शत्रुसैन्ये त्यांच्याच मुलखात गुंतवून ठेवल्याने ती एकजुटीने आपल्या मुलखात चढाई करण्यास येऊ नयेत, हा त्याचा मुख्य उद्देश होता. शिवाजीराजांनी एक सर्वात शूर अशा दहा हजार सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिला होता. हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून, चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून, अतिस्वरूपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच की, या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते. ते आपल्या कर्तबगारीचे सर्व श्रेय आपल्या छोट्या सेनापतीस देतात. संभाजीही कोणीही कर्तबगारी करून दाखविली तर त्यांचे कौतुक करतो व त्याचेसमोर घडलेल्या शौर्याचे चीज त्याच्याकडून ताबडतोब बक्षीसरूपाने झाल्याशिवाय राहत नाही. ‘
पारंपरिक शास्त्रे-विद्या, राज्यव्यवहार व युद्धकला या क्षेत्रांबरोबर तत्कालीन राजनीतीच्या क्षेत्रातही आपला पुत्र तरबेज व्हावा, म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजीराजास दक्षिणेतील राजकारणातील प्रत्यक्ष धडे द्यावयास सुरुवात केली होती. मिर्झा राजा जयसिंहाच्या स्वारीच्या रूपाने स्वराज्यावर संकट आले व पुढे जेव्हा पुरंदरचा तह झाला. त्यावेळी आठ वर्षांच्या युवराजाला महाराजांनी राजा जयसिंहाच्या छावणीत पाठविले आणि आपल्याऐवजी त्याला मोगलाची पंचहजारी मनसब स्वीकारण्यास लावली – (सन 1665). मोगली छावणीशी व तेथील रीतीरिवाजाशी अशाप्रकारे आठ वर्षांच्या मराठा राजपुत्राचा प्रथम संबंध आला. पुढच्याच वर्षी संभाजीराजास घेऊन महाराज आग्यास बादशहा औरंगजेबाच्या भेटीस गेले. वयाच्या नवव्या वर्षी संभाजीराजांना मोगल दरबारचे भव्य आणि वैभवशाली दर्शन घडले. याच दरबारात बादशहाची मल्लयुद्धाची आज्ञा या बालराजाने धुडकावून लावून आपल्या अंगच्या ‘तेजा’चे दर्शन घडविले. पुढे शिवाजी महाराज आपल्या पुत्रासह आग्य्राच्या कैदेतून निसटले खरे; पण मार्गात प्रवासाचा धोका लक्ष घेऊन त्यांनी संभाजीराजांना मागे ठेवले. युवराजाच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील हा कसोटीचा काल होता. मथुरा- बनारस अशा परक्या ठिकाणी या कोवळ्या बालराजाने त्याला दिलेली भूमिका बेमालूमपणे वठविली. कोणतीही तक्रार न करता.
स्वराज्यात परतल्यावर शिवाजी महाराजांचा मोगलांशी पुन्हा एकदा सला झाला. त्यान्वये त्यांनी दक्षिणेचा मोगल सरसुभेदार शहाजादा मुअज्जम याजकडे संभाजीराजास ससैन्य पाठविले – (ऑक्टो 1667). त्यांना सप्तहजारी मनसब आणि वऱ्हाड खान्देश येथील 15 लाखांची जहागीर मोगलांतर्फे बहाल करण्यात आली. शहाजादा मुअज्जम व युवराज संभाजीराजे यांची चांगलीच मैत्री बनली. सन 1669 अखेर मराठ्यांचे मोगलांशी सख्य राहिले. पुढे ते तुटले. या अवधीत काही काल शहाजाद्याच्या छावणीत संभाजीराजांचे वास्तव्य झाले. मराठी राज्याचा हा पहिला युवराज, आपला वारसदार, शिवाजी महाराजांनी अशाप्रकारे विद्या, कला, प्रशासन, युद्धनीती व राजनीती अशा सर्वच क्षेत्रांत निपुण बनविला.
‘सरदारपुत्र’ शिवाजीराजे व ‘राजपुत्र’ संभाजीराजे
संभाजी महाराजांच्या चरित्राकडे नेहमीच त्यांच्या पित्याच्या कर्तृत्वाशी व व्यक्तित्वाशी तुलना करून पाहिले जाते. हे अस्वाभाविक नाही. कारण, या दोन पुरुषांच्या कारकिर्दी एकमेकास खेटून उभ्या आहेत. शिवाय, संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र आहेत; पण संभाजीराजा म्हणजे शिवाजी महाराज होऊ शकत नाहीत. ज्या परिस्थितीने शिवाजी महाराजांना घडविले ती भिन्न व परिस्थितीत संभाजीराजे घडले ती परिस्थिती त्याहून भिन्न. बालपण, कौटुंबिक वातावरण, आजूबाजूचे सामाजिक व भौगोलिक संस्कार, दक्षिणेतील तत्कालीन राजकारण, अडचणी, संकटे, धोके इत्यादी सर्वच बाबतीत बालशिवाजी व बालसंभाजी यांच्यामधील तुलना साम्य शोधण्यासाठी होऊ शकत नाही. तुलनाच करावयाची झाल्यास दोन्ही व्यक्तित्वांतील भिन्नत्व शोधण्यासाठी ती करावी लागेल.
पहिली गोष्ट अशी की, शिवाजीराजा हा दक्षिणेतील एका सामर्थ्यशाली सरदाराचा पुत्र आहे. जहागीरदारपुत्र आहे. संभाजीराजा हा दक्षिणेतील प्रत्यही सामर्थ्यशाली बनत जाणाऱ्या मराठी राज्याच्या अधिपतीचा पुत्र आहे. दुसरे असे की, शिवाजीराजाने अवतीभोवतीच्या शत्रूंचे दमन करून नव्या सार्वभौम सत्तेची उभारणी केली होती. स्वराज्य संस्थापना हे त्यांचे ध्येय होते. युवराज संभाजीपुढे या राज्याचे संवर्धन व संरक्षण हे काम होते. आणखी असे की, शिवाजीराजाला आरमारापासून राजधानीपर्यंत राज्याची प्रत्येक गोष्ट नव्याने करावी लागली होती. त्यांच्या अवतीभोवतीची कर्तृत्ववान माणसे ही त्यांची स्वनिर्मिती होती. युवराज संभाजीस हे सर्व त्याच्या जन्मसिद्ध हक्काने प्राप्त होणारे होते. कर्तृत्ववान माणसांसह पुढे जायचे होते. जमल्यास त्यात भर टाकायची होती. शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बालशिवाजीस घडविण्यासाठी जिजाबाईंच्या रूपाने एक असामान्य माता त्यास मिळाली होती. युवराज संभाजी मात्र वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षीच मातृसुखास पारखा झाला होता. त्याची आजी ही आईची जागा घेऊ शकत नव्हती. आजीची माया आणि आईचे प्रेम यात फरक आहे. आजी कधी रागवत नाही. शिक्षा करत नाही. आई प्रेमाबरोबर मुलास शिक्षा करण्यासही मागेपुढे पाहत नाही. युवराज संभाजीराजे चरित्र अशा सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तपासले गेले पाहिजे. कारण, व्यक्तित्व हे आनुवंशिक गुण आणि परिस्थिती अशा दोन्ही घटकांनी बनत असते आणि अनेकदा त्यामध्ये परिस्थितीचाच वरचष्मा आढळून येतो.
युवराज संभाजीराजे पुन्हा स्वराज्यात
विजापूरवरील मोगली स्वारी अयशस्वी झाली. त्यानंतर दिलेरखानाच्या मनात मराठी राज्यात घुसून पन्हाळ्यावर हल्ला करावा, असा बेत होता. मार्गात अथणी, तिकोटा इत्यादी आदिलशाही मुलखाच्या गावातील हिंदू प्रजाजनावर मोगली सैन्याने अनन्वित अत्याचार केले. हिंदू प्रजेवर होणारे हे अन्याय-अत्याचार पाहून संभाजीराजास खान व त्याचे सहकारी यांच्याबद्दल तिरस्कार उत्पन्न होऊन त्यांनी त्यांची संगत सोडण्याचा निर्धार पक्का केला. खानाशी त्यांचा वाद अथवा भांडणही झाले असावे. कदाचित सभासद सांगतो त्याप्रमाणे संभाजीराजास कैद करा, म्हणून औरंगजेबाचे फर्मानही मार्गावर असेल अगर खानाचा तसा विचारही चालू असेल. एक गोष्ट निश्चित की, इतःपर मोगली गोटात राहणे, संभाजीराजास उचित गोष्ट वाटेनाशी झाली. कदाचित ती धोकादायकही वाटली असावी.
दरम्यान, शिवाजी महाराजांचा आपल्या पुत्राशी पत्रव्यवहार चालू होता. मनातले किंतू काढून टाकून परत येण्याविषयीच्या महाराजांच्या मायेच्या पत्रांनीही मोठी कामगिरी बजावली असावी. स्वराज्यात येण्याचा निश्चय होताच मोगली छावणीत कोणासही सुगावा लागू न देता संभाजीराजे बाहेर पडले आणि तडक विजापुरास गेले. यावेळी विजापूरचा वजीर मसूदखान हा शिवाजी महाराजांचा मित्र बनलेला असून, मोगली हल्ल्यापासून विजापूरचा बचाव करण्यासाठी महाराजांनी आपले लष्कर तिकडे पाठविलेले होते. या तुकड्यांच्या साहाय्यानेच संभाजीराजे विजापूरहून निघून स्वराज्यात पन्हाळगडावर दाखल झाले – (डिसें. 1679).
संभाजीराजे पन्हाळ्यावर दाखल झाले तेव्हा शिवाजी महाराज मोगली मुलखातील जालन्याच्या स्वारीवर होते. युवराजाच्या आगमनाची वार्ता हाती येताच ते तातडीने पन्हाळ्याकडे आपल्या पुत्रास भेटण्यास आले. पिता-पुत्राची भेट मोठ्या भारावलेल्या अंतःकरणाने झाली असली पाहिजे. सभासदाने या भेटीचे बहुत रहस्य जाहाले म्हणून भावपूर्ण वर्णन केले आहे.
सभासद लिहितो, ‘ते (संभाजीराजे) पळून पन्हाळियास आले. हे वर्तमान राजियास पुरंधरास कळताच संतोष पावून पुत्राचे भेटीस पन्हाळियास आपण आले. मग, पिता-पुत्रांची भेट जाहली. बहुत रहस्य जाहाले. त्याउपरि राजे म्हणू लागले की, लेकरा मजला सोडू नको. औरंगजेबाचा आपला दावा, तुजला दगा करावयाचा होता. परंतु श्रीने कृपा करून सोडून आणिला. थोर कार्य जाले. आता तू ज्येष्ठ पुत्र. थोर जालास, आणि सचंतर राज्य कर्तव्य हे तुझ्या चित्ती असे आपणास कळले, तर मजला हे अगत्य आहे. तरि तुजलाहि राज्य एक देतो. आपले पुत्र दोघेजण, एक तू संभाजी व दुसरा राजाराम. ऐसियास हे सर्व राज्य आहे. यास दोन विभाग करतो. एक चंदीचे राज्य, याची हद्द तुंगभद्रा तहद कावेरी हे एक राज्य आहे. दुसरे तुंगभद्रा अलीकडे गोदावरी नदीपर्यंत एक राज्य आहे. ऐसी दोन राज्य आहेत. त्यास तू वडीलपुत्र, तुजला कर्नाटकीचे राज्य दिधले. इकडील राज्य राजारामास देतो. तुम्ही दोघे पुत्र दोन राज्य करणे. आपण श्रीचे स्मरण करून उत्तर सार्थक करीत बसतो,’ असे बोलिले. तेव्हा संभाजीराजे बोलिले की, ‘आपणास साहेबाचे पायांची जोड आहे. आपण दूधभात खाऊन साहेबांचे पायांचे चिंतन करून राहीन,’ असे उत्तर दिधले आणि राजे संतुष्ट जाहले.
पण, सभासद म्हणतो त्याप्रमाणे राज्य विभाजनाचा प्रस्ताव पुन्हा एकदा महाराजांनी आपल्या पुत्रासमोर मांडला असेल, असे वाटत नाही. आपल्या पुत्राचे आपण घरोब्याचे रीतीने जैसे समाधान करून ये तैसे केले. या छोट्याशा वाक्यात पिता-पुत्राचे मतभेद, बेबनाव संपला व उभयपक्षी दिलजमाई झाली, असाच आशय आहे.
पण, वस्तुस्थिती अशी होती की, संभाजीराजांचा पित्यावरील राग निवळला असला तरी राजगडावरील सोयराबाई व प्रधान यांच्यावरील त्यांचा राग गेलेला नव्हता. पुढे राज्यावर आल्यावर दिलेल्या संस्कृत दानपत्रातही ते सोयराबाईंचा उल्लख सवतीचे पोर म्हूणन आपणावर रागवलेली राणी असाच करतात. (27 ऑगस्ट 1680 यावेळी सोयराबाई जिवंत होती).
संभाजीराजांचे इतिहासातील खरे चित्र
शिवछत्रपतींच्या निधनाबरोबरच संभाजीराजांची ‘युवराजावस्था’ संपली आणि अनपेक्षितपणे मराठी राज्याची सूत्रे हाती घेणे त्यांना आवश्यक ठरले. शिवछत्रपती अकाली गेले, ते आणखी काही वर्षे जगले असते तर संभाजीराजास मराठी राजाचा युवराज म्हणून आणखी काही कालावधी मिळता. कदाचित युवराज संभाजीराजांचे चरित्र आणखी काही वेगळे बनते.
युवराज संभाजीराजा हे एक इतिहासातील मनस्वी व्यक्तिमत्त्व आहे. मनाने सरळ व निर्मळ; पण तात्कालिक रागलोभाच्या आहारी जाऊन जीवनातील कोणताही धोका बेधडकपणे पत्करणाऱ्या या युवराजाकडे पित्याच्या जाणतेपणाचा, संयमी व सोशिक मनाचा व अखंड सावधानता बाळगणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा वारसा चालत आला नाही. ही मोठी खेदाची गोष्ट होती. त्यामुळेच शिवछत्रपतींच्या दिग्विजयाने हिंदवी स्वराज्याचा वृक्ष महाराष्ट्राबाहेरही फोफावत असता, संभाजीराजेंच्या हातून शत्रूस मिळण्याचा अविचार घडून आला. त्याबद्दल इतिहास त्यांना कधीच क्षमा शकत नाही.
अनेक शास्त्रे व विद्या यामध्ये पारंगत असलेल्या संभाजीराजांवर शिवछत्रपतींनी काही संस्कारच केले नसावेत अथवा झाले नसावेत, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रसंगी रक्त सांडून आत्मबलिदान करण्याचा संस्कार ज्याने तानाजी /बाजीसारख्या सामान्य मराठी माणसांवर केला. तो आपल्या पुत्रावर संस्कार करू शकला नाही, असा निष्कर्ष काढणे चुकीचे होईल. उलट मोगली गोटात गेलेल्या युवराजाची पावले पुन्हा हिंदवी स्वराज्याकडे वळली ती अशा संस्काराच्या मूळ प्रभावामुळेच, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. संभाजीराजा क्षणिक भावनेच्या उद्रेकाने वाहवत गेला खरा; पण त्याच्या अंतर्यामीच्या संस्काराने त्यास पुन्हा सन्मार्गावर आणले, हेच त्याचे खरे चित्र इतिहासात उमटते. पुढे या चित्रात आपल्या जीवनाच्या अंतसमयी त्याने दाखविलेल्या स्वाभिमान बाण्याने आणि तत्त्वनिष्ठेने केलेल्या आत्मसमर्पणाने असे आणखी काही गहिरे रंग भरले गेले की, त्यामुळे त्या चित्रातील प्रतिमेची तेजस्विता शतपटीने वाढली गेली, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.
डॉ. जयसिंगराव पवार
