रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर आपण कोणाचं दर्शन घेत असू तर ते आपापल्या मोबाईलचे. खरे आहे की नाही? मोबाईल आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. तुम्ही कोणीही असा. विद्यार्थी अथवा वकील, डॉक्टर अथवा नोकरदार, गृहिणी अथवा प्रोफेशनल… सगळ्यांची आजची पहिली गरज म्हणजे मोबाईल. मोबाईल चार्ज करायला चार्जिंग स्टेशन मिळाले की लॉटरी लागल्याचा आनंद मिळतो. हे सगळे आज आठवायचे कारण म्हणजे मोबाईल फोनला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली. म्हणजे आधी माणसे मोबाईलशिवाय जगत होती! मोबाईलशिवाय जगता येते यावर आता विश्वासही बसत नाही. हे मोबाईलचे रिव्हॉल्युशन गतिमान झाले ते २००० मध्ये स्टिव्ह जॉब्सने ॲपलचा आयफोन लाँच केला तेव्हा. पण खरे रिव्हॉल्युशन हे त्या आधी अनेक वर्षे सुरू झाले होते. १९७३ मध्ये मार्टिन कूपर या संशोधकाने न्यू यॉर्कमधून पहिला फोन केला तो आपल्या स्पर्धक कंपनीला, म्हणजेच मोटोरोलामधील संशोधकाला. अर्थातच तुमच्या आधी आम्ही हा शोध यशस्वी केला आहे, हे त्याला दाखवायचे होते. हे संशोधन करण्यासाठी मार्टिन कूपर यांना अनेक अडथळे पार करावे लागले. त्यांनी बनवलेला पहिला मोबाईल फोन हा मोटारगाडीमध्ये वापरण्यासाठी होता आणि असा मोबाईल फोन प्रथम तयार करण्याची चढाओढ मोटोरोला आणि ए. टी. अँड टी. बेललॅग्स यांच्यात होती. वर्षानुवर्षांच्या अथक परिश्रमानंतर मार्टिन कूपर यांनी तयार केलेला फोन तब्बल एक किलोपेक्षा जास्त वजनाचा होता आणि त्याला चार्जिंगसाठी १० तास लागायचे. एवढे करून एकदा चार्ज केल्यानंतर तो फक्त ३० मिनिटे चालायचा.
कुठल्या तरी मेडिकल इमर्जन्सीला असे फोन कामी येतील यासाठी संशोधकांची धडपड सुरू होती. त्यासाठी हजारो तास संशोधन करण्यात आले आणि पहिला सेल्युरल फोन अस्तित्वात आला. तेव्हाही त्याला कोणीच पर्सनल मोबाईल फोन असे म्हणत नव्हते. १९९१ मध्ये मी एका आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिपवर अमेरिकेला गेलो होतो तेव्हा पहिल्यांदा कारमध्ये बसून तो फोन वापरल्याचे आठवते. गाडीमध्ये बसून फोनवर बोलता येते, या अनुभवानं मी थरारून गेलो होतो. आज मात्र गाडीत बसल्यावर मोबाईल वाजला नाही तर मी सुखावून जातो. इतका हा प्रवास मी गेल्या ४०-५० वर्षांमध्ये पाहिला आहे. मला आठवतेय, १९९० च्या दशकात मुंबईत भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन झाले त्या सुमारास लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी प्रमोद महाजन यांनी मोबाईल फोन वापरल्याची दृश्ये वर्तमानपत्रात छापून आली होती. अर्थात आज सर्वजण मोबाईलचा वापर करीत आहेत. त्या काळी तो विटेएवढा अजस्त्र असणारा मोबाईल जवळ बाळगणे, कचेरीत घेऊन जाणे, सार्वजनिक स्थळी मिरवणे, लग्नसमारंभ, पार्यांमध्ये बाळगणे हे एक स्टेटस सिम्बॉल आणि प्रेस्टिज स्टेटमेंट बनले होते. त्या काळात युरोप-अमेरिकेत अनेक महिलांनी त्या विटेएवढ्या मोबाईलबरोबर आपले फोटोदेखील काढून घेतले होते. त्या आधी संपर्कासाठी पेजर आले होते. तेव्हा त्याचेही आम्हाला काय अप्रुप वाटले होते. पेजर कंबरेला लावून शायनिंग मारणारे अनेक जण त्या काळी दिसायचे. अगदी मुंबई, लंडनच्या उच्चभ्रू बारमध्ये एखाद्या गि-हाईकाकडे विटेएवढा मोबाईल दिसल्यास वेटर आणि मालकासकट सर्वजण बघायचे. पण हे सगळे चित्र अत्यंत वेगाने बदलले. संपर्क क्षेत्राच्या इतिहासात सर्वात वेगवान प्रसार कशाचा झाला असेल तर तो म्हणजे मोबाईलचा ! मोबाईलमध्ये खरी क्रांती घडली ती स्मार्टफोन्स आल्यावर जलद आणि स्वस्त संपर्कासाठी स्मार्टफोनने सर्वांवर आघाडी घेतली. आयुष्यातला पहिला मोबाईल फोन आपण कधी घेतला हे अनेकांना आठवतदेखील नसेल. काही जणांनी मात्र ते अँटेना असणारे विटेएवढे मोबाईल फोन आजही अँटिक पीस म्हणून जपून ठेवले आहेत.
असा मोबाईल पहिल्यांदा विकत घेतला त्या रात्री मला झोप आली नव्हती. त्यावेळी मोबाईलवर फोन आला की मिनिटाचे ८ रुपये आणि कॉल केला की मिनिटाचे ३२ रुपये लागायचे. अनेकदा मोबाईल नुसता कानाला लावून सार्वजनिक स्थळी बोलायचे नाटक करणाऱ्याकडे आजूबाजूचे आश्चयनि बघायचे. त्या मोबाईलवर आणि त्याच्या छोट्याशा स्क्रिनवर ‘स्नेक गेम’ खेळत अचंबित होणारी आमची पिढी आणि गल्लीत एखाद्याकडेच लँडलाईन फोन असताना फोन करण्या-घेण्यासाठी जमणारी आजूबाजूची जनता असा मामला होता. पण प्रत्येकाच्या मोबाईलच्या आठवणी निगडित आहेत. एक पिढी लँडलाईन ते मोबाईल हा प्रवास पाहू शकली अन् एक पिढी मोबाईल हातात घेऊन जन्माला आली. मोबाईलशिवाय आपले आई-बाप एकमेकांना ‘आय लव्ह यू’ कसे म्हणाले असतील, याचे आश्चर्य नव्वदीच्या दशकानंतर जन्माला आलेल्या पिढीला वाटते. कारण आज पत्ता शोधण्यापासून विमानाचे तिकीट करण्यापर्यंत आणि बँकांचे व्यवहार ते अलार्म लावणे ते रिमाईंडर कॉल सेट करणे, करमणुकीसाठी चित्रपट पाहण्यापर्यंत सर्व काही मोबाईलवर होतेय आणि त्याच मोबाईलमधून काही लोक कॉलदेखील करतात. खरोखरच या सगळ्यामुळे आमची जीवनशैली पार बदलून गेली. आता प्रत्येक जण प्रत्येकाशी जगात कुठेही असला तरी कनेक्टेड असतो. एरिक्सन या कंपनीने मोबाईल सुंदर केले. आज मोटोरोला मोबाईलची रेनबो सीरिज आठवते. लाल, हिरवा, पिवळा आणि निळा अशा चार रंगात ते मोबाईल फोन मिळायचे आणि त्यावर ग्राहकांच्या, विशेषतः महिलांच्या उड्या पडायच्या. मग त्या मोबाईल रंगाला मॅच होणारी ज्वेलरी मार्केटमध्ये आली अन् फॅशनविश्वाचे एक वर्तुळ पूर्ण झाले. पुढे मोटोरोलाने बाजारात आणलेले ‘पिंक रेझर’ हे मॉडेल जबरदस्त यशस्वी ठरले. अरबस्तानातले अरब असोत, दक्षिण अमेरिकेतील लॅटिनो असोत अथवा फ्रेंच किंवा जॅपनीज असोत; प्रत्येकाला मोबाईल फोनची भुरळ पडली होती. त्याच काळात तुमच्या हातात कोणता मोबाईल आहे यावर तुम्ही कोण, तुमचे स्टेटस काय ते ठरायला सुरुवात झाली. १५ वर्षांपूर्वी मोबाईल कनेक्टिव्हिटीचे खूपच प्रश्न यायचे. वारंवार कॉल ड्रॉप व्हायचे.
टेक्स्टऐवजी मोबाईलमध्ये व्हॉईस आणि व्हिज्युव्हल्स आली आणि मग २ – जी वरून ४-जी आणि आताचे ५ – जी अशी जबरदस्त क्रांती झाली. स्क्रिन मोठे झाले, टायपिंग करणे सुलभ झाले. मोबाईलला सुबक अशी कव्हर्स आली. कॉलर ट्यून्स आल्या. भजनापासून स्वतःच्या आवाजापर्यंत कॉलर ट्यून देणाऱ्या कंपन्या कोट्यवधींच्या उलाढाली करू लागल्या. १९९२ मध्ये डिसेंबर महिन्यात पहिला टेक्स्ट मेसेज केला गेला. तो होता, हॅप्पी ख्रिसमस आज सेकंदाला अक्षरश: करोडो एसएमएस, व्हॉटस अॅप आणि द्विवरवर पाठवले जात आहेत. आधी मेसेजमध्ये १६० अक्षरेच टाईप करता यायची. परवा एका पट्ट्याने ४०० पानांची कादंबरी मोबाईलवरून टाईप करून पाठवली. इतका हा प्रवास थरारक आणि वेगवान आहे. आता तर मोबाईल रिपेअरची आणि रिसेलची दुकानं गल्लोगल्ली दिसतात. ती अलोट धंदा करत आहेत. या सगळ्यात आमची लिखित भाषा मात्र बिघडली. मोबाईलवर टाईप करताना शब्द कधी ‘श्रींक’ झाले ते आम्हाला कळलंच नाही. या सगळ्यात निवांतपणा गेला. झोपेच्या वेळा कमी झाल्या. पाठीचे आणि मानेचे रोग वाढले. माणसे समोर बसून मोबाईल बघतात, तेव्हा तुमच्याबरोबर असतातही आणि नसतातही. मार्टिन कूपर यांनी अलीकडेच म्हटले होते की, आता हे मोबाईल ॲडिक्शन कमी करायची वेळ आली आहे. त्याचा आता प्रत्यय येत आहे.
उदय निरगुडकर, (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)