शपथ घेऊन सांगतात,
आम्ही करु जनसेवा.
सत्ता देल्ली हातात की,
खात बसतात मेवा.
खड्ड्यात गेली जनता,
तुमचा खड्ड्यात गेला पक्ष.
खुर्ची कशी भेटेल ?
फक्त एवढ्यावरच लक्ष.
सोयर-ना-सुतक फक्त,
खुर्ची साठी मरतात.
तेच तुझी आषाढी ला,
पहीली पुजा करतात.
पापं जिथं धुतल्या जातात,
तेच बनते गंगा.
अजब तुझा न्याय राज्या,
व्वारे पांडुरंगा.!
नाही राहिला न्याय येथे,
नाही राहिली नीती.
भ्रष्टाच्यारी नेत्यांना,
फक्त ईडीचीचं भीती.
तिथेचं टेकले गुडघे त्यांचे,
कसा घेतील पंगा.?
अजब तुझा न्याय राज्या,
व्वारे पांडुरंगा.!
नेतेगीरीच्या नावाखाली,
हे गुंडगिरी करतात.
ह्या हेल्याईच्या टकरीत,
गोरगरीब मरतात.
कुठे लावतात भांडणं,
अन् कुठे करतात दंगा.
अजब तुझा न्याय राज्या,
व्वारे पांडुरंगा.!
देवस्थानच्या कारभारासाठी,
नेमतात विश्वस्त.
देवस्थानचा माल सारा,
तेचं करतात फस्त.
वाढपेच उठवतात,
पंगतीत बंगा.
अजब तुझा न्याय राज्या,
व्वारे पांडुरंगा. !
कोणाले म्हणावं नेता,
अन् कसा ओळखावं संत ?
हेच करून राह्यले,
साऱ्या देशाचा अंत.
धुवू धुवू खाल्ला यायनं,
देश केला नंगा.
अजब तुझा न्याय राज्या,
व्वारे पांडुरंगा.!
भरमसाठ पगार असते,
तरी करतात संप.
पैसा नाही मावत त्याईच्या,
घरी पेट्रोल पंप.
पैस्याजवळचं पैसा जाते,
होत राह्यते चंगा.
अजब तुझा न्याय राज्या,
व्वारे पांडुरंगा.!
ज्याचा आहे माल इथं,
त्याचेच होतात येले.
मलिदा खाऊन फुगतात,
बाजारातले हेल़े.
पाणी घालते माळी,
अन् मकरंद खाते भुंगा.
अजब तुझा न्याय राज्या,
व्वारे पांडुरंगा.!
—————————————-
गणेश उत्तमराव साखरे
माहुली (धांडे) ता.- दर्यापूर
जि.- अमरावती.
मो.न.- ९९२१५४९०५५