शिवसंघ प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहावं विश्व मराठी संमेलन येत्या २६ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय जहाजावर रंगणार आहे. जगातील अशा प्रकारचं हे पहिलं तरंगतं साहित्य संमेलन लक्षद्वीपमध्ये होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद नौदलाचे निवृत्त अधिकारी ‘शौर्य चक्र’ पदकानं सन्मानित, कमोडोर जय चिटणीस संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत; स्वागताध्यक्षपदी निलेश गायकवाड आहेत आणि संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे.
गेली नऊ वर्षे वैश्विक स्तरावर मराठी साहित्य संमेलन भरत आहे. अंदमान, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, मॉरिशस, भूतान आणि इंडोनेशिया येथील बाली, दुबई आणि कंबोडिया येथे ही संमेलने भरली आहेत. संमेलनाचे दहावे पुष्प आंतरराष्ट्रीय जहाजावर होणार आहे.
यापूर्वी स्व. निनाद बेडेकर, विनय सहस्रबुद्धे, विजय कुवळेकर, डी. एस. कुलकर्णी, श्याम जाजू, ज्येष्ठ संपादक संजय आवटे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. गो. बं. देगलूरकर, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले आदींनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.