मधुमेहाचा त्रास सहन करीत असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. लवकरच मधुमेही रुग्णांची इन्सुलिनच्या वेदनांपासून सुटका होण्याची शक्यता आहे. येत्या दोन-तीन वर्षांत इन्सुलिन स्प्रे बाजारात येऊ शकतो. त्याच्या मदतीने रुग्ण इंजेक्शनऐवजी तोंडावाटे इन्सुलिन शरीरात घेऊ शकतील.
प्राप्त माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली कंपनी निडलफ्री टेक्नॉलॉजी प्रा. लि. ने दावा केला आहे की, सुईशिवाय ओरल इन्सुलिन स्प्रे निर्मितीचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. हा जगातील पहिला इन्सुलिन स्प्रे असेल, याला ओझुनील नाव दिले गेले आहे. कंपनीची सुरुवात हैदराबादमध्ये रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट कंपनी ट्रान्सजीन बायोटेक लिमिटेड नावाने झाली होती.
सध्या कंपनीने चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. माध्यमांशी बोलताना कंपनीचे संस्थापक संचालक डॉ. के. कोटेश्वर राव यांनी सांगितले की, कंपनीने सेफ्टी आणि टॉक्सिकोलॉजी स्टडीजच्या मंजुरीसाठी सीडीएससीओ म्हणजे सेंट्रल ड्रग्स स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनकडे अर्ज केला आहे. त्यानंतर स्प्रेचे ह्युमन क्लिनिकल ट्रायल सुरू केले जाईल. डॉ. राव यांनी सांगितले की, कंपनी कर्करोग, ओस्टियोपोरोसिस आणि अल्झायमरसारख्या आजारांवरही ओरल (तोंड) आणि नेझल (नाक) मार्फत घेण्यात येणाऱ्या स्प्रे निर्मितीवर काम करीत आहे. भारतासह जगातील अनेक देशांतील कोट्यवधी लोक मधुमेहासारख्या आजारांचा सामना करत आहे. या आजारावर अनेक औषधे उपलब्ध आहेत. मात्र, स्प्रे वापरायला सुविधाजनक होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (वृत्तसंस्था)