अमेरिकन एक्स्प्रेसचे सर्वेक्षण
या वर्षात देशातील लोकांसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासह वैयक्तिक वित्त हे सर्वोच्च प्राधान्य क्षेत्र असल्याचे अमेरिकन एक्स्प्रेस या जागतिक एकात्मिक पेमेंट कंपनीच्या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. अमेरिकन एक्स्प्रेसच्या ‘एमेक्स ट्रेंडेक्स’ या सर्वेक्षण अहवालानुसार, सर्वाधिक ७६ टक्के लोकांनी सर्वेक्षणामध्ये आरोग्याला प्राधान्य द्यायला हवे, असे म्हटले आहे. तर ६९ टक्के भारतीयांसाठी वैयक्तिक वित्त हे दुसरे प्राधान्य क्षेत्र आहे.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन, जपान, मेक्सिको आणि भारतातील लोकांमध्ये ऑनलाइन सर्वेक्षण ६ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये ६,७०० पेक्षा जास्त सहभागी झाले होते. या ऑनलाइन सर्वेक्षणात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असण्याला ७३ टक्के लोकांनी महत्त्व दिले आहे. निरोगी खाण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर जास्त भर देण्यात येणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. दुसऱ्या बाजूला ५१ टक्के लोकांनी घरात व्यायामासाठी मशीन आणण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. वैयक्तिक वित्त उद्दिष्टांच्या संदर्भात सर्वेक्षणात ८१ टक्के लोकांनी बचत करण्यासाठी आणि ७५ टक्के लोकांनी जास्त गुंतवणूक करण्याकडे कल दाखवला आहे. सोबतच भारतीय पर्यावरणपूरक उपाययोजनांकडेही लक्ष देत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. जवळपास ५९ टक्के भारतीयांनी कमी प्लास्टिक किंवा सिंगल-युज उत्पादने वापरण्याची योजना आखली आहे आणि ५८ टक्के भारतीय त्यांच्या घरी पुनर्वापर करण्याच्या सवयी सुधारण्यास इच्छुक आहेत.
सर्वेक्षणात सहभागी झालेले जागतिक आणि भारतीय त्यांच्या नवीन वर्षाच्या संकल्पांमध्ये त्यांच्या शारीरिक आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. सुमारे ७६ टक्के भारतीय आणि ७५ टक्के परदेशी नागरिकांनी याला प्राधान्य क्षेत्र मानले. वैयक्तिक वित्ताचा विचार करता ६९ टक्के भारतीय वैयक्तिक वित्त उद्दिष्टांबद्दल गंभीर आहेत, त्या तुलनेत जागतिक पातळीवर हे प्रमाण ५१ टक्के आहे, असे अमेरिकन एक्स्प्रेस बँकिंग कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रादेशिक व्यवस्थापक संजय खन्ना यांनी सांगितले.
मानसिक आरोग्याबाबतही जागरूकता : लोक मानसिक आरोग्याबाबतही जागरूक असल्याचा कल या सर्वेक्षणामध्ये दिसून आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्के भारतीय कामाच्या ठिकाणी त्यांच्या मानसिक आरोग्याला अधिक प्राधान्य देत आहेत. लवचिक कामाचे पर्याय (६१ टक्के) आणि सहयोगी कामाचे वातावरण (६० टक्के) हे नोकरीतील समाधानाचे प्रमुख घटक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.