धर्मराज नारायण गुरु महाराजांचा जन्म प्रभु रामचंद्राच्या अयोध्या नगरीतला. त्यांचे मूळ नाव धर्मराज. धर्मराज त्या वेळी जेमतेम सहा-सात वर्षाचे असतील तोच एका रात्री गाढ झोपेत असतांना, करवती काठाचे धोतर नेसलेले, अंगात रेशमी अंगरखा, खांद्यावर जरीचे उपरणे, डोक्यावर जरीची टोपी, डाव्या पायात चांदीचा तोडा, गळ्यात गुलाबाच्या फुलांची माळ, दोन्ही पायात चंदनाच्या लाकडाचे खडाऊ, अशा राजशाही थाटाची व्यक्ती धर्मराजाच्या स्वप्नात आली. आणि तेंव्हा पासून धर्मराजाला गुरु प्राप्तीचा ध्यास लागला. असे म्हणतात की, मनुष्याला एकदा का गुरुचरणाचा ध्यास लागला की, मणुष्य सर्व मोह-मायेपासुन मुक्त होतो. आणि नेमके तसेच घडले.
” गुरुचरणाची गोडी, मोह-माया बंधन तोडी “
धर्मराजाने बालपणीच आई-वडील, घरदार सर्व काही सोडून दिले आणि भ्रमंती करीत करीतच विदर्भातील शेगाव नगरीत येउन पोहोचले. शेगावच्या राजाने गुरु भेटीसाठी तळमळणाऱ्या त्या बालकाचं अंतर्मन ओळखलं आणि अमरावती च्या दिशेने बोट दाखवून गजानन महाराज म्हणालेत, बाळा जा ज्यांना तु शोधतो आहेस ते पुर्वेकडे आहेत. धर्मराज शेगावातुन निघालेत आणि सरळ अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात माहुली (धांडे) येथे महादेवाच्या मंदिरात येऊन बसलेत. तेंव्हा धर्मराजाचे वय असेल अंदाजे आठ-दहा वर्षाचे. त्यांचे नाव, गाव, पत्ता कोणालाच माहित नव्हता.
कोण हा कोठीचा, काहीच कळेना!
ब्रम्हाचा ठिकाणा, कोण सांगे?
साक्षात ही आहे, परब्रह्म मुर्ती!
आलीसे प्रचिती, बहुतांना!
सोनाराला सोन्याची आणि जवाहिऱ्याला हिऱ्याची पारख करण्यास वेळ लागत नाही. त्याच प्रमाणे माहुली गावातील काही भाग्यवंतानी त्यांची पारख करून स्वगृही नेले व भक्ती भावाने आदरातिथ्य करून प्रथम दर्शनाचा लाभ स्वतःच्या पदरी पाडून घेतला.तेंव्हा पासून धर्मराज माहुली गावातच स्थायिक झालेत. तेथुन काही दिवसांनी, धर्मराज एका धार्मिक उत्सवात अमरावतीला गेले असता, अचानक तेथे परमहंस शंकर गुरू महराज त्यांच्या दृष्टीस पडले.धर्मराजाला अकस्मात आपला भुतकाळ आठवायला लागला. हे इतर कोणीही नसुन ज्यांनी आपल्याला अयोध्येत असतांना स्वप्नात दर्शन दिले आणि ज्यांच्या शोधासाठी आपण निघालोत ते हेच आहेत. आणि क्षणाचाही विलंब न करता धर्मराजाने गुरुचरणी साष्टांग नमस्कार घातलाय. परमहंस शंकर गुरू महाराजांनी आपला उजवा हात धर्मराजाच्या डोक्यावर ठेवून त्यांना उठवत म्हणाले, जा! नारायणा. आज पासून नामसप्ताह, यज्ञ चालू करा. शंकर गुरू माउलीची आज्ञा होताच, धर्मराज तेथुन निघालेत आणि माहुली, दर्यापूर, थिलोरी, शिंगणापूर, ऋणमोचन, बहिरम, मार्कि, सावरा-मंचनपूर, आकोट इत्यादी ठिकाणी अखंड नामसप्ताह, यज्ञ, अन्नदान चालू केलेत. तेंव्हा पासून लोक त्यांना नारायण गुरु महाराज म्हणुन ओळखायला लागलेत. ” धर्मराज नारायण गुरु महाराज माहुलीकर ” म्हणून महाराजांची सर्वदूर ख्याती पसरली. आणि त्याच बरोबर ” नारायण गुरुची माहुली ” म्हणून गावाची सुद्धा नव्याने ओळख झाली. महाराजांच्या हातुन अखंड नामसप्ताह, अन्नदानाचे भव्य व दिव्य असे कार्यक्रम नेहमीच चालू राहत असत. पण जे काही होते आहे ते माझे गुरु परमहंस शंकर गुरू महाराजांच्याच सत्तेने होत आहे. असा नारायण गुरु महाराजांचा ठाम विश्वास.
महाराजांची त्यांच्या गुरुंप्रति असणारी श्रद्धा व त्यांची गुरुनिष्ठा यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. धर्मराज नारायण गुरु महाराजांच्या हस्ते चालू झालेले सर्व कार्यक्रम आजही वर्षे भर अखंडपणे चालत असुन त्यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणेच होत आहेत. त्यात यत्किंचितही बदल झालेला नाही.
महाराजांच्या हस्ते होणाऱ्या नामसप्ताह व अन्नदानाच्या कार्यक्रमात लाखो रुपयांचा खर्च पण त्यांनी कधीच कोणासमोर हात पसरला नाही. आणि एक रुपयाही स्वतः जवळ बाळगला नाही. निरंतर होणाऱ्या या नामसप्ताह व अन्नदानाच्या कार्यक्रमात आपलाही सहभाग असावा या उद्देशाने अनेक तत्कालीन निष्ठावंत दानशूर भक्तांनी शेतजमिनी दान दिल्यात. त्यांच्या आग्रहास्तव महाराज फक्त होकार द्यायचे पण त्या संपत्तीच्या मोहात न पडता, तिथेच उपस्थित असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला ती जमीन वाहीपेरी व देखरेखीकरीता देउन टाकायचे. त्या मालमत्तेची परस्पर तिथेच विल्हेवाट लावल्यानंतर पुन्हा कधी महाराजांनी त्या जमीनीवर आपला स्वतःचा मालकी हक्क दाखवला नाही.त्या वाहीतदाराला पिकाचा हिशोब कधी विचारला नाही. आणि पैशाची मागणी कधी केली नाही.
महाराजांच्या अंगावर ना कधी भगवे वस्त्र, ना कधी गळ्यात रुद्राक्षाची माळ, ना कपाळाला गंधाचा भला मोठा टिळा. बाह्य स्वरूपावरून तर महाराज कधीच कोणाला संत म्हणून ओळखता आले नाहीत. पण अचानक घडणाऱ्या एखाद्या घटनेतून किंवा प्रसंगातून त्यांच्या अंगी असणाऱ्या अद्भुत दैवी शक्तीची व अलौकिक सामर्थ्याची जाणीव अधुन-मधुन लोकांना होतचं होती. आणि आजही महाराजांच्या साक्षात्काराची अनुभुती अनेकांना येतच आहे.
संत तोचि जाणा जगी,
दया क्षमा ज्यांचे अंगी!
लोभ अहंता न ये मना,
जगीं विरक्त तोचि जाणा!
दया, क्षमा, शांती हे गुण तर महाराजांच्या अंगी उपजत होतेच. पण माया, मोह, लोभ, मत्सर इत्यादी विकारांनाही तेथे थारा नव्हता. अहंकाराचा वारा तर महाराजांच्या अंगाला कधी शिवलाच नाही. आणि मान, सन्मान, प्रतिष्ठा इत्यादी गोष्टींचीही त्यांना कधी गरज वाटली नाही. जगाला सन्मार्ग दाखवून विश्व कल्याण साधणारे ” धर्मराज नारायण गुरु महाराज माहुलीकर ” म्हणजे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती या तुकोबारायांच्या निकषावर तंतोतंत उतरलेले संतरुपी परमेश्वरी अवतारच.
दर्यापूर तालुक्यातील १)श्री समर्थ विद्यालय माहुली (धांडे), २) नारायण गुरु विद्यालय गायवाडी ह्या दोन शिक्षण संस्था सध्या महाराजांच्या नावाने अस्तित्वात असून, ” धर्मराज नारायण गुरु महाराज माहुलीकर ” हे माहुली गावाचे आराध्य दैवत मानल्या जात आहे. माहुली गावातील असंख्य तरुण मुले भारतीय सैन्यात दाखल झाले असून, ही महाराजांचीच कृपा समजल्या जात आहे. त्यामुळे गावातील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण कमी झाले असून, गावाला आर्थिक संपन्नता लाभलेली आहे. व गावातील युवा पिढी देशरक्षणाच्या कामी येत असल्यामुळे गावाला त्यांचा सार्थ अभिमान वाटत आहे.
माहुली गावात दरवर्षी कार्तिक वद्य प्रतिपदेला तिर्थ स्थापना होउन नामसप्ताहाला सुरवात होते. व सातही दिवस भजन, पूजन, किर्तन, होम-हवन, यज्ञ व अन्नदान इत्यादी धार्मिक कार्यक्रमाची मेजवानीच असते. गावातील रस्ते येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गर्दीने फुलून गलेले असतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भावभक्तिचा आनंद ओसंडून वाहत असतो. या ताण तणावाच्या युगात असे आनंदाचे क्षण फार क्वचितच अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच हा सात दिवसांचा उत्सव गावकऱ्यांना आनंदाची पर्वणीच ठरते. या पुर्ण उत्सवाची सांगता म्हणून कार्तिक वद्य अष्टमीला चंद्रभागा नदीच्या तीरावर वाळवंटात दहिहांडी फुटून भव्य अशी यात्रा भरते. माहुली येथे भरणाऱ्या यात्रेची सुरवात स्वतः महाराजांनीच केली असून, या यात्रा महोत्सवात सर्वच जातीधर्मातील लोकांचा सक्रिय सहभाग असल्याने एकोप्याचे विलोभनीय दर्शन घडते. म्हणूनच ही यात्रा सामाजिक एकात्मतेचे सुद्धा प्रतीक मानल्या जाते. माहुली येथील सुना भाउबिजेला माहेरी जाउन यात्रेवर हजर होतात. तर या उलट लेकी दिवाळीला न येता यात्रेलाच माहेरी येतात. यात्रेवर येतांना पती व मुलाबाळांसोबतच त्यांच्या सासरचे इतरही नातेवाईक सुद्धा त्यांच्या सोबत असल्यामुळे, यात्रेनिमित्त होणाऱ्या भेटी-गाठीतून दुरावलेली नाती जोडली जात असून नात्यातला ओलावा जपल्या जातो. माहुली गावातील नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी रहिवासी झालेले अनेक कुटुंबातील सदस्य सुद्धा यात्रेनिमित्त आपल्या जन्म भुमीत परत येत असल्यामुळे हा आल्हाददायक सोहळा द्विगुणित होउन, आनंदाला पारावर राहात नाही.

लेखक- गणेश उत्तमराव साखरे
माहुली (धांडे) ता. दर्यापूर, जि. अमरावती.
मो.न.-९९२१५४९०५५
M gusakhare@gmail.com