वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
प्रस्तुत कथा महाभारताच्या शांतिपर्वात राजधर्मानुशासन या प्रकरणात आली आहे. अध्याय ५९. भीष्माचार्य युधिष्ठिराला राजधर्म समजावून सांगत असताना युधिष्ठिराने विचारले की, राजा या शब्दाची उत्पत्ती कशी झाली? ते मला सांगा. त्यासंदर्भात भीष्मांनी ही कथा सांगितली. ___ फार पूर्वी, कृतयुगात राज्य नव्हते व राजाही नव्हता. दंड नव्हता व दंडनीय व्यक्तीही नव्हत्या! याचे कारण माणसे धर्माला अनुसरूनच परस्परांशी व्यवहार करत होती; परंतु कालांतराने माणसे फार उद्विग्न झाली. त्यानंतर मोहवश झाल्याने त्यांच्या ज्ञानाचा लोप झाला व ते सारासार विवेक विसरून स्वैरपणे वागू लागले. हे करू नये, ते करू नये अशी काही शिस्तच राहिली नाही. त्यामुळे सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले व त्यांनी ब्रह्मदेवाला यातून मार्ग काढावा अशी विनंती केली. तेव्हा ब्रह्मदेवाने एक लक्ष अध्यायांची निर्मिती केली. यात ब्रह्मदेवाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांचे वर्णन केले. याचे वर्णन विस्तृत असल्याने येथे देता येत नाही. नंतर या राजनीतीचा भगवान शंकराने स्वीकार केला. भावी काळात प्रजेचे आयुष्य उत्तरोत्तर कमी होत जाणार हे जाणून भगवान शंकराने नंतर संक्षेप केला.

वैशालाक्ष नावाने प्रसिद्ध असलेले हे शास्त्र नंतर इंद्राला प्राप्त झाले आणि त्याने त्याचा पाच हजार श्लोकात संक्षेप केला. या संक्षेपाला ‘बाहुदंतक’ असे नाव आहे. त्यानंतर बृहस्पतीने आपल्या प्रज्ञेने याचा तीन हजार श्लोकात संक्षेप केला. याला ‘बार्हस्पत्य’ असे म्हणतात. यानंतर असामान्य प्रज्ञेच्या शुक्राचार्याने याचा एक हजार श्लोकात संक्षेप केला. नंतर देव एकत्र आले आणि प्रजापति विष्णूला म्हणाले की, ‘या जगातील मानवांपैकी जो सर्वश्रेष्ठ या पदवीला पात्र असेल त्याचा आपण निर्देश करा!’ यावर त्या नारायणाने विचार केला व अतिशय तेजस्वी असा विरजा नावाचा मानसपुत्र निर्माण केला. पण, त्या भाग्यशाली विरजाला आपण जगाचे प्रभुत्व करावे असे वाटले नाही. त्याच्या प्रगल्भ बुद्धीचा कल त्यागाकडेच होता. त्या विरजाचा कीर्तिमान नावाचा पुत्र होता; परंतु तोही पित्याप्रमाणेच विरागी होता. कर्दम नावाच्या प्रजापतिला अनंग नावाचा मुलगा होता. याने मात्र महाराज्याचा स्वीकार केला. पण पुढे हा इंद्रियाधीन झाला. याच परंपरेत पुढे वेन नामक पुत्राचा जन्म झाला. हा आपल्या प्रजेशी दुष्टाव्याने वागत असे व तो राग आणि द्वेष यांच्या आहारी गेला होता. ब्रह्मवादी ऋषींनी मंतरलेल्या दांनी त्याचा वध केला; परंतु मग राज्य कोण करणार? या विचाराने ऋषींनी दर्भाने त्या वेनाची उजवी मांडी फोडली तेव्हा त्यातून एक कुरूप, वामनमूर्ती, जळून गेलेल्या काष्ठाप्रमाणे दिसणारा असा एक पुरुष बाहेर आला. त्या पुरुषापासून पुढे पर्वतांवरील रानामधे राहणारे क्रूर निषाद निर्माण झाले. नंतर महर्षांनी वेनाचा उजवा हात फोडला त्यातून इंद्राप्रमाणे दिसणारा पुरुष निर्माण झाला. त्याने चिलखत धारण केले होते. त्याच्या कमरेला तलवार होती व त्याच्याकडे धनुष्यबाण होते. तो वेदवेत्ता होता व धनुर्वेदामधेही पारंगत होता. तो वैन्य (वेनपुत्र) ऋषींना म्हणाला की, धर्माचे मर्म जाणू शकणारी सूक्ष्म बुद्धी मला प्राप्त झाली आहे. तिचा मी उपयोग कसा करावा ते मला सांगा. त्यावर ऋषींनी त्याला विकारांपासून दूर राहण्याचा व सर्व प्रजेशी समान वागण्याचा उपदेश केला. याने सर्व पृथ्वीचे पितृवत पालन केले. त्याने प्रथमच समविषम असलेली भूमी सपाट केली. नंतर वैन्याने आपल्या धनुष्याच्या टोकाने सगळीकडच्या शिलांचे समूह उचलून टाकले. त्यामुळे पर्वतांची उंची वाढली. विष्णूने व इंद्राने देव ऋषी, प्रजापाल आणि ब्राह्मण यांच्या समवेत वैन्याला अभिषेक केला. हा विष्णूपासून आठवा पुरुष होय! हा सर्वच बाबतीत महान होता, म्हणून त्याला पृथु म्हणत. याच्या राज्यात वार्धक्य, दुष्काळ, शारीरिक किंवा मानसिक व्याधी नावालाही नव्हत्या. तो वैन्य रक्षण करणारा असल्याने लोकांना साँचे भय नव्हते किंवा चोरांचे भय नव्हते किंवा परस्परांचेही भय नव्हते. त्या वैन्याने पृथ्वीचे दोहन केले व तिच्यातून सतरा धान्ये काढली. यक्ष, राक्षस आणि नाग यांच्यापैकी ज्याला ज्याची अपेक्षा होती ते सर्व त्याने पृथ्वीपासून प्राप्त करून घेतले. या वैन्याने सर्व जग धर्मनिष्ठ करून सोडले. त्याने प्रजेचे रंजन केले म्हणून त्याला राजा ही पदवी प्राप्त झाली. (रंजनात्राजा) ब्राह्मणांचे त्याने संकटांपासून रक्षण केले म्हणून (क्षत् त्राण) त्याला क्षत्रिय म्हण लागले. त्या वैन्य पृथुच्या गुणांमुळे पृथ्वी ही ‘पृथ्वी’ या संज्ञेने विख्यात झाली. हा पहिला राजा, ज्याच्या काळात एक सुविहित सुसंस्कृत व्यवस्था सुरू झाली. याच्या या आदर्श वर्तणुकीमुळे हा जेव्हा समुद्रातून जाऊ इच्छित असे तेव्हा समद्राचे पाणी त्याचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून शांत होत असे. पर्वत त्याला रस्ता देत असत आणि पर्वतातील दुर्गम भागातून जात असताना त्याच्या रथावरील ध्वज कधी कोसळून पडला नाही असे वर्णन आहे. एकूण धर्मनिष्ठ आणि प्रजाकल्याणात दक्ष असलेला राजा असेल तर पंचमहाभुतेदेखील त्याच्यापुढे झुकतात असे म्हणता येते. पुढे योग्यवेळी आपल्या पुत्राला राज्यावर बसवून हा धर्मनिष्ठ राजा आपली पत्नी अर्चि हिच्यासह वनात तप करायला निघून गेला व तेथे कठोर तप करून त्याने देहत्याग केला. असे हे कविकल्पना वाटावी इतके आदर्श चरित्र आहे.
वासंती देशपांडे
deshpandevasanti6@gmail.com