संज्या अन बाल्या हे लहानपनापासूनचे जिगरी अन् लंगोटी मैतर असतात. संज्या हा सा-यात शीरीमंत मानगरपालीका बंबईत झाळू खात्यात नोकरीले लागेल अस्ते. त्याचा जिगरी दोस्त संज्या बंबईले गेल्यानं बाल्या गावात एकटा एकटा पळते. बाल्याले संज्या बगर गावात करमत नाह्यी. बाल्याले बंबई पा ची लै ईच्छा असते. पन् गणीत काह्यी केल्या जमत नाही. बाल्या लयचं अयदी अस्ते. इतका अयदी की, नाकावर माशी जरी बसली तरी तीले थो हकालत नाह्यी . जवा माशी नाकात शेंबळाच्या शोधात नाकपुळीत घुसनं अन् जवा शिक येयनं तव्हा आपोआपच शीकीनंच शेंबाळाच्या लाटेत थे बाहेरी येयनं इतका जबरदस्त अयदी असते थो. त्याले सा-याच गोष्टीचा कटायं येते…जेवाचा, चालाचा, बोलाचा… जगन्यासाठी ऊलीसक कसाबसा खाते त हागाचाही…. असा हा ईबलीस, अकल्पित, अतरंगी, इरसाल अन् अयदी बाल्या.
वावरात कायी केल्या थो जात नाही. चार कोस चालनं कोनं? वावरातं घाम गायेलोग काम करन कोनं ? ऊन्हीतान्हीचं ऊप्पट सोंगेपना करनं कोनं?
ह्याचं ईचारानं अनं कारनानं बाल्याचं त्याच्या बुड्यासंग अजीबात पटत नसते. त्याचा बुडा परतापराव त्याले लय समजावते…पन् बाल्या ह्या कानानं आयकूनं दुस-या कानानं जलद गतीनं सोळूनं दे. डोक्शावूनं पाखरू ऊळल्या सारखं थो करे.
एका दिशी बाल्याचं अन त्याच्या बुड्याचं लयचं झमकते.
परतापराव बाल्याले म्हनते…
” बाबू तू कामाले जात नाही!…ना वावरात पाय ठेवतं नाही. इतका अयदीपना करतं. कस होईनं तुह्यं. देव जानो. आता तू तरनाताठा झाला. घराले हातभार लावाव… अन् अश्यानं तुले कोनं पोरगी देनं रे…पासल्या पायरी ऊठतं, न धळ खात नाह्यी , ना कुठं बाहेर निंगत,ना भळभळ बोलत ..तुह्या मनात नक्की हायं तरी काय? थे तरी मले सांग. “
” तुम्ही काहाले यवळी कायजी करता हो! माह्या लगनाची.मी लगनचं करत नाही ना ….”
” बाप्पा ! लगे ह्या घरादाराले वारस नाह्यी पायजे कायं बावा.. “
” देवूनं टाकनं मी घरदार, वावरं एखांद्या अनाथ आश्रमाले..”
” वा! रे वा! लेका. म्या दिसरात मेहनत करूनं हे सारं घामावर कमावलं अनं तू म्हनतं.देवून टाकतो…
ऊद्या पासूनं वावरात गेला तं बरं…”
” नाही गेलो त काय करसानं…”
” बाल्या! तोंड नोको चाटू सांगूनं ठेवतो..”
” काय लावलं हो. पायटी पायटीच टपर टपर तं..”
” तुह्या मायचं बेनं त. मॅटचोद्याचं…
नि-हा तोंडोतोंडी येवूनं राह्यलं कवाचं सायाचं तं…”
” ओ! बा सरके सुदे बोला. आता मी काह्यी लान नाह्यी राह्यलो सांगूनं ठेवतो.. “
” आळ्याले टेकला की, अभायाले रे! अखीनं तुह्ये तं माह्याम्होरं दुदाचे दात नाह्यी पळले. तुह्ये व्हठ पीयले तं दुद निंघनं… अन् मले शिकोते फोकनीचं.. “
” ओ! शिव्या नोका देवू हं . सांगूनं ठिवतो…”
” एका टेम्प्यात सायाच्या तुवं कम्बंळकचं मोळनं जादा बोलसनं तं.. “
तितक्यात बाल्याची माय कमला दोघाच्या भांडनात पळते …
” काय लावलं काजूनं पायटी पायटीचं बाप लेकानं निरा किरकिर किरकिर- किटकिट किटकिट . कधी पटनं काजूनं बापलेकाचं…निरा दुश्मनावानी वागतात…. “
” ओ! मा बा ले समजावं. लयच दिमाक चाटूनं राह्यले थे…”
बाल्याले बापाचा लय राग येते. थो त्याचा मैतर संज्याले बंबईले लगेचं फोन लावते…
” हलो , संज्या .”
” कोन हायं.”
” अबे ! मी बाल्या हवं ना लेका. अवाज ही ईसरला काय दो दिवसात बंबईच्या चकाचांद दुनियेत जावूनसन्या. “
“अरे बापरे लय दिसानं फोन केला बे. काय म्हनतं सांग नं . “
” तुह्यी आठोनं आल्ती . अनं गावात जरा मन ही ऊबगलं . लेका ! मले मुमई पा ची हाय नं कवा दाखोशीन .”
” येनं कवाही लेका तुह्यासाठी माह्यं कवाळ कवाही खुल्लचं हायं.”
” अबे लेका कवाळ खुलं नोको ठुवतं जावू. तिकळे लय चोरं , डाकू हायेत म्हनतात .”
“कायचे चोर न कायच कायं , लय चांगली हाय मुमई लेका . फक्त परदूशन लै हायं बस्स. कवा येत मंग सांग. “
” चारक दिवसानं निंघतो , कस या लागते सांग बरं .”
” अबे ! लै सोप्पीच हायं..अंबा इसपेरेस पकळाची. अन दादरले ऊतराचं. मी येतो तुले पायटीच सा वाजता तथिसा घ्याले.”
” अबे !लेका मी हारपीन त नायी ना . मले लय भेव लागते गळ्या… म्हणतात तथीसा लोक मुंग्यावानी हायेत. कोंबळ्याच्या खुराड्यावानी रायल्यावानी रायताय ऊल्शा घरात. नीरा धावा धावा नं पया पया हायं. तुले त माईतचं हायं आपलं कामं कस अरामशीरं असते तं…”
संज्याले माईतचं असते बाल्या किती अयदी हायं म्हनूनसन्या…संज्याले हासू येते. हासू दाबत संज्या म्हनते…
” अबे तू ये त खरी . तुले अख्खी मुमई फिरोतो की नायी पायं लेका मंग.”
” बर येतो मंग.”
” ये मंग अंऽऽऽ . निंघाच्या दिवशी मले पयले फोन करजो…”
बाल्या चार दिसानं ऊमरावती वरूनं अंबा इसपेरेसनं निंगते. जनरल डब्यात घुसाले पायते त काय जनरल डब्बा हाऊस फुल्लं…कसा तरी डब्यात चळते…. रातभर जागा नसल्यानं त्याचे हातपाय अखळतात. रातभर बाल्या जागीचं असते वटवाघूया सारखा . दुस-या दिशी पायटी साळेसाले दादरले ऊतरते . संज्या बाल्याले दादर ठेसनावर घ्याले येते. बाल्या दादरले ऊतरल्या बरोबर नजर फिरोते. जिकळे पा तिकळे लोकचं लोकं थ्याले दिसते. ‘ कुठ जात असनं ब्वा पायटीचं हे लोकं. ‘ असा बाल्याच्या मनात ईचार येते. एका जागी लोकं बाल्याले थांबूचं देत नाही. लोकं बाल्याले अन त्याच्या झो-याले लोटत राह्यतात. बाल्या सरकत्या जीन्याजौळ येवूनं ऊभा राह्यते. गरदीत त्याचा जीव लयच गुदमरते . संज्या त्याले काही दिसत नायी . बाल्या फोन करते. संज्या हात वर करते . दोघाची भेट होते. दोघही ठेसनाच्या बाहेरं येतात. दोघही गुयना करूनं एक एका वळा पाव खातात. दोन कटिंग मारतात.संज्या बाल्याले त्याच्या घरी नेते. दाट लोकवस्तीची धारावी झोपळपट्टी पाहूनं बाल्या संज्याले म्हनते…
” अबे! गावात तुह्यं टोलेजंग घर हायं दोन मजली. अनं अतिसा तू ह्या झोपळपट्टीत राह्यतं…एखांदा प्लाॅट घे अनं बांधूनं टाकं.. “
संज्या गालातल्या गालात हासाले लागते…
” काय झालं बे हासाले…”
” इथं करोडपती लोकंही प्लाॅट घेवू शकत नाही. लै महाग हायं अतिसा जमीनं… बरं आंघोय कर मंग आपनं दादरच्या चौपाटीवर फिराले जावू… दोन दिसाची सुट्टी टाकेलं हायं तुह्यासाठी. मस्त फिरू बंबई.”
” बरं..”
बाल्या मस्त दोन खेपा साबू लावून आंघोयं करते. कळकं ईस्तरीचे कपळे घालते .चांगभांग करूनं पावडर लावूनं तयार होते. संज्याचही अटपते.
संज्या टॅक्सी पकळते अनं थेट दादर चौपाटीवर दोघही येतात .
” कुठ राह्यत बे तू लेका इतल्या गरदीत. याच्यापेक्षा त आपल गांव बर हायं.”
“काय करत लेका भाकरीसाठी राहा लागते अथिसा . मले काय शौक हायं कायं अतिसा राहाचा. जथिसा भाकर तथिसा राहुटी. “
दोघजनं चैत्यभूमीवर पोचतात. बाल्याले चैत्यभूमीवरली कमानं पाहूनं त्याले शाळेच्या पुस्तावरचं चित्रं आठोते. बाल्या भिरभिर चव भवतालं पाह्यते. चैत्यभूमीवरूनं सी लिंक दिसते. दोघही चैत्यभूमीवरच्या विहारात जातात. महामानवाले नतमस्तक होतात. ततीसा एक ऊलीसा बगीचा असते. ततीसा बसतात. नळाचं पानी पेतातं. चैत्यभूमीलेच लागूनं इंदूमील हायं तथिसा फेरफटका मारतात. आंबेडकरी साहित्यचे पुस्तक पाह्यतातं. भीमगीतं मस्त वाजत असतात.
मंग दोघजन शेजीचं असलेल्या चौपाटीवर पोचतात. समुद्राच्या लाटा पाहून अन सी लिंक सेतू पाहून बाल्या लय हरिकते. एवळं मोठ पानी बाल्यानं पयल्या बारमचं पायेलं असल्यानं त्याचे डोये फाकतातं. यवळ्या मोठ्या पान्याले पाहून बाल्याले लय बर वाटते. बाल्या इकळे- तिकळे डोयाच्या भरभर गारगोट्या फिरोते. समुद्राच्या फेसायत्या लाटा काठावर येवूनसन्या आदयत असतात . बाल्याले यवळं माईत असते की, समुद्राच्या पान्या पासूनं मीठं बनते. म्हनूनसन्या थो समुद्राचं पानी ओंजयीत घेवूनसन्या एक घोटं पेते. पानी खारटडक मीठावानी लागते. थो लगेच गुयना टाकते. थ्या दादरच्या चौपाटीले वाह्यतं येनारा नाला बाल्याले दिसते. त्याले असं वाटते की, लेक फालतू पेलो हे पानी…चौपाटीच्या किना-यावर त्याले मारोतीची मुर्ती ईना मंदिराची दिसते. बाल्या जौळ जावूनसन्या दरशनं घेते. भरीव हनुमंताची मुर्ती पाहुन बाल्याले गावच्या पारावरच्या मारोतीची आठोनं येते…
बाल्या अनं संज्या दोघही चौपाटीवर फिरत असताना बाल्याची नजरं चौपाटीवरल्या भीतीशेजच्या पोरं पोरीवर पळते… आंगावर छत्र्या, ओडन्या घेऊन थे असतात . बाल्या संज्याले इचारते.
” काय होय बे ! हे लेका.”
संज्या गालातल्या गालात हासते.
” अनं हे पोरं पोरी गोचीळावानी भितीले डिकूनं कामूनं बसले बापा!…”
” अरे थे बिगळेल लेकरं हायेत . तिकळे ध्यानं नोको देवू…”
” बरं थे आंगावर छत्र्या कामूनं घेवूनं राह्यले. आता कायं पावसाया हायं कायं…”
” अरे तू समिंदराले पाह्यं तिकळे ध्यानं नोको देवू….”
” दामीनी पथकं काय करूनं राह्यलं. “
” दामिनी पथकाले काय हेच काम हाय कायं…कुठ कुठ ध्यानं ठुयतीनं. नरीमन पाॅईंट , छोटा काश्मीर, चौपाट्या…पन् हे बिगळेलं लेकरं आयकतात काय. “
” अबे पन लेका अशानं आपल्या देशाची संस्कृती लोप पावूनं राह्यली ना. इदेशातले लोकं पाह्यं अतिसा किती अदबीनं वागूनं राह्यले अन हे पाह्यं सायाचे कसे वागूनं राह्यले ..”
” पेरेम असनं तेयचं एकमेकायवर.. “
” हे काय पेरेम हायं काय लेका. याले हवस असं म्हनतेतं. पेरेम कस असावं भील्ला सारखं बानावर खोचलेलं…. पेरेम त लेका म्या ही केल. पन अस ह्या भामट्यायवानी नाही केलं बावा .”
” हाव लेका; थ्या मंजीवर.”
” आमच पेरेम लय निरमळ हायं, वावरात प-हाटीत बसून घंटोनंघंटे आम्ही गुलूगुलू गोष्टी करतो . गोष्टी करता करता कापूसही येचो. पन् अस काही केलं नाही लेका. हुट लेका मले संध्याकायी बसून दे इसपेरेसमंधी मले जा च हाय गावाले. ह्या लोकायनं पार आपली संस्कृती मट्टीमोलं केली…आता मले अतिसा राहाचचं नाह्यी…”
” अबे लेका तुले गेटवे ऑफ इंडिया , नरिमन पॉइंट , जुहू चौपाटी , गिरगाव चौपाटी , नेहरू तारांगण, शिवाजी महाराज म्युझियम , तारापोरवाला, हाजी अली दरगा , सिध्दीविनायक, चालणाऱ्या पाय-या, शारूख चा मन्नत , दादासाहेब फाळके फिल्म सीटी स्टुडिओ , मोठमोठे माॅल , लोकल, मेट्रो, मोनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान , राणीचा बाग , सी लिंक, मरीन ड्राईव्ह, झुलता बगीचा, हाजी अलीचा संमिदरातला दर्गा,मुंबा देवी मंदीर, मुंबरा देवी मंदीर, वाटर किंगडम, घारापूरी लेन्या अस बरच कायी दाखवाच हायं लेका अन तू आल्या आल्या जान्याचा बाता करतं.”
” अबे काय हे मरनाची गरदी , काय धावतात , पयतात फिंगरीवानी लोकं, काय हा चौपाटीवरला तमाशा , लोकं होयं थे . वळापाव ऊभ्यानचं खातात. काय हे गटारं पन्यांयन भरलेले . किती गाळ्या मुंग्यावानी , जमीनीवर किती भार या ऊच्ची बिल्डींगायचा…जो थो आपल्याच तंद्रीत.. मले राहाचच नायी अन काह्यी पाहाचचं नाह्यी अथिसा मले संध्याकायी बसून दे मी चाललो ऊमरावतीले.”
” बर बावा देतो बसून , जशी तुही इच्छा .”
लेखक – सु.पुं. अढाऊकर.
अकोला.
९७६९२०२५९७