1913 मध्ये अमेरिकेच्या टपाल यंत्रणेनं आपल्या नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन टप पाठवण्याची व्यवस्था सुरू केली. कोणत्याही सार्वजनिक वाहनानं मुलं पाठवण्याच्या खर्चापेक्षा कमी खर्च टपालानं पाठवण्यासाठी येत होता.
आजकाल प्रसारमाध्यमांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानानं मोठीच गरुडझेप घेतल्यामुळे एकेकाळी पोस्टमनच्या आगमनाची जी आतुरता असायची, तिची कल्पना आज करता येणार नाही. व्हॉट्स अॅप, फेसबुक, ट्विटर अशा अनेक समाज माध्यमांद्वारा कोणताही संदेश, कोणतंही पत्र क्षणार्धात जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची विलक्षण सुविधा आज उपलब्ध आहे. सातासमुद्रापार गेलेल्या आपल्या माणसाशी व्हॉट्स अॅप कॉलवरून थेट बोलता येतं आणि व्हिडीओ कॉलवरून तर आपण त्यांच्याशी थेट समोर बसून बोलतो आहोत, असाही आनंद अनुभवता येतो. त्यामुळं आपलं जवळचं कुणी खूप दूर गेलेलं आहे, असं आता वाटतही नाही.
पण एक काळ असा होता की, आपलं कुणी दूर गेलं की, त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसण्याशिवाय गत्यंतर नसायचं. फक्त एकच मार्ग होता. दूरदेशी, दूर प्रांतात, दूरच्या गावाला गेलेल्या आपल्या जिवलगाची ख्यालीखुशाली कळण्यासाठी दारी पोस्टमन कधी येतो, याची दिवसेंदिवस वाट पाहायला लागायची. हा टपालदूत म्हणजे देवदूतच आहे, असं वाटायचं. आणि तातडीने निरोप देण्याची व्यवस्था म्हणजे ‘तार. पण तार आल्याचं नुसतं समजलं तरी ती कुणाची, कसली हे न पाहता घरातल्या स्त्रिया रडून आकांत मांडत. कारण तारेनं येणारा संदेश हा बऱ्याचदा कुणाच्या तरी जवळच्या माणसाच्या मृत्यूचा असायचा.
पूर्वी प्रवास करणं हेही फार जिकिरीचं असायचं. चालत जाणं, बैलगाडी, घोडे करून जाणं याला काही पर्याय नसायचा. नंतर यंत्रयुग आलं. स्वयंचलित वाहनं आली; सार्वजनिक वाहन व्यवस्था आली आणि प्रवास सुलभ झाला. घरातल्या एखाद्या मुलाला किंवा म्हाताऱ्या माणसाला जवळच कुठंतरी पाठवायचं असेल, तर राज्य परिवहन महांडळाच्या किंवा खासगी गाडीच्या वाहक किंवा चालकाला सांगून गाडीत बसवून द्यायचं आणि आधी पत्र पाठवून निरोप दिल्यानुसार तिकडे थांब्यावर त्यांना उतरून घ्यायला कुणीतरी आलेलं असायचं.
पण तुम्हांला माहीत आहे का, गेल्या शतकाच्या आरंभी अमेरिकन टपाल यंत्रणेनं घरगुती सामान पाठवण्याबरोबरच बालकं – आणि थोडी मोठी मुलं परगावी पाठवून देण्यासाठी अतिशय सुरक्षित अशी व्यवस्था केलेली होती. ती म्हणजे टपालानं बालक
आणि मुलं पाठवायची! 1913 मध्ये अमेरिकेच्या टपाल यंत्रणेनं आपल्या नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, टपालानं – मुलं पाठवण्याची व्यवस्था सुरू केली. त्या काळच्या असंख्य नागरिकांनी त्या व्यवस्थेचा लाभ घेत, आपल्या मुलांना टपालाद्वारे परगावी किंवा शहरातल्या शहरात दूरच्या ठिकाणी पाठवायला सुरुवात केली. त्या वर्षी टपालानं पाठवण्यात आलेल्या पहिल्या बालकाचं नाव जेम्स बीगल असं होतं. जेम्स केवळ आठ महिन्यांचा होता. त्याचं वजन सुमारे साडेदहा पौंड होतं. त्याला ओहियोमधून बॅटव्हियाला त्याच्या आजोळी पाठवण्यात आलं होतं. त्याच्या पालकांनी टपालखर्च म्हणून पंधरा आणि विम्याचे पन्नास सेंट्स अशी रक्कम भरली होती.
385 मैल (सुमारे 620 कि.मी.) अंतरावरील त्याच्या आजोळी जेम्सची रवानगी सुखरूपपणे झाल्यानंतर इतर पालकांनाही धीर आला व त्यांनीही आपापल्या मुलांना टपालानं पाठवायला सुरुवात केली. कोणत्याही सार्वजनिक वाहनानं मुलं पाठवण्याच्या खर्चापेक्षा कमी खर्च टपालानं पाठवण्यासाठी येत होता. तसेच, वाहनानं मुलांना पाठवण्यासाठी कुणीतरी सोबत पाठवण्याची आवश्यकता असे. टपाल खात्याचं तसं नव्हतं. मुलाला एकट्यालाच त्यांच्याकडे सोपवलं की, झालं. तसेच बालकांची काळजीही टपालखातं घेत होतं. त्यामुळं मुलासोबत कुणा नातलगाला पाठवण्याची आवश्यकता राहिली नाही.
पालक टपालाची तिकिटं त्याच्या कपड्यावर चिकटवून बालकाला टपालदूताच्या हवाली करत असत. टपालदूत प्रत्येक मुलाला व्यक्तिशः त्याच्या पोहोचवण्याच्या ठिकाणी घेऊन जात आणि संबंधित नातलगाच्या हाती तो माणूस तोच असल्याची खात्री करून घेऊन सोपवायचे. प्रवासात मुलं रडली, त्यांना भूक लागली, शी-शू झाली, तर त्याची काळजी टपालदूतच करीत असे. त्यांना आपल्या आई-वडिलांची आठवण जरी आली, तरी टपालदूत त्यांची समजूत घालून, खाऊ देऊन शांत करायचे. ही सेवा दीर्घकाळ सुरू राहिली होती. तेव्हा अमेरिकन सरकारच्या कार्यकारी शाखेतर्फे चालवली जाणारी टपाल ही स्वतंत्र सेवा होती. अमेरिकन टपालसेवा 1775 पासन कार्यान्वित झाली. बेंजामिन फ्रँकलिन हे अमेरिकन टपाल खात्याचे पहिले टपाल महासंचालक होते. त्यांनी ग्रेट ब्रिटनच्या वसाहतींनाही आपली टपाल सेवा पुरविलेली होती. टपालसेवा कायद्यासह अमेरिकन सेवा विभाग 1792 मध्ये सुरू करण्यात आला. त्या काळात अमेरिकन टपाल सेवेची राष्ट्रात मक्तेदारीच होती. त्याला कोणतीही स्पर्धा नव्हती. टपालामार्फत मुलांची रवानगी करण्याच्या यंत्रणेलाही आणखी कोणत्या खासगी संस्थेची स्पर्धा नव्हती.