गोर्बाचेव्ह यांच्यासारखी इतिहासाला वळण देणारी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी रशियन जनतेला त्याचे फारसे सुतक वाटत नाही. रशियात गोर्बाचेव्ह यांच्या निधनाबद्दल कोणीही फारसे दुःख व्यक्त केलेले नाही; कारण गोर्बाचेव्ह यांच्या धोरणाचा फायदा रशियन जनतेपेक्षा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चात्य जगाला अधिक झाला आहे.
शांततेच्या मार्गाने जगाचा भूगोल बदलणाऱ्या घटना इतिहासात फार कमी वेळा घडल्या आहेत. सोव्हिएत रशियाचे पतन ही एक अत्यंत शांतपणे घडलेली घटना आहे; पण या घटनेमळे जगाचा भगोल बदलला. त्यासाठी एक ऐतिहासिक व्यक्ती कारणीभूत ठरली, ती म्हणजे मिखाईल गोर्बाचेव्ह. सोविएत रशियाच्या इतिहासात ब्लादिमीर लेनीन, जोसेफ स्टॅलिन यांचे जसे नाव घेतले जाते, तसेच गोर्बाचेव्ह यांचेही नाव घेतले जाते; पण पूर्णत: वेगळ्या कारणासाठी. अशा या गोर्बाचेव्ह यांचे गेल्या मंगळवारी 22 ऑगस्ट 2022 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आणि एक ऐतिहासिक व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली.
दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशिया एक जागतिक महासत्ता बनला. जवळपास 70 वर्षांहून अधिक काळ त्याने जागतिक राजकारणाचे एक सूत्र आपल्या हाती ठेवले. अशा या महासत्तेचे विसर्जन, गोर्बाचेव्ह यांनी का केले? ते योग्य होते की अयोग्य? ही चर्चा यापुढेही दीर्घकाळ चालू राहील. गोर्बाचेव्ह यांनी सोव्हिएत रशियाची सूत्रे हाती घेतली तेव्हा रशिया एका तिठ्यावर उभा होता. गोर्बाचेव्ह यांच्याकडे या तिठ्यातला कोणता मार्ग निवडायचा हा एक अत्यंत गंभीर प्रश्न होता. नियंत्रित अर्थव्यवस्था आणि खर्चिक लष्करी बळावर राखलेली सत्ता यावर सोव्हिएत साम्राज्य कसेबसे तग धरून होते. रशियन जनतेला विचार स्वातंत्र्य नसले तरी त्याच्या आर्थिक गरजा सोव्हिएत साम्राज्याने सांभाळल्या होत्या.
पण अफगाणिस्तानातील सोव्हिएत आक्रमणाने रशियन अर्थव्यवस्था पार विस्कळून टाकली होती. ही विस्कळीत अर्थव्यवस्था आता सोव्हिएत साम्राज्याला जबर धक्के देऊ लागली होती. त्यामुळे लष्करी बळ राखणे तर अवघड झाले होतेच; पण सामान्य नागरिकाच्या आर्थिक गरजा सांभाळणेही सोव्हिएत राज्याच्या आवाक्याबाहेर गेले होते. या राज्याला बाह्य आर्थिक मदत मिळाली असती, तर कदाचित हे साम्राज्य सावरले गेले असते. पण सोव्हिएत रशियाला आर्थिक मदत देणार कोण? सर्व जागतिक वित्तीय संस्थांवर सोव्हिएत रशियाचा शत्रू असलेल्या अमेरिकेचे वर्चस्व होते. खुद्द रशियाच्या आर्थिक मदतीवर त्याचे पूर्व युरोपातील वॉर्सा करारातील देश अवलंबून होते.
या देशांना पोसण्याची आर्थिक अथवा लष्करी ताकद सोव्हिएत रशियाकडे राहिली नव्हती. अशा वेळी गोर्बाचेव्ह यांच्याकडे दोनच पर्याय होते. पहिला पर्याय हा त्यां रीस्टालिनने अवलंबलेला दडपशाहीचा मार्ग अनुसरणे. गोर्बाचेव्ह यांना देशात कडक निबंध लादून व आर्थिक हालाखीमुळे निर्माण होणारा जनतेचा असंतोष रक्तपाताने दडपून सोव्हिएत रशिया टिकवणे शक्य होते. माओ त्से तुंगने आणि उत्तर कोरियाच्या किम इल संगने हा मार्ग अवलंबला होता. पण हा मार्ग बदलत्या युगात अवलंबणे गोर्बाचेव्ह यांच्यासाठी खूप अवघड होते. त्यामुळे आर्थिक प्रश्न लगेच सुटले नसते.
हा असंतोष रशियन समाजाच्या सर्व वर्गात पसरला असता, तर गोर्बाचेव्ह यांना सत्ता राखणेही अवघड झाले असते(जे पुढे झालेच). गोर्बाचेव्ह यांच्यापुढे दुसरा मार्ग होता, तो सोव्हिएत साम्राज्य विसर्जित करून लष्करी दबावाने जे पूर्व युरोपीय देश सोव्हिएत कब्जात ठेवले होते, त्यांना मुक्त करून त्यांना त्यांची जबाबदारी घेऊ देणे आणि जो काही रशिया उरेल, त्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न करणे. यामुळे रशियाचा जागतिक प्रभाव संपणे अपरिहार्य होते.
पण गोर्बाचेव्ह यांनी पहिला मार्ग स्वीकारला असता तरी हा प्रभाव संपणारच होता. उलट, हा मार्ग अवलंबला असता तरी गोर्बाचेव्ह यांची नोंद इतिहासाने स्टॅलिन यांच्याप्रमाणेच ‘काळ्याकुट्ट मनाची व्यक्ती अशी केली असती. सोव्हिएत कम्युनिस्ट राजवटीत दीर्घकाळ उच्चपद भूषवूनही गोर्बाचेव्ह हे मानवतावादी राहिले होते व त्यांना सोव्हिएत रशियाच्या समस्येवर मानवतावादी उपाय शोधणेच योग्य वाटले, हेच त्यांचे मोठेपण होय. त्यामुळे त्यांनी सोव्हिएत साम्राज्याचे विसर्जन केले व रशियन महासंघाची स्थापना करून लोकशाही व्यवस्था स्वीकारली.
दीर्घकाळ कम्युनिस्ट दडपशाहीचा दमकोंडा अनुभव घेणाऱ्या रशियन व पूर्व युरोपीय समाजाला त्यामुळे एकदम मोकळा श्वास घेता आला. रस्त्यावर येऊन मनसोक्त नाचता आले, स्वातंत्र्याची अनुभूती घेता आली. पण हा आनंद फार थोडा काळ टिकला. कारण या मुक्त समाजाला नव्या आर्थिक वास्तवाचा सामना करणे अवघड गेले. रशियात गोर्बाचेव्ह यांनी फक्त राजकीय लोकशाही आणली नाही, तर आर्थिक लोकशाहीही आणली. आर्थिक लोकशाही याचा अर्थ, बाजाराधारित अर्थव्यवस्था आली. यात मागणी तसा पुरवठा, वस्तूंच्या मागणीवर आधारित किमती ठेवण्याचे स्वातंत्र्य आले. परिणामी रशियात प्रचंड महागाई वाढली. जीवनावश्यक वस्तू मिळणे अवघड झाले.
1985 मध्ये सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष झालेल्या गोर्बाचेव्ह यांनी 1990 मध्ये सोव्हिएत युनियन बरखास्त केल्यानंतर ते जेमतेम एक वर्ष सत्तेवर राहिले. त्यांच्या कारभाराविषयी एवढा असंतोष वाढला की, ऑगस्ट 1991 मध्ये कम्युनिस्ट पक्षातील त्यांच्या माजी सहकाऱ्यांनी उठाव करून पुन्हा सत्ता ताब्यात घेऊन सोव्हिएत संघाची पुन्हा स्थापना करण्याचा प्रयत्न केला. पण देशातील नवजागृत लोकशाहीवाद्यांनी हा उठाव हाणून पाडला. पण या लोकशाहीवाद्यांनी गोर्बाचेव्ह यांनाही पुन्हा सत्तेवर येऊ दिले नाही. या उठावाविरुद्ध लोकशाहीवाद्यांचे नेतृत्व बोरीस येल्तसीन या नव्या नेत्याने केले. त्यामुळे नंतर गोर्बाचेव्ह यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देशाचे नेतृत्व बोरीस येल्तसीन यांच्याकडे सुपूर्त केले.
अलीकडेच रशियाचे अध्यक्ष प्तीन यांनी सोव्हिएत साम्राज्याचे विसर्जन ही एक आपत्तीजनक घटना होती, असे विधान केले होते. थोडक्यात, त्यांनी नाव न घेता रशियाच्या सध्याच्या स्थितीबद्दल गोर्बाचेव्ह यांना दोष दिला होता. पतीन सत्ताधीश झाल्यानंतर त्यांची जुन्या सोव्हिएत पद्धतीच्या राजकीय व्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली होती, ती गोर्बाचेव्ह यांना फारशी पसंत नव्हती. त्यांनी 2013 साली पुतीन यांना सल्ला दिला होता की, त्यांनी आपली कारभाराची पद्धत बदलावी व परिस्थितीशी जुळवून घ्यावे. अर्थात, एकेकाळी सोव्हिएत केजीबीचा प्रमुख राहिलेल्या पुतीन यांना हा सल्ला मानवणारा नव्हता.
आज पुतीन यांची सत्तेवरील पकड बळकट होत चालली आहे व त्याविरुद्ध रशियन लोक कुठलाही आवाज उठवत नाहीत. याचे कारण रशियन जनतेच्या मानसिकतेत दडले आहे. रशियन लोक लोकशाहीपेक्षाही साम्राज्यवादी व्यवस्थेला अधिक पसंत करतात. त्यांना सोव्हिएत विसर्जनामुळे लोकशाही मिळाल्याचा आनंद मिळण्यापेक्षा रशियन साम्राज्य लयाला गेल्याचे अधिक दुःख आहे. त्यामुळेच पुतीन यांनी युक्रेनवर केलेल्या आक्रमणाविरुद्ध रशियात फारसा असंतोष नाही.
पुतीन पुन्हा रशियन साम्राज्य उभे करणार असतील तर रशियन जनता त्यांना पूर्ण पाठिंबा देइल, यात काही शंका नाही. त्यामुळेच गोर्बाचेव्हसारखी इतिहासाला वळण देणारी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली असली तरी रशियन जनतेला त्याचे फारसे सुतक वाटत नाही. रशियात गोर्बाचेव्ह यांच्या निधनाबद्दल कोणीही फारसे दुःख व्यक्त केलेले नाही. जे काही दुःख व्यक्त झाले आहे ते रशियाच्या बाहेर. कारण शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते गोर्बाचेव्ह यांच्या ग्लॅसनॉस्त आणि पेरिस्त्रोइका यांचा फायदा रशियन जनतेपेक्षा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चात्य जगाला अधिक झाला आहे.
– दिवाकर देशपांडे