गेल्या दहा वर्षांत पान, तंबाखू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन वाढले आहे आणि लोक त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अशा उत्पादनांवर खर्च करत असल्याचे एका सरकारी सर्वेक्षणातून समोर आले आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत एकूण घरगुती खर्चापैकी पान, तंबाखू आणि मादक पदार्थांवर होणाऱ्या खर्चात वाढ झाल्याचे कौटुंबिक उपभोग खर्च सर्वेक्षण २०२२-२३ या सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे.
ग्रामीण भागातील या वस्तूंवरील खर्च २०११-१२ मधील ३.२१ टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये ३.७९ टक्यांपर्यंत वाढला आहे. त्याचप्रमाणे शहरी भागात यावरील खर्च २०११-१२ मधील १.६१ टक्क्यांच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये २.४३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. शहरी भागात शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण कमी झाल्याबद्दल सर्वेक्षणामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. कौटुंबिक खर्चाशी संबंधित या सर्वेक्षणाचा उद्देश प्रत्येक कुटुंबाच्या मासिक दरडोई वापर खर्चाची माहिती मिळवणे, हा आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचा विचार केला तर शहरी भागात शिक्षणावरील खर्च २०११- १२ मधील ६.९० टक्क्यांवरून कमी होऊन २०२२-२३ मध्ये ५.७८ टक्क्यांवर आला आहे. त्याचवेळी ग्रामीण भागात हे प्रमाण २०११-१२ मधील ३.४९ टक्क्यांवरून कमी होऊन २०२२-२३ मध्ये ३.३० टक्क्यांवर घसरले आहे.
शीतपेये, प्रक्रिया अन्नावरील खर्चही वाढला
शहरी भागात पेये आणि प्रक्रिया केलेल्या अन्नावरील खर्च २०११-१२ मधील ८.९८ टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये १०.६४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ग्रामीण भागात हा खर्च वाढून २०११-१२ मधील ७.९० टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये ९.६२ टक्क्यांवर गेला.