सारस्वरूपामध्ये आपण विचार केला तर, प्रत्येक माणसाच्या जगण्याला बळ देण्याचे काम निंदक आणि त्यांनी केलेली ‘निंदा’ करीत असते. निंदा करणे हा काही लोकांचा धंदा होता…. आता मात्र तो, अनेकांचा धंदा झालेला आपल्याला पहावयास मिळतो. पूर्वी निंदा करणारा एखादा व्यक्ती असायचा परंतु, आता निंदा करणाऱ्या व्यक्तींची गँग तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. निंदा करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या माघारी त्या व्यक्तीच्या प्रगतीला अडथळा निर्माण करण्यासाठी केलेला संवाद होय. निंदा करणाऱ्यांची संख्या वाढल्याने अनेकांना त्यांच्या निंदेचा त्रास होतो. परंतु, निंदा करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्यामध्ये असलेले आंतरिक अवगुण जाणून घेऊन त्या अवगुणांची चिंता करण्याची गरज आहे. इतरांची निंदा करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्यामधील अवगुण की, जे त्यांना दिसतात … त्याविषयी चिंता करून त्या अवगुणाला दूर करण्याचा उपदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रस्तुत भजनाच्या ध्रुवपदाच्या ओळीमध्ये करतात की,
करु नको निंदा कोणाची ।
अवगुण अपुले अंतरि दिसती,
करि चिंता त्यांची ॥धृ॥
निंदा हा अवगुण शिकण्याची आवश्यकता नाही. सद्गुण शिकावे लागतात… आणि अवगुण न शिकता व्यक्तीच्या अंगी येतात. परंतु, इतरांचे हित ज्याला पहावत नाही. अशा माणसाच्या अंगी ते अवगुण वसलेले असतात … आणि त्यामधून प्रकट स्वरूपातील अवगुण म्हणजे निंदा हा होय.
अशा या निंदकांनी आपल्या स्वभावामध्ये बदल करण्याची गरज आहे. स्वभाव वाकडा असला की, वृत्तीही वाकडी होते. वृत्ती वाकडी असली की, त्यातून निंदा या अवगुणाचा जन्म होतो. अशा निंदा करणाऱ्या व्यक्तींनी आपला स्वभाव सरळ ठेवण्याची गरज आहे. सरळ या शब्दाचा अर्थ प्रस्तुत भजनामध्ये

स्वच्छ अंतकरणयुक्त स्वभाव असा गृहीत धरावा. त्यासोबतच या निंदक व्यक्तींनी स्वतःमध्ये बदल घडवून मृदू भाषेचा वापर करावा. स्वभावातील बदलासाठी मृदू भाषेचा वापर महत्त्वाचा आहे. प्रत्येकाचे मत आणि विचार वेगळे असतात. सर्वांच्या विचाराशी संमत राहणे आणि संतांवर श्रद्धा ठेवावी. म्हणजे संतांनी सांगितलेला उपदेश कायम स्मरणात ठेवावा. अर्थात सर्वांच्या हितामध्ये आपले हित दडलेले असते, हे निंदकांनी समजून घेण्याची गरज असल्याचे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनाच्या पहिल्या कडव्यामध्ये सांगितले की,
सरळ स्वभाव मृदू भाषा ही,
वापर मोलाची |
सर्वाशी संमतच राहणी,
श्रध्दा संतांची ॥१॥
गल्ली, कॉलनी, गाव, शहर तालुका, जिल्हा आणि… अशा सर्व स्तरावर आपण जर, विचार केला तर, निंदा करणाऱ्याची टोळी तयार झालेली आपणास पहावयास मिळते. अशा निंदाखोर माणसांनी आपले निंदेचे शब्द बंद करून आपले शब्द आणि हात परोपकारासाठी वळवायला पाहिजेत. निंदा करून इतरांच्या प्रगतीला अडचण निर्माण करण्यापेक्षा किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये असे म्हणता येईल की, आडवा पाय मारण्यापेक्षा आपल्या पावलांना तीर्थाच्या दिशेने कसे नेता येईल ? याचा विचार करावा. याशिवाय असे म्हणता येईल की, आपण जर, आपल्या हाताने परोपकार आणि वाणीने लोकांचे कौतुक जर केले तर आपल्या जीवनाचे पाऊले खऱ्या अर्थाने तीर्थाच्या वाटेने जातील. निंदा करणारे व्यक्ती कितीही निंदा करत असतील तरी, सद्गुणी माणसांनी अशा संकटांना सहन करण्याची शक्ती आपल्या हृदयामध्ये निर्माण करावी. अशा प्रकारची सहनशक्ती जर, आपल्यामध्ये निर्माण झाली तर आपली आणि आपल्या कार्याची कीर्ती जगामध्ये निर्माण होईल असा उपदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये करतात की,
हात वळो उपकार कराया,
पाउल तीर्थांची ।
हृदय कराया सहन संकटे,
तरिच कीर्ति साची ॥२॥
निंदकाला आणि हा निंदक ज्या सद्गुणी माणसाची निंदा करतो, त्या दोघांनाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की, निंदकांनी निंदा सोडावी… आणि निंदकाच्या निंदेची तमा न बाळगता दोघांनी ज्या ठिकाणी ज्ञानामृत पाझरते, त्याची हाव धरावी. अशाप्रकारे जर मानवाने ज्ञानामृत ज्या ठिकाणी पाझरते त्या ठिकाणाचीजर, हाव धरली तर तो व्यक्ती प्रभू स्वरूपाशी एकरूप होऊ शकतो. ज्ञानातून विवेक प्राप्त होते … आणि विवेकातून समाधान. समाधानी व्यक्ती हा प्रभू रूपाशी एकरूप होतो, असा उपदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनाच्या शेवटच्या कडव्यामध्ये करतात की,
ज्ञानामृत पाझरते जेथे
हाव धरी त्याची ।
तुकड्यादास म्हणे रे साधक !
मिळे प्रभू-स्वरुपाशी ॥ ३ ॥
निंदक हे समाजातील चांगल्या व्यक्तींची निंदा करून समाजातील आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण सदैव गढूळ करीत असतात… अशी वृत्तीही मानवाची नसून राक्षसी वृत्ती आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आतापर्यंत अनेकांनी सद्गुनी व्यक्तीची निंदा केली. परंतु, त्यातून फलित काय मिळाले ? तर सद्गुणी माणसाच्या आयुष्याला जगण्याचं बळ मिळालं… आणि सोबतच सदविचाराचा विजय सदैव होत असतो, हा आत्मविश्वास वाढवणारा सुविचार त्यांच्या मनामध्ये दृढ झाला. निंदकांनो ! स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की, इतरांच्या निंदेतून तुम्हाला आनंद वाटतो का ?… की, वेदना…
भगवान राईतकर मेहकर, मो. ९७३०३३२१५१