बसंतात फाल्गून मयन्यात मराठी सालच्या आखरी आखरीले येनारा सा-यायचाच आवळीचा सन म्हनजे होई.
ऊत्तर भारतातल्या वज्र, गोकूळ, वृन्दावन , बरसाना, नंदागाव अथिसा होई सात दिवस चालते अन् दूरदूरूनं लोकं तथिसा थे पाह्याले जातात.
होई ह्या सनाले भारतात शिमगा,रंगावली, धुयमाती,धुळीवंदन, बसंतगमनोत्सव, फाग, फागूनं, होलिकादहन, होली पोर्णिमा, पुनो , हुताशनी महोत्सव, दोलयात्रा, कामदहन, रंगपंचमी , धुडवळ अश्या ब-याच नावानं हा सन ओयखला जाते.
माराष्टात ह्या रोजी पुरनपोई आवळीनं केली जाते. कारण होईले निव्वद पुरनाचा असते. अवघ्या भारतखंडात हा हिंदू लोकायचा सन लयच दिमाखात अन् हरकिजानं साजरा केला जाते. ह्या सनात सा-याच समाजाचे, धरमाचे लोकं हिरिरीनं सामिल होतात. बेक्कारावर साज-याचा ईजय म्हनजे होई. होलिकेले ह्याच रोजी जायलं होतं. होलिका राकेशीन हे हिरन्यकशूपूची बयीनं . भक्त पल्हादची आत्या. भक्त पर्ल्हाद हे ईष्नू देवाचे परम भक्त. आत्या भक्त पल्हादाले घेवूनं आगीत ठान मांडून बसली होती. भक्त प्रल्हाद ह्यानं ईष्नू देवाच्या नामघोष कराले सुरवात केली. होलिका जयली खाक झाली पन् भक्त पल्हादाच्या केसालेही धक्का लागला नाही ना चटका लागला नाही.

ह्या रोजा पासूनच बसंत रूतूचं येनं होते. राधा किसन भगवाननं ह्या सनाची सुरवात केली. गर्क संहितेत शीरीकुस्न देवानं होई खेयल्याची नोंद हाय. अबीर, गुलाल, पयसाच्या झाळाचे फुलं अन् ईशिष्ट फयायचा रस काहाळूनं आंदी हा सन साजरा कराचे. पन् आता होई बदलत चाल्ली.
आमच्या लानपनी आम्ही शेन रानातूनं, रसत्यावूनं, ज्याच्याघरी जनावरं तेयच्या गायवाळ्यातूनं तेयले मांगूनं नायीत चोरूनं पवटे आनो अन् राखोंडी दोही हातावर टाकूनं चार बोटाचे ईशिष्ट आकार घेवून चाकोल्या बनवो अन् चंद्र, सूरय, चान्नया , निंबू , नारय, गव-या बनवो अन् नारयाच्या दोरीत ओवून हार बनवो… सार्वजनिक होयीसाठी लाकूळफाटा आठ दिवसापासूनं गोया करूनं ठुवो. होई पेटली की, पोट्टे बोंबलत…
‘ होई रे होई पुरनाची पोई
सायबाच्या गांडीवर बंदूकीची गोई …. ‘
‘ होई रे होई पुरनाची पोई
पुरनाच्या पोईवर मिठाचा खळा
फोकनीच्या सायबाले
जोळ्यानं झोळा…’
हा सायब कोनं त इंगरज. मले मोठ झाल्यावर कयलं.
होई सनाले आता लोकं दारवा, भांग पेतात.आमच्या लानपनी खोटी खोटी मयत निंगे. थो तीळ्ळीवरचा मानूस ऊठूनं बसे अन् आम्ही पोट्टे बंबाट हासो अन् भेव ही लागे. आम्ही भंगाट पवो. पोट्टे एकमेकायले गटारात टाकत. येगयेगळ्या रंगायचे रंग एकमेकायच्या गालावर पाठीवर, पोटावर लावो, वारनीस लावो. कायी नाहीच सापळ्ळ त ताव्या, भंगून्याच्या बूळाच काय लावो. चिखल लावो. जुन्या कायात पयसाचे फुल आनून पान्यात ऊकवूनं थ्याचा रंग लावत. ह्या रोजी माय आपल्या लेकराले साख-याची गाठी गयात बांदे. लेकराले गयातला थो हार सोन्याच्या गोफापरीस भारी वाटे. होयीचा दुसरा दिस म्हनजे करीचा. कर जर बुधवार, शुक्कीरवार नाहीत ईतवारी आली त मंग ईचारूच नोका. घराघरात खुरमुंडी, मटन, हलक मटनं गदगद शिजतानी दिसूनं ये. घरादारात मटनाचा घमघमाट सुटे. आम्ही लेकर लैच हरकिजो.
आता आपन मोठ झालो अन् … गेले थे दिस अन् राह्यली थे याद ‘ अस म्हना लागते.
माय पायटीच ऊठून मारबत काहाळे.
ऊत्तर भारतातल्या वज्र, गोकूळ, वृन्दावन , बरसाना, नंदागाव अथिसा होई सात दिवस चालते अन् दूरदूरूनं लोकं होई पाह्याले अथिसा येतात.
धुयमाती म्हतलं की, पोट्यासोट्यायले नि-हा ऊधानं येते. काह्यी लोकायले होई खेयनं आवळत नसल्यानं थे लोकं धुयमातीच्या दिवशी पायटीचं जुने, टाकलेले, फाटलेले कपळे ईना आंग धुता घालूनं सज्ज असतात. अस् मी दरसाल पाह्यत आलो माह्या बाबाले. दार कोनं कितिकही ठोका पन् दार काह्यी केल्या बाबा खोलेचना. आताही थे सारं आठोते. ह्याच दिवशी गावागावात पत्यायचा डाव मांडला जाते.
पोरं आपल्या दोस्तायचा घोयका करूनं एकमेकायच्या घरी भेटी देवूनं रंग लावतात. ह्याच रोजी आकोल्यात संध्याकायी मुर्ख संमेलन भरे वेगवेगळे सोंग घेवूनं आकोल्यातले थोर कवी, लेखक मानवटकर टाया चा गळगळात काँग्रेस मैदानावर निरमान करत. हिंदी मराठी कवी, साहित्यिक अथिसा संमेलनात येत असत. हे आकोल्याची खरी दौलत होती.
ह्याच दिवशी भांगाचं दुध पिवूनं संटे पोट्टे तर्रर असतात. एकमेकायच्या आंगावर रंग ऊळवूनं …गाला-तोंडाले रंग लावूनं. ” बुरा ना मानो होली है !” हे वाक्य सर्रासपने आयकाले त भेटते.
पन् लायने लायने पोट्टे…
‘ होई रे होई पुरनाची पोई
पुरनाच्या पोईवर
मिठाचा खळा
सायबाच्या गांडीवर
फटाका फोळा…’
हे शब्द पोट्यायच्या तोंडून आयकाले भेटते. बरं सायबासंग कोन्च ययच वैर हाय हे मले समजेना मंग मोठ झाल्यावर कयल थो सायेब म्हनजे इंगरज होय.
ह्या होईतली राख म्हनजे अवषिधचं. जयलेल्या राख झालेल्या चाखोल्या लोकं घरी आनूनं ठुयत अन् कोनाले ताप आला की पान्यात हे राख मिसवूनं प्याले देत. हे आमच्या लानपनी माय करत होती.
वसंत रूतूत झाळायले पालवी फुटू लागते. हिवाया सरते…उन्हायाची चाहूलं लागते. अन् हे होई सालभराची ऊर्मी,ऊर्जा ,ऊभारी देवूनं जाते. अशी हे लानपनीची होई होती थे आठोनित, कायजात अजूनही तशीच इंदरधनुशासारखी रंगीत गुलाबी हाय.
लेखक – – सु. पुं.अढाऊकर, अकोला. ९७६९२०२५९७