ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंत मतदानाच्याआधी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला निळी शाई अर्थातच अमिट शाई लावली जाते. ही शाई अनेक दिवस बोटावर तशीच राहते. परिणामी, कोणत्याही मतदाराला दुसऱ्यांदा मतदान करता येत नाही. ही शाई निवडणूक आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार साधारण १९६२ च्या सर्वसाधारण निवडणुकीपासून वापरली जाते. ही शाई कर्नाटकातील म्हैसुर येथील म्हैसूर पेन्ट्स आणि वॉर्निश लिमिटे या कंपनीकडून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तयार केली जाते. येथूनच देशातील सर्व राज्यातील जिल्हा निवडणूक कार्यालयांना मागणीनुसार या शाईचा पुरवठा करण्यात येतो. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कंपनी या शाईची निर्यात देखील ३० पेक्षा जास्त देशांना करते.

शाई कुठल्या बोटाला लावावी, ती कशी लावावी, केंद्रावरील कोणत्या अधिकाऱ्याने लावावी याबाबत निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. ही शाई बोटाला लावल्यावर काही वेळातच वाळते आणि साधारण काही आठवडे तशीच राहाते. मतदारांनी मतदान केले आहे आणि तो दुबार मतदानासाठी येणार नाही याची खात्री करण्यासाठीच या शाईचा मुख्यत्त्वे उपयोग होत असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकून राहण्यास मदत होते. निवडणुकांमध्ये मतदानावेळी वापरण्यात येणाऱ्या शाईबद्दल सर्वांनाच कुतूहल असते. म्हैसूर पेन्ट्सचे वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद अर्थातच सीएसआयआर यांनी ही शाई तयार केली होती. न पुसता येणारी शाई तयार करण्यासाठी आयोग विशिष्ट पद्धतीचा वापर करत असते. सुरुवातीला या शाईचा वापर केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसाठी केला जात होता. आता, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी देखील ही शाई वापरली जाते.
■ साधारण ८० सीसीच्या छोट्या बॉटल्समध्ये ही शाई पाठवण्यात येते. एका बॉटलमध्ये साधारण ८०० मतदारांना शाई लावता येते.
■ प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार संख्येनुसार आवश्यक तितक्या बॉटल्स साहित्यासोबत पुरवल्या जातात.
■ मतदान केंद्रावर ही शाई लावण्यासाठी एका अधिकाऱ्याकडे काम सोपविले जाते. आयोगाच्या निर्देशानुसार ही शाई मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर लावण्यात येते.
■ जर मतदार दिव्यांग असेल त्यास डाव्या हाताचे बोट नसेल, किंवा कदाचितच डावा हातच नसेल तर अशा वेळी ही शाई कशी लावावी, याबाबत आयोगाच्या स्पष्ट आणि सविस्तर सूचना आहेत. त्यानुसार मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाच्या वेळी दिलेल्या सूचनांनुसार अधिकारी आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करतात.