गुरुकुंज मोझरी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य जगामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांसाठी जनसंपर्काचे कामकाज करणाऱ्या ‘द पीआर टाईम्स लिमिटेड कंपनी ने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून www.Tukdojimaharaj.com असे संकेतस्थळ तयार केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ११४ व्या ग्रामजयंतीच्या पर्वावर संकेतस्थळाचे अनावरण अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्ष पुष्पा बोंडे व सर्वाधिकारी लक्ष्मण गमे यांच्या हस्ते गुरुकुंज आश्रम येथे करण्यात आले.
राष्ट्रसंतांनी पाच हजार प्रकारांच्या गद्य व पद्य अशा विशाल ग्रंथसंपदेची रचना केली. त्यात खास करून ग्रामगीता, मेरी जपान यात्रा, अभंगगाथा, लहरकी बरखा, श्रीगुरुदेव मासिक आदेश रचना इत्यादी ग्रंथसंपदेचा समावेश आहे. या संकेतस्थळावरून एका क्लिकवर आता महाराजांचे साहित्य जगामध्ये नोंदणी केल्यावर मिळू शकेल. त्याचबरोबर १९४४ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गोरगरिबांसाठी स्थापन केलेल्या श्रीगुरुदेव आयुर्वेद रसशाळेची औषधी सुद्धा याच संकेतस्थळावरून उपलब्ध होणार आहे. या संकेतस्थळाच्या निर्मितीची संकल्पना द पीआर टाईम्स लिमिटेडचे संचालक निखिलेश सावरकर, कंपनीच्या माध्यम व जनसंपर्क संचालिका भूमिता सावरकर यांची असून, कंपनीचे वेब डेव्हलपर निशांत मल्होत्रा, अमित बोरकर, स्वप्निल भोगेकर, रोहित अतकरे, प्रतीक घोगले, सृष्टी पटेल, स्वप्निल डोंगरवार ही चमू संकेतस्थळाला जागतिक कीर्तिमान मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. महाराजांच्या पुण्यतिथी पर्वापर्यंत पूर्णपणे संकेतस्थळ विकसित होणार आहे. संकेतस्थळाच्या औपचारिक अनावरणप्रसंगी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी दामोदर पाटील, प्रचारप्रमुख प्रकाश वाघ, सेवाश्रम समिती प्रमुख डॉ. राजाराम बोथे, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम पाळेकर, दिलीप कोहळे, सुशील वणवे, डॉ. दिगंबर निघोट यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते. कंपनी कायमस्वरूपी संकेतस्थळाची हाताळणी, देखभाल व दैनंदिन कार्यचलन मोफत करणार आहे.