आपल्याकडे लागवडीत असलेल्या सर्वात प्राचीन धान्यांपैकी तीळ हे महत्त्वाचे धान्य आहे. तैत्तिरीय आणि शोनक संहितांच्या काळापासून त्याचा उल्लेख आढळतो. ‘होमधान्य’ आणि ‘पितृतर्पण’ असाही तिळाचा उल्लेख झालेला दिसतो. हिंदुस्थानातील अनेक भाषांतील तिळाची नावे ‘तिल’ या संस्कृत नावाशी संबंधित दिसतात. ‘तैल’ (तेल) हा संस्कृत शब्द ‘तिल’ या शब्दावरून रूढ झाला. थोडक्यात, तैल म्हणजे तिलोत्पन्न, अर्थात जे तिळापासून निर्माण झाले आहे असे.
हिंदुस्थानात उत्पादन होणाऱ्या एकूण तिळापैकी ७८ टक्के तिळाचे तेल काढले जाते. महाराष्ट्रात बाजरीच्या भाकरीला तीळ लावण्याची पद्धत आहे. अमेरिका आणि युरोपीय देशात तिळाचा उपयोग पावावर आणि बेकरीत तयार होणाऱ्या पदार्थांवर करतात. व्हेनेझुएलामध्ये भाजलेले तीळ वाटून त्यात दूध व साखर घालून खीर तयार करतात. एकूण काय तर तीळ जगभरात लोकप्रिय आहे. हे तिळाचे महत्त्व अधोरेखित व्हावे या हेतूने आपल्या पूर्वजांनी चाणाक्षपणे या तिळाची गाठ सणाशी बांधली.
संक्रांतीच्या सणाला होणारे तिळाचे लाडू म्हणजे स्निग्ध तीळ आणि प्रकृतीने उष्ण गूळ यांचा समसमा संयोग. प्राचीन काळी मेथी, सुंठ, तीळ यांचे लाडू औषधी उपचारांचा भाग होते. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात प्रसिद्ध हिंदुस्थानी शल्यचिकित्सक सुश्रुत त्यांच्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना जंतुसंसर्ग होऊ नये, त्यासाठी उपाय म्हणून गूळ वा मध यांच्यासह तीळ खाण्यास देत असत. त्याचा आकार लाडवासारखा वळलेला असे. थोडक्यात, तिळाच्या लाडवांचा उगम प्राचीन औषधशास्त्रात आहे.
अशा या तिळाच्या लाडवांसोबत संक्रांतीच्या हळदीकुंकवात काटेरी हलवा कसा आणि कधी जोडीला आला हे कळत नाही. हा काटेरी हलवा तीळ आणि साखरपाक यापासून तयार होतो. साखर ही खाद्यपदार्थांच्या इतिहासात तुलनेने खूप अलीकडची आहे. त्यामुळे हळदीकुंकवात तिळाचे लाडू आणि काटेरी हलवा यांची ही युती अलीकडची असावी. काही असो, संक्रांतीसारख्या सणाला मिट्ट गोड करण्याचे काम हा तीळगूळ करतो. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला….
तिळाचे संक्रांतीशी नाते
तिळाचे संक्रांतीशी नाते जुळले, त्यामागे तिळातील स्निग्धता हे महत्त्वाचे कारण. थंडीचा मोसम असल्याने शरीराला उष्णता देणाऱ्या तिळाची योजना अचूक ठरते. शिवाय, शिवरहस्यात असा नियम सांगितला आहे की, शंकराने गोसव यज्ञ केल्यानंतर सर्व लोकांच्या संतोषाकरिता मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाची उत्पत्ती केली. त्यामुळे या दिवशी तीळ भक्षण करावेत, तिळाचा होम करावा असा पौराणिक संदर्भही यात आढळतो.
मकर संक्रांतीच्या सणाचे नाते जितके काळ्या रंगाशी, पतंगांशी, गाजर, हरभऱ्याशी, त्याहूनही ते अधिक तीळगुळाशी जोडलेले आहे. तिळाचे अनेकविध पदार्थ महाराष्ट्राच्या प्रांतोप्राती घराघरांत होतात. या तिळाची, लाडवांची आणि काटेरी हलव्याची ही स्निग्धगोड कहाणी…
रश्मी वारंग