मुंबई : दहावी, बारावी परीक्षेतील कॉपी प्रकरणे ही बोर्डासमोरील मोठी डोकेदुखी आहे. ग्रामीण भागात दरवर्षी परीक्षेदरम्यान कॉपीची शेकडो प्रकरणे उघडकीस येतात. विविध उपाययोजना करूनही बोर्डाला कॉपी प्रकरणाला आळा घालण्यास पूर्णतः यश आलेले नाही. त्यामुळे आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह समाजातील विविध घटकांना कॉपीबहाद्दरांना रोखण्यासाठी नवनवीन कल्पना सुचविण्याचे आवाहन केले आहे. येणाऱ्या प्रत्येक कल्पनेचे मूल्यमापन करून यांपैकी दहा उत्कृष्ट कल्पना पाठविणाऱ्यांचा बोर्डाच्यावतीने यथोचित सत्कारही करण्यात येणार आहे. राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळात कॉपी प्रकार रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जातात. या प्रयत्नात एकसूत्रीपणा आणण्यासाठी संपूर्ण राज्यात एक नियोजनबद्ध व सर्वसमावेशक कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यासाठी कॉपी कशी रोखायची यासाठी उपाय सुचविण्याचे आवाहन बोर्डाच्यावतीने करण्यात आले आहे. यासाठी बोर्डाने एक गुगल फॉर्म तयार केला असून २० जानेवारीपर्यंत इच्छुकांनी हा फॉर्म भरून पाठवायचा आहे, असे राज्य शिक्षण मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.
गुगल लिंक : https://forms.gle/yT2y21P93W8d4foAA