एकीकडे भारत महासत्ता बनण्याची स्वप्न पाहत आहे. परंतु खऱ्या अर्थाने आजही समाजात अनेक समस्या दिसून येतात. साक्षरांचे प्रमाण देशात वाढताना दिसत असले तरी ही साक्षरता समाजाला योग्य दिशेने नेताना दिसते काय? हा खरा प्रश्न आहे. कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ या कादंबरीची पहिली आवृत्ती 19 फेब्रुवारी, 2005 रोजी ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केली. प्रस्तुत कादंबरीचा विषय ‘प्रौढ साक्षरता अभियान’ हा असून भिलठाणा जिल्ह्यातील 2 ऑक्टोंबर 1997 ते 2001 पर्यंतच्या साक्षरता अभियानातील सावळा गोंधळ कादंबरीकारांनी आपल्या खास वऱ्हाडी बोलीभाषेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भिलठाणा जिल्ह्यात राबविण्यात आलेले हे प्रौढ साक्षरता अभियान, त्या अभियानाकडे पाहण्याचा अधिकारी वर्गाचा दृष्टिकोन, प्रौढ साक्षरता अभियानात शिक्षण घेणाऱ्या नवसाक्षरांचा दृष्टिकोन, अभियानात येणाऱ्या अडचणी, त्यातून काढले जाणारे मार्ग, पूर्ण वेळ कार्यकर्ता, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, जिल्हा समन्वयक तसेच प्रौढ साक्षरता अभियानात सहभागी झालेल्या महिला यांची भूमिका अभियानात महत्त्वाची ठरते.
1990 नंतरच्या कालखंडात झपाट्याने शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला. ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालयांची निर्मिती झाली. तरीही ग्रामीण भागातील निरक्षरता हवी तशी कमी झाली नाही. त्यामुळे शासनाने साक्षरता वाढविण्याकरिता प्रौढ साक्षरता अभियान राबविले आहे. अभियानातील उणिवा लेखकांनी ‘निशाणी डावा अंगठा’ कादंबरीतून स्पष्ट केल्या.
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. देशातील बहुतांश म्हणजे 70 ते 80 टक्के लोक हे ग्रामीण भागात राहतात. विज्ञानाने मनुष्याने फार मोठी प्रगती केलेली असली तरी ग्रामीण भागात आजही अनेक समस्या आहेत हे वास्तव नाकारता येणार नाही. रस्ते, पाणी, लोकसंख्यावाढ, अनियमित वीज पुरवठा, वाढते तापमान, प्रदूषण, बेकारी, गरिबी यासोबत ग्रामीण भागातील एक महत्त्वाची समस्या म्हणजे समाजातील निरक्षरता होय. ग्रामीण भागातील ही निरक्षरता समूळ नष्ट करण्यासाठी शासनाने महात्मा गांधी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर 2 ऑक्टोबर, 1997 पासून ते 23 जानेवारी 2001 पर्यंत जे प्रौढ साक्षरता अभियान राबवले. प्रौढ साक्षरता अभियानाच्या या तीन वर्षाच्या काळातील भिलठाणा जिल्ह्यातील प्रौढ साक्ष्रता अभियानातील शिक्षकांचे भावविश्व, अधिकारी वर्गाची प्रौढ शिक्षणाविषयीची अनास्था, प्रौढ शिक्षण अभियानातील अनागोंदी कारभाराचे चित्रण करणारी कादंबरी म्हणजे रमेश इंगळे उत्रादकर यांची 2005 मध्ये प्रसिद्ध झालेली ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी होय. या कादंबरी संदर्भात भा.ल. भोळे म्हणतात, ‘’सशक्त आशयवस्तू, प्रभावी कथन आणि सापेक्षी भूमिका ह्या बळावर लेखकाने साक्षरता अभियानाची ती तिन्ही वर्षे वाचकांपुढे इत्यंभूत जिवंत केली आहेत. त्याबद्दल मतभेदाला मुळीच जागा नाही.’’1
‘निशाणी डावा अंगठा’ कादंबरीतून लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांनी खऱ्या अर्थाने प्रौढ साक्ष्रता अभियानाची पोलखोल केली आहे.
‘प्रौढ साक्षरता अभियान’ हा ‘निशाणी डावा अंगठा’ या कादंबरीचा मुख्य विषय आहे. कादंबरीचे लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांनी ‘निशाणी डावा अंगठा’ या विषयप्रधान कादंबरीतून शासनाकडून राबविण्यात आलेल्या भिलठाणा जिल्ह्यातील साक्षरता अभियानाची विनोदी तसेच उपरोधिक शैलीतील चित्र प्रस्तुत कादंबरीतून केले आहे. भिलठाणा जिल्ह्याला अभियान उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
रंगनाथ भास्कर डुकरे हे या कादंबरीतील महत्त्वाचे पात्र आहे. मराठी पूर्व माध्यमिक शाळा, मुंगळा या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत असून शासनाच्या साक्षरता अभियानाकरिता प्रत्येक केंद्रातून एका शिक्षकाची पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून निवड केली जाणार असल्याची जाणीव होताच डुकरेच्या डोक्यात पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याचे भूत घुसते. पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणजे फक्त रात्री सात ते दहा तीन तास काम. बाकी संपूर्ण दिवसभर रिकामे असे स्वप्न डुकरे पाहत असतो. सात ते दहा या वेळेत फक्त तीन तास प्रौढ साक्षरता वर्गांना भेटी देण्याचे काम पूर्ण वेळ कार्यकर्त्याला करावे लागणार त्यामुळे डुकरे अतिशय आनंदी असतो. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून जबाबदारी स्वीकारून आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतल्याची जाणीव रंगनाथ डुकरेला होते.
गटशिक्षणाधिकारी भोणगावच्या साक्षरता अभियानाच्या वर्गांना भेट देण्याचे ठरवतात त्यावेळेस भोनगावचे केंद्रप्रमुख साखरे सावरगावचा रस्ता खूप खराब असल्याचे सांगून गटशिक्षणाधिकाऱ्यांना भोनगावच्या साक्षरता वर्गाला भेट देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न भोनगावचे केंद्रप्रमुख साखरे करताना दिसतात. तर मच्छिंद्रखेडच्या साक्षरता वर्गाला मा. उपसंचालक, अमरावती हे भेट देण्याकरिता आल्यानंतर गावातील डीपीवरील फ्युज काढून गावात अंधार पाडला जातो. असे साक्षरता अभियानातील अनेक प्रसंग लेखकांनी वर्णन केले.
8 सप्टेंबर हा दिवस साक्षरता अभियान राबविणाऱ्या सर्व शाळांनी ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ म्हणून साजरा करण्याचा आदेश शिक्षण खात्याकडून आल्यानंतरही सावरगावच्या शाळेत रविवार असल्यामुळे मुख्याध्यापक बंडू भावडा राठोड ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ साजरा करण्याचे विसरतात आणि नेमकी त्याच दिवशी सावरगावच्या शाळेला केंद्रप्रमुख पळसपगार बाई आणि काझी साहेब सकाळी नऊ वाजता भेट देतात तेव्हा शाळेत कोणीही नसते. ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ शाळेत झालाच नाही असा शेरा शाळेच्या रजिस्टरमध्ये मारून सरपंच, उपसरपंच, शाळा सभापती यांच्या शेऱ्याखाली सह्या घेऊन निघून गेल्यानंतर सावरगावच्या शाळेचे मुख्याध्यापक बंडू भावडा राठोड अगोदरच्या तारखेत सूचना काढून दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा कार्यक्रम घेऊन भिलठाणा जिल्ह्यातील सर्व शाळांच्या अगोदर सावरगावच्या शाळेचा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा अहवाल पोहोचतो. असे प्रौढ साक्ष्रता अभियानातील अनेक प्रसंग लेखकांनी विनोदी शैलीत वर्णन केले.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा अहवाल लिहिणाऱ्या जावईबुवाला मुख्याध्यापक राठोड म्हणतात, ‘जिथं कुणाच्या काळजाले ठेच लागत नाही तिथं कितीबी लाडी लबाडी केली तरी फारसं बिघडत नाही. पण जर आपल्या लबाडीनं कुणाचं काळीज दुखत असलं तं मग मात्र ती लबाडी काही कामाची नाही. आता हे अभियान सुरू झाल्यापासून आपण सर्रास खोटी माहिती पाठवतो. ही आपली लबाडीतं झाली. पण ही लबाडी आपल्या नोकऱ्या राखते. आपलं अन्न, पाणी राखते. जिथं वरपासून खालपर्यंत लबाडीच चाललीय तिथं हरिश्चंद्राच्या वंशातले लोक जगूच शकत नाहीत. आता सत्यवचनी मंडळींना मूर्खात काढलं जातं. ज्यांना लबाडी जमत नाही त्यांनी नोकऱ्या करू नयेत असे दिवस आले आता. लबाडाची संख्या वाढल्यानं लबाडाचं राज्य आलंय अशा राज्यात लबाडी शिष्टाचार होणार नाही तर काय होईल? म्हणून म्हणतो लिहा… मस्तपैकी लिहा. मनात बी आणू नका की आपल्या हातून काही दुष्कृत्य होऊन राहलंय (निशाणी डावा अंगठा, पृष्ठ १३०)
वर्तमान काळातील शिक्षण क्षेत्रातील वास्तव लेखकांनी अधोरेखित केले. ‘निशाणी डावा अंगठा’ या कादंबरी संदर्भात टिप्पणी करताना दत्ता घोलप म्हणतात, ‘‘साक्षरता अभियान आणि प्राथमिक शिक्षण हा विषय ‘निशाणी डावा अंगठा’ (2005) या रमेश इंगळे उत्रादकर यांच्या कादंबरीतून हाताळला आहे. साक्षरता अभियानासारख्या योजनेतून कोणत्याही गोष्टीचे सरकारीकरण करणे, चांगल्या योजनांचा बोजबारा उडविणे यातून भारतीय समाजातील मानसिकता अधोरेखित होते.’’2
भारतीय समाजाची एक वेगळी मानसिकता झालेली आहे. मनुष्याला प्रगतीपथावर येणाऱ्या शिक्षणासारख्या कार्यात समाज सकारात्मक दृष्टीने पाहत नाही हे कटू पण वास्तव आहे.
नवसाक्षरांची होणारी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा, परीक्षा देण्याकरिता सातवीतल्या 40 पैकी बऱ्यापैकी हुशार विद्यार्थ्यांची पेपर सोडविण्याकरिता मदत घेणे. सातव्या वर्गात असूनही नाव लिहिताना होणारा गोंधळ. नवसाक्षरांच्या ठिकाणी दुसऱ्यालाच अंतर्गत मूल्यमापन परीक्षेला बसविणे, पाचपांडे नावाच्या शिक्षकांनी स्वतःच्या डावा हाताने विद्यार्थ्यांचे पेपर सोडविणे, प्रौढ साक्षरता अभियानातील असे अनेक प्रसंग विनोदी शैलीत रमेश इंगळे उत्रादकर यांनी मांडले आहेत. प्रौढ साक्ष्रता अभियाना संदर्भात डॉ. रवींद्र शोभणे म्हणतात, ‘‘साक्षरता अभियान राबविण्याचा शासनाचा उदात्त हेतू आणि त्या अभियानाकडे पाहण्याचा, त्या अभियानाला प्रतिसाद देण्याची सर्वसामान्य नागरिकांची, अशिक्षितांची प्रवृत्ती हा ‘निशाणी डावा अंगठा’चा मुख्य विषय आहे. वास्तविक हा विषय आणि यातून पुढे येणारे फलित हे गंभीर स्वरूपाचे असेच आहे. पण या गांभिर्याला लेखकाने विडंबन शैलीद्वारे विनोदी पद्धतीने हाताळलेले असल्यामुळे या कादंबरीचा बाज वेगळा झालेला आहे. यात भाषा उपयोजन महत्त्वाचे कार्य करते.’’3
शासनाने प्रौढ साक्षरता अभियान एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून तयार केले परंतु त्या योजनांची फलनिष्पत्ती मात्र सकारात्मक झाल्याचे दिसत नाही. जिल्ह्यात नवसाक्षरांची अंतर्गत मूल्यमापन परीक्षा झाल्यानंतर बाह्य मूल्यमापन परीक्षा घेण्याचे अधिकारी वर्गाकडून ठरविले जाते. प्रत्येक तालुक्यातून किमान एक हजार नवसाक्षरांचे मूल्यमापन व्हावे म्हणून ज्या सहा गावांची निवड नवसाक्षरांची बेरीज एक हजार होते अशा गावांची निवड मूल्यमापनाकरिता केली जाते. त्या गावांमध्ये रोडवर असलेल्या सावरगावची बाह्य मूल्यमापनाकरिता निवड झाल्यामुळे मुख्याध्यापक भाऊ राठोड, पुवेका रंगनाथ डुकरे, काझी साहेब, शिक्षक जुंबड, नऊलाखे, जावई राजपूत असे सर्वजण चिंतेत पडले.
प्रौढ साक्ष्रता अभियानाच्या बाह्य मूल्यमापन परीक्षेचे नियोजन करण्याकरिता भिलठाण्यामध्ये सभेचे आयोजन केल्यानंतर इओ पानगोळे साहेब प्रौढ साक्ष्रता अभियानातील पूर्णवेळ कार्यकर्ता, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांना प्रौढ शिक्षण अभियानाविषयी मार्गदर्शन करताना सांगतात, ‘‘मला तुम्हाला एक कानमंत्र द्यायचा आहे, की या येणाऱ्या पाहुण्यांना आदरातिथ्यानं दाबून टाका इतके की त्यांना त्याचा भार झाला पाहिजे. त्यासाठी काय नाटक, नाटकं करायची ती करा, तुमच्या आदरातिथ्याखालून निघून तुमच्या उणिवा शोधायला त्यांना चान्सच देऊ नका.’’ (पृष्ठ 223, निशाणी डावा अंगठा)
देशात कोणत्याही योजना राबविताना उद्भवणाऱ्या समस्या त्या सोडविण्यासाठी केले जाणारे विविध प्रकारचे उपाय हे चिंतन करायला लावणारे आहेत. बाह्य मूल्यमापन परीक्षेकरिता समित्या स्थापन केल्या जातात. त्यांच्याकडे वेगवेगळी कामे वाटून दिली जातात. महत्त्वाचा प्रश्न असतो तो नवसाक्षरांना परीक्षेकरिता हजर राहण्याचा. ती व्यवस्था बाजूच्या गावातील पुरुष आणि महिलांना बोलावून बाह्य मूल्यमापन परीक्षा घेतली जाते. त्याकरिता गावातून दवंडी दिली जाते. नियोजित वेळेत बाह्य मूल्यमापन परीक्षा घेतली जाते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भिलठाणा जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवरील साक्षरता अभियानातील सर्वोच्च पुरस्काराकरिता निवड होते. ‘निशाणी डावा अंगठा’ कादंबरी संदर्भात डॉ. सतीश तराळ लिहितात, ‘‘निशाणी डावा अंगठा’ रमेश इंगळे उत्रादकर यांची महत्त्वाची ग्रामीण कादंबरी आहे. शिक्षण क्षेत्रातील अपप्रवृत्तीवर त्यांनी प्रकाशझोत टाकला आहे. मांडणी, निवेदन उत्तम आहे. शिक्षण क्षेत्रात शासकीय योजनांचा कसा बँड बाजा वाजला त्याचे प्रत्ययकारी चित्रण या कादंबरीत आहे. कल्याणकारी राज्याने अनेक योजना आखल्या, परंतु त्या योजनांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होत नाही व भ्रष्टाचारामुळे त्या योजनांचे कसे तीन तेरा वाजतात याचे प्रत्ययकारी वर्णन त्यांच्या कादंबरीमध्ये येते.4
शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात जे काही चालले आहे ते अतिशय वेदनादायी आहे. देशाच्या भविष्याकरिता तसेच भावी पिढीकरिता अत्यंत घातक आहे. प्राचीन काळी गुरुकुल पद्धती होती ती गुरुकुल पद्धती विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनवत होती. परंतु आजची शिक्षण पद्धती त्या बाबतीत कुचकामी ठरत आहे. त्याकरिता व्यवस्थेबरोबरच समाजातील अनेक घटक कारणीभूत आहेत असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.
थोडक्यात असे म्हणता येईल की, कोणतीही योजना, कार्य यशस्वी करायचे म्हटल्यास समाजातील सर्व घटकांचे प्रत्यक्ष स्वरूपातील योगदान महत्त्वाचे असते. समाज हा विविध वृत्ती प्रवृत्तीच्या लोकांनी बनलेला असतो. त्यामुळे एखाद्या योजनेचे फायदे -तोटे समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक असते. ‘निशाणी डावा अंगठा’ या कादंबरीतून लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांनी प्रौढ साक्ष्रता अभियानातील उणिवा अतिशय विनोदी शैलीतून मांडलेल्या दिसून येतात.
प्रा. पुरुषोत्तम एस. निर्मळ
मो. : 9921132764