जिगोलो हा एक प्रकारचा पुरुष वेश्या आहे. उच्चभ्रू महिलांना शरीरसुख देण्यासाठी आपले शरीर विकणे हे त्याचे कार्य. या बदल्यात जिगोलोंना चांगली रक्कम मिळते. जिगोलोच्या रुपातून युवकांना काम देणाऱ्या अनेक कंपन्या परदेशात अगोदरपासून सक्रिय आहेत; परंतु भारतात याचा वापर करुन युवकांना फसवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. जिगोलो, प्ले बॉय सर्व्हिस आणि एस्कॉर्ट्सच्या रुपातून काम देण्याचे आमीष दाखवत नोकरीचा शोध घेणाऱ्या ४ हजारापेक्षा अधिक युवकांना फसवल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. व्हॉट्सॲप आणि डेटिंग ॲपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीरात देऊन युवकांना-पुरुषांना या जाळ्यात ओढले जात आहे.
नव्वदीच्या दशकांत ‘बाप नंबरी बेटा ‘दस नंबरी’ नावाचा कादरखान आणि शक्ती कपूर यांचा सिनेमा आला होता. या चित्रपटात नोकरीच्या नावाखाली युवकांना कसे गंडवले जाते, हे दाखवले आहे. दुबईला नोकरी देण्याच्या बहाण्याने प्रत्येकाकडून पाच हजार रुपये घेतात आणि त्यानंतर सर्वांना एका नावेतून नेण्यात येते. दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर उतरल्यानंतर तो भाग मुंबईचाच असल्याचे लक्षात येते. हे केवळ रुपेरी पडद्यावरील कथानकातच घडते असे नाही, तर प्रत्यक्षात देखील नोकरीचे आमीष दाखवून फसवण्याचे प्रकार देशात राजरोसपणाने आणि मोठ्या प्रमाणावर सर्रास घडत राहतात. बेरोजगारीचे वाढते प्रमाण अशा फसवणुकींसाठी सुवर्णसंधी ठरत आहे. त्यात मोबाईल, सोशल मीडियामुळे अशा ठकसेनांच्या गळाशी अनेक मासे लागताहेत. ऑनलाईन व्यासपीठांवर आकर्षक जाहीरातबाजी करत युवकांना जाळ्यात ओढण्याचे प्रमाण अलीकडील काळात लक्षणीयरित्या वाढले आहे. यासाठी अवलंबण्यात येणारे मार्ग धक्कादायक आहेत.
जिगोलो हा एक प्रकारचा पुरुष वेश्या आहे. त्याचे काम पैसे घेऊन श्रीमंत घरातील महिलांना शरीरसुख देण्यासाठी आपले शरीर विकणे, असे असते. शारीरिक संबंधांपासून वंचित राहणाऱ्या उच्चभ्रु वर्गातील महिलांना त्यांच्या सहम तीने या पुरुषांमार्फत देहविक्री करण्यात येते. त्या बदल्यात पुरुषांना चांगली रक्कम मिळते. जिगोलो हे एकप्रकारचे अॅडल्ट मार्केट असून त्यात महिला पुरुषांचा लिलाव केला जातो. रक्कम ठरल्यानंतर संबंधित पुरुष तिच्यासमवेत जातो. ज्या संस्थेमार्फत देहविक्री निश्चित झाली आहे, त्याला ठराविक रक्कम जिगोलो देते. जिगोलोच्या रुपातून युवकांना काम देणाऱ्या अनेक कंपन्या परदेशात अगोदरपासून सक्रिय आहेत; परंतु ही वाईट बाब आता भारतातही येऊन धडकली आहे. एवढेच नाही तर त्या मार्फत बेरोजगार युवकांना फसवण्याचे प्रकार देखील सुरू झाले आहेत. जिगोलो, प्ले बॉय सर्व्हिस आणि एस्कॉर्ट्सच्या रुपातून काम देण्याचे आमीष दाखवत ऑनलाइन नोकरीचा शोध घेणाऱ्या ४ हजारापेक्षा अधिक युवकांना फसवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांना जयपूरचे रहिवासी कुलदिप सिंह चारण आणि श्यामलाल योगी यांना पकडले. दोघेही एकाच गावचे रहिवासी. त्यांच्याकडून चार मोबाईल फोन, एक लॅपटॉप, एक डेस्कटॉप, एक हार्ड डिस्क, अकरा खात्याचे विवरण,
२१ एटीएम कार्ड आदी जप्त केले आहेत. पोलिसांच्या मते, एका आरोपीने स्वतःला ‘एनआरआय’ महिला असल्याचे भासविले होते. तो महिलेचा आवाज काढून युवकांशी अश्लिल संभाषण करायचा. महिलेचा आवाज ऐकून युवकांचा त्याच्यावर आणखीच विश्वास वाढला. या विश्वासाचा गैरफायदा घेत ते रजिस्ट्रेशन फीस, मसाज किट, हॉटेल बुकिंगसारख्या गोष्टी सांगून पैसे मागू लागले. युवकांकडून मागवलेली रक्कम जमा करण्यासाठी आरोपींनी डझनभर खात्याचा वापर केला. ही रक्कम ते फोन पेच्या माध्यमातून मागविली जायची. आरोपी श्यामलाल योगीच्या खात्यावर पैसे जमा व्हायचे. श्यामलाल योगीकडे एक ‘एनआरआय’ ग्राहकाचा नंबर होता आणि त्या नंबरवरून तो महिलेचा आवाज काढून बोलायचा. या युवकांना नोकरी, काम आणि त्यानंतर मिळणाऱ्या पैशाबाबत सांगितले जायचे.
फसलेला एक युवक नरेला गावातील रहिवासी असून त्याने सर्वकाही कथन केले. तो ऑनलाइनवर नोकरीचा शोध घेत होता. त्याचवेळी एसपी प्ले बॉय सर्व्हिसेस डॉट कॉम नावाच्या संकेतस्थळाची माहिती मिळाली. त्याने संकेतस्थळावरच्या नंबरवर फोन केला असता नोकरी देण्याच्या निमित्ताने आरोपीने सुरवातीला रजिस्ट्रेशन फीस म्हणून २४९९ रुपये देण्याची मागणी केली आणि रक्कम मिळाल्यानंतर तक्रारकर्त्याला व्हॉट्सअपवर एक ओळखपत्र जारी केले. त्यानंतर संबंधित युवकांकडून ४० टक्के कमीशन, मसाज किट, पासकोड फीस तसेच हॉटेल बुकिंग फीस आदीच्या निमित्ताने म्हणजे कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैशाची मागणी केली. अशा रितीने त्याच्याकडून ३९१९० रुपये उकळले; पण कोणतेही काम दिले नाही. तपासादरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स आणि ज्या खात्यात पैसे जमा केले, त्या खात्याची माहिती गोळा केल्यानंतर आरोपी कुलदिप सिंह चारणचा शोध लागला.
पोलिसांनी तपासकामात सहकार्य करण्यासाठी आरोपीला नोटीस पाठवली, परंतु त्याने सहकार्य न केल्याने पोलिसांनी त्याला आणि त्याच्या जोडीदाराला अटक केली. आरोपीकडून फसवल्या गेलेल्या संकेतस्थळ डेव्हलपर्सला देखील सहकार्य करण्यासाठी नोटीस बजावली. पोलिसांच्या मते, यापूर्वी २०२२ मध्ये देखील युवकांना जिगोलो करण्यासाठी आणि भरभक्कम पैसे देण्याचे आमीष दाखवत फसवणूक करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. या टोळीने व्हॉट्सअप आणि डेटिंग अॅप्स सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीरात देऊन गेल्या दोन वर्षांत शंभरपेक्षा अधिक लोकांची फसवणूक केली. विवस्त्र युवतीच्या व्हिडिओ कॉल करण्याचे देखील आमीष दाखवले जायचे आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करत ते व्हिडिओ किंवा संभाषण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती आणि त्यानुसार ती रक्कम वसूल केली जायची. अशा प्रकारे पुरुष वेश्येच्या रुपातून नोकरी देण्यावरून फसवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले. हे एक गंभीर प्रकरण आहे. या निमित्ताने तरुण पिढीला फसवण्याचे बिनदिक्कत काम केले जात आहे. त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा उचलणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करायला हवी. कारण ही टोळी समाजात लैंगिंक अनाचार माजवत आहेत.
● प्रसाद पाटील