पणजी : संपूर्ण गोव्यात गेल्या तीन वर्षांत मलेरियाचा एकही स्थानिक रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे गोवा मलेरिया निर्मूलनाच्या टप्प्यात असून मलेरिया मुक्त झालेले गोवा हे पहिले राज्य असेल, अशी माहिती आरोग्य खात्याच्या मलेरिया विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली.
राज्यात जे परप्रांतीय मजूर येतात त्या पैकी एखाद्याला मलेरिया झाला असल्यास त्याचा तपशील वेगळा ठेवला जातो. पण गेल्या तीन वर्षांत स्थानिक एकही रुग्ण नाही. 2018 मध्ये एक मृत्यू होता परंतु सुदैवाने त्यानंतर मलेरिया प्रमाण घटत गेले आणि गोव्याला मलेरिया मुक्त राज्य होण्याचे नामांकन मिळाले असे त्यांनी सांगितले. या संबंधी केंद्र सरकारकडून लवकरच घोषणा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा पातळीवर सुद्धा मलेरिया मुक्त जिल्हा म्हणून टॅग दिला जातो. दक्षिण गोव्याचा गेल्या पाच वर्षापेक्षा अधि काळाचा तपशील सादर करण्यात आला असून डाटा साठवणे, हाताळणे, रुग्ण सेवा उपचार काळजी असा संपूर्ण तपशील सादर करण्यात आला. तेव्हा दक्षिण गोव्याची प्रशंसा झाली. त्यामुळे दक्षिण गोव्याला इनाम मिळेल असे त्यांनी सांगितले. उत्तर गोव्याचा तपशील लवकरच सादर केला जाईल असे त्या म्हणाल्या.
2021 मध्ये गोव्यात मलेरियाचे 90 रुग्ण आढळले होते. परंतु सक्रिय उपायांमुळे, देखरेखीमुळे 2022 मध्ये ही प्रकरणे दोनवर आली, अशी माहिती राष्ट्रीय वेक्टर- बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामच्या प्रभारी उपसंचालक डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली. ही दोन प्रकरणे उत्तर गोव्यात नोंदवली गेली होती. कांदोळी आरोग्य केंद्रांतर्गत रेईस मागुश आणि कोलवाळ आरोग्य केंद्रातील शिरसई येथे हे रुग्ण आढळले. तसेच 2018 पासून राज्यात मलेरियामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. संपूर्ण राज्याने मलेरियाचा नायनाट केल्याचे घोषित करण्याऐवजी, आरोग्य सेवा संचालनालयाने दक्षिण गोव्यासाठी नामांकन भरले. दक्षिण गोव्याबरोबरच आता पूर्ण गोव्याला पुरस्कार मिळू शकतो. कारण संपूर्ण गोव्यात गेल्या 3 वर्षांत एकही रुग्ण आढळला नाही असे त्या म्हणाल्या.
राज्यात डेंग्यू व इतर आजार वाढलेले दिसतील, पण ते मलेरिया नव्हे. असे सांगताना मलेरिया नियंत्रणात आहे. मलेरियाचे डास पैदास वाढू द्यायची नाही हे उद्दिष्ट तर आहेच. त्याही पेक्षा मलेरियाचे सूक्ष्म जिवाणू घेऊन गोव्यात परप्रांतीय येतात त्यांच्यावर नजर ठेवून उपचार करणे, त्यांना मलेरियाच्या गोळ्या घरी न्यायला न देता आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका त्यांच्या समोरच गोळ्या घेण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे फैलाव आवरता आला असे त्यांनी सांगितले.
मादी डास मलेरिया पसरवते
उंदिर नारळ, बोंडे पोखरतात ते खाली पडतात, त्यात पावसाळ्यात पाणी साचते. करवंट्या, टायर पावसात राहिल्यास त्यात मलेरियाच्या डासांची पैदास होते. असे डास यापूर्वी मलेरिया झालेल्या एखाद्या व्यक्तीला चावल्यास त्या डासांच्या सोंडीत परत मलेरियाचे जिवाणू जीवंत होतात आणि हे डास सर्वांना चावत सुटतात आणि मलेरियाचे थैमान घालतात. फक्त मादी डास मलेरिया पसरवते अशी माहिती डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली. घराच्या अवती भवती पाणी साचू देऊ नका तसेच परप्रांतीय राहायला आले असल्यास ते मलेरिया कॅरियर असू शकतात हे लक्षात ठेवून आरोग्य संचालनालयाला कळवा असे डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले.
