Sheena Bora massacre | २०१५ चं वर्ष होतं. मुंबई पोलीसचे कमिशनर राकेश मारिया निवृत्त होणार होते. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून शीना बोरा नावाची तरुणी ही गायब असून तिचा मृत्यू झाला आहे आणि त्याचा आपण तपास करावा अशी विनंती केली, शीना बोरा देशातल्या महत्त्वाच्या स्टार चॅनेलची सीईओ इंद्राणी मुखर्जी यांची मुलगी असल्याचंही त्या व्यक्तीने सांगितलं होतं. या फोनने राकिश मारिया यांचं डोकं चक्रावून गेलं. त्यांनी आपल्या दोन विश्वासू अधिकाऱ्यांना अतिशय गुप्ततेत या बातमीतली सत्यता तपासावी असं सांगितलं.
योगायोगाने २१ ऑगस्ट २०१५ या दिवशी बेकायदा शस्त्र बाळगल्याबद्दल पोलिसांनी श्याम पिंटूराम राव वाला अटक केली होती. त्याची चौकशी करताना त्याने एक वेगळंच सत्य पोलिसांसमोर उप केलं. त्याने शीना बोराची हत्या इंद्राणी मुखर्जीने तीन वर्षांपूर्वी केली असल्याचा जबाब पोलिसांना दिला. श्याम हा इंद्राणी मुखर्जीच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून काही काळ काम करत असल्यामुळे त्याने दिलेला जबाब पोलिसांनी गांभीर्याने घेतला.
पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने पावलं टाकत २५ ऑगस्ट २०१५ ला इंद्राणी मुखर्जीवर शीनाच्या हत्येचा आरोप करत तिला अटक केली. कलम ३०२ अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल केला. तसंच इंद्राणीचा पूर्वपती संजीव खन्ना यालाही अटक केली. अटक केल्यावर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तसंच १९ नोव्हेंबर २०१५ मध्ये इंद्राणीचा सध्याचा पती पीटर मुखर्जी यांना अटक केली.

इंद्राणी मुखर्जीने शीना बोरा हिची हत्या का केली असेल या चर्चांना सर्वत्र एकच उधाण आलं होतं. पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक गोष्टी समोर आल्या. त्यांनी पोलीस जसे चक्रावले, तशीच सर्वसामान्य जनताही चकित झाली. लौकिकार्थाने शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जीची बहीण होती. तसंच शीनाप्रमाणे मिखाईल हा भाऊही इंद्राणीला होता. शीना आणि मिखाईल आपल्या आजी-आजोबाजवळ राहत होते. पुढे शीनाने मुंबईला येऊन शिकायचा हट्ट धरला आणि ती मुंबईत इंद्राणीसोबत येऊन राहू लागली. पीटर मुखर्जी यांची पहिली पत्नी आणि पीटर यांचा घटस्फोट झाला होता. त्यांचा मुलगा राहुल मुखर्जी हा कधी आईसोबत तर कधी पीटर मुखर्जी सोबत राहत होता. शीना बोरा मुंबईत आली तेव्हा राहुल आणि शीना यांच्यात प्रेम निर्माण झालं. या दोघांच्या प्रेमाला इंद्राणीचा विरोध होता. पण, दोघांनीही तिचा विरोध जुमानला नाही. मात्र, रोजच्या घरातल्या कटकटींना कंटाळून शीना मुंबईतच दुसऱ्या ठिकाणी राहायला निघून गेली. आता तिला आणि राहुलला भेटणं सोयीचंही झालं होतं.
शीना आणि राहुलचं लग्न झालं तर ती संपत्तीमधली वाटेकरी होऊन मनमानी करेल आणि आपलं भूतकाळाचं सत्य समोर येईल या भीतीतून इंद्राणीने शीना बोराची हत्या करण्याचा कट रचला. यात तिने आपला पूर्वपती संजीव खन्ना याला सामील करायचं ठरवलं. संजीव खन्ना आणि इंद्राणी यांनीही विधी या मुलीला जन्म दिला होता. तिच्या नावे मी संपत्तीचा हिस्सा देईन असं अमिष तिने संजीव खन्नाला दाखवलं. २४ एप्रिल २०१२ या ठरलेल्या दिवशी ड्रायव्हर श्याम, संजीव खन्ना आणि इंद्राणी मुखर्जी यांनी बांद्रयाच्या लिंकिंग रोडला शीनाला फोन करून बोलावलं. तुमच्या लग्नाला आपला विरोध नसल्याचं सांगत खरेदी करूयात असं म्हणत तिला गाडीत बसवलं. तिला गुंगीचं औषध टाकलेलं कोल्डड्रिंक प्यायला देत तिचा गळा दाबून धावत्या गाडीतच संजीव खन्नाने तिची हत्या केली. पहाटे तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं ठरवून सगळेजण घरी परतले आणि गाडी गॅरेजमध्ये शीना बोराच्या शवासह पार्क केली.

२५ एप्रिल २०१२ च्या भल्या पहाटे चार वाजता उठून इंद्राणी, संजीव खन्ना आणि श्याम रायगडच्या दिशेने निघाले. रायगडच्या एका भागात त्यांनी शीनाला बॅगसह रस्त्याच्या कडेला फेकलं. तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळलं आणि शांतपणे सगळे तिथून निघून वरळीतल्या आपल्या घरी परतले. त्यानंतर शीनाच्या फोनवरून इंद्राणीने तिच्या ऑफिसला ईमेल करून राजीनामा पाठवून दिला. राहुलला आपण तुझ्याशी कुठलेही संबंध ठेवू इच्छित नसल्याचं सांगत अमेरिकेला जात असल्याचा मेसेज केला. त्यानंतर इंद्राणी निश्चिंत झाली. मात्र, श्यामच्या जबाबामुळे तिचं सगळं भांडं फुटलं होतं.
इंद्राणी मुखर्जीला अटक केल्यावर पोलिसांना रोज नवीन गोष्टींचा उलगडा होत होता. इंद्राणी मुखर्जी ही अत्यंत महत्त्वाकांक्षी स्त्री होती. मेघालयातल्या शिलाँग इथे ती राहत होती. तिचं नाव परी बोरा, तर तिच्या वडिलांचं नाव उपेंद्रकुमार बोरा आणि आईचं नाव दुर्गाणी होतं. इंद्राणीच्या जबाबानुसार उपेंद्रकुमार यांनी इंद्राणी म्हणजे परी १४ वर्षांची असताना तिच्यावर लात्कार केला होता आणि त्यातून शीनाचा जन्म झाला होता, त्यामुळे एका अर्थाने शीना ही इंद्राणीची मुलगी तर दुसऱ्या अर्थाने बहीण होती. त्यानंतर परी हिची सिद्धार्थ दास याच्याशी ओळख झाली आणि त्यांनी मिखाईल या मुलाला जन्म दिला. सिद्धार्थ दास आणि परी एकत्र तीन वर्ष लग्नाशिवाय राहिले. त्यानंतर १९८९ मध्ये परी गोहाटी सोडून कोलकत्याला गेली. तिथे तिने कॉम्प्युटरचं शिक्षण घेतलं. मात्र, कोलकत्वाला जाताना तिने शीना आणि मिखाईल यांना आपल्या आई-वडिलांजवळ सोडलं. १९९३ साली परीने कोलकत्यामध्ये संजीव खन्ना या व्यावसायिकाशी लग्न केलं. त्या दोघांनी विधी नावाच्या मुलीला जन्म दिला. मात्र, २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि त्याच वर्षी परी ऊर्फ इंद्राणीने पीटर मुखर्जीशी लग्न केलं.
२००६ मध्ये शीना आणि मिखाईल यांना आपली आई इंद्राणी मुखर्जी ही मुंबईत असल्याचं समजलं, तेव्हा त्यांनी मुंबईत येण्याचा हट्ट धरला. इंद्राणीने शीना आणि मिखाईल ही आपली मुलं आहेत ही ओळख लपवण्यासाठी त्यांना आपल्याला बहीण म्हणूनच हाक मारायची आणि तेच नातं जाहीर करायचं अशा काही अटी घातल्या. मिखाईलने ही गोष्ट जेव्हा नाकारली, तेव्हा त्याला चक्क मानसिक रुग्णालयात ठेवून त्याचा महिनाभर छळ करण्यात आला. शीनाने मात्र इंद्राणीच्या अटी मान्य करत मुंबईतल्या सेंट झेव्हिएर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. २००९ मध्ये तिने बॅचलर ऑफ आर्टसूची पदवी मिळवली आणि २०११ च्या जून महिन्यापासून मुंबई मेट्रो वनमध्ये ती असिस्टंट मॅनेजर या पदावर जॉईन झाली. मात्र, २४ एप्रिल २०१२ नंतर शीना बोरा ही कोणालाच दिसली नाही.
पोलिसांनी आपल्या तपासात रायगडमधल्या निश्चित ठिकाणी श्याम राय या ड्रायव्हरला नेलं असताना तिथे हाडांचे जळालेले अवशेष आणि कवटी आणि दात सापडले. फॉरेन्सिक टीमला इंद्राणीच्या
डीएनएशी ते मॅच करता आले. पीटर मुखर्जी हे जामिनावर सुटले आणि त्यांच्या भूमिकेमुळे इंद्राणी मुखर्जीने तुरुंगात असताना त्यांच्यापासून घटस्फोट घेतला. २०२२ साली मुंबई उच्च न्यायालयाने इंद्राणीला सहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर जामीन मंजूर केला. जामिनावर सुटल्यावर इंद्राणी मुखर्जीने ‘अनब्रोकन’ नावाचं पुस्तक लिहिलं. त्यात तिने आपण निरपराध असून शीना बोरा जिवंत असल्याचं सांगितलं. न्यायालयात खटला सुरू आहे. शंभरच्या वर सरकारी साक्षीदारांची साक्ष बाकी आहे. निकाल प्रतीक्षेत आहे.
adipaa@gmail.com