भारती विद्यापीठ- देवराईच्यावतीने 25 व 26 एप्रिल रोजी आयोजन
कडेगाव शहर : सह्याद्री देवराई व भारती विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 व 26 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पहिले दोनदिवसीय बीज संमेलन होणार आहे. ‘एक तरी झाड लावूया, चला सावली पेरूया’ हे या संमेलनाचे बोधवाक्य आहे. हे संमेलन भारती विद्यापीठाच्या पुणे-सातारा रोड येथील धनकवडी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात होणार आहे, अशी माहिती सह्याद्री देवराईचे संस्थापक-अध्यक्ष व अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली. भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, विचारभारतीचे प्रा. मिलिंद जोशी यावेळी उपस्थित होते. #Sahyadri Devrai Founder-President and Actor Sayaji Shinde
दि. 25 एप्रिलरोजी सह्याद्री देवराईचे दहा तज्ज्ञ सदस्य भारती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना ताम्हिणी घाटात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बीज संकलनाचे शास्त्रीय प्रशिक्षण देणार आहेत. त्यानंतर राज्यातून बिया गोळा करणार आहेत. सकाळी 11 वाजता ‘हरित संपत्तीचे दालन’ या प्रदर्शनाचे उद्घाटन भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांच्याहस्ते होणार असून पर्यावरणतज्ज्ञ एस. आर. यादव व उपवन संरक्षक पुणे महादेव मोहिते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 6 ते 9 या वेळेत पर्यावरण विशेष चर्चासत्र होणार असून त्यात संजय पाटील, डॉ. मंदार दातार, डॉ. अपर्णा वाटवे, सुहास वेंगणकर हे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. इरीच भरुचा या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी आहेत. पर्यावरणतज्ज्ञ सी. बी. साळुंखे व सह्याद्री देवराईचे उपाध्यक्ष अरविंद जगताप यावेळी प्रमुख अतिथी आहेत.
दि. 26 एप्रिलरोजी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ख्यातनाम ज्येष्ठ शास्त्रीय गायक आचार्य पंडित मुकुल शिवपुत्र यांच्याहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तसेच भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बियांतून भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदम यांची बीजतुला करण्यात येणार आहे.
