
जगद्गुरु म्हणजे जगाचा गुरु, जगाचा मार्गदर्शक, जगाचा नीतीशिक्षक. जगामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्चन यांच्याप्रमाणे मुस्लिमही राहतात. खरंतर ‘सत्य तोचि धर्म असत्य हे कर्म’ सांगणारे तुकोबाराय, ‘भूतदया’ सांगणारे तुकोबाराय, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ सांगणारे तुकोबाराय, ‘तुका म्हणे आता आम्हासी हे भले । अवघेची झाले जीव जंत ।।’ सांगणारे तुकोबाराय, ‘अनु रेणू या थोकडा तुका आकाशाएवढा’ सांगणारे तुकोबाराय हे विश्वव्यापक आहेत. त्यांना आपण लहान करता कामा नये किंवा आपण संतांना चौकटीमध्ये बांधू शकत नाहीत. संत हे विशाल असतात. संत तुकाराम महाराजांच्या काळात त्यांना मानणारे अनेक मुस्लिमही होते. त्यांचे ते सहकारीही होते. यामध्ये मूळ बीड जिल्ह्यातील व कर्मभूमी श्रीगोंदा असणाऱ्या संत शेख महम्मद महाराज, अनगडशहा फकीर यांची नावे घ्यावी लागतील. संत तुकाराम महाराजांनी अल्लावर काही अभंग रचलेले आहेत. भक्ती पंथामधील मुस्लिम संतांचे वर्णनही त्यांनी आपल्या अभंगातून केले आहे. याचा थोडक्यात परामर्श पाहूया- #JagadguruSantTukaramMaharaj #Islam #Spirituality #InterfaithDialogue
संत शेख महम्मदः
शेख महम्मद हे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा गावचे. त्यांची कर्मभूमी श्रीगोंदा होती. ते संत तुकाराम महाराजांचे समकालीन होते. त्यांच्यापेक्षा वयाने खूप ज्येष्ठ होते. त्यांनी योगसंग्राम, निष्कलंक प्रबोध, अभंग गाथा तसेच इतर अनेक ग्रंथांचे लेखन केलेले आहे. तुकाराम महाराज व शेख महम्मद महाराज यांची ओळख पंढरपूरला झाली होती.
‘शेख महंमद अविंद्य ।
त्याचे हृदयी गोविंद ।
ही त्यांची भूमिका होती. त्यांनी संत तुकाराम महाराजांना पंढरपुरात फेटा बांधून कीर्तन करायला लावले. दुसरी गोष्ट संत तुकाराम महाराज किर्तन करत असताना देहू येथे मांडवाला आग लागली. ती आग शेख मोहम्मद यांनी विझवल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. ‘तू माझा सांगाती’ या संत तुकाराम महाराजांच्या मालिकेत दोघांच्या संबंधावर तीन भाग दाखवण्यात आलेले आहेत. ‘तुकाराम दर्शन’ या संत तुकाराम महाराजांचे वंशज असणाऱ्या व साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असणाऱ्या डॉ. सदानंद मोरे यांच्या ग्रंथात ‘जातनसु मुझे कच्छू नही प्यार’ हे प्रकरण यात शेख मोहम्मद यांची माहिती दिलेली आहे. आजही शेख मोहम्मद यांचे वंशज दिंडी घेऊन देहुला जातात.
अनघडशा फकीर
तुकोबांचे समकालीन सुफी सिद्ध पुरुष म्हणजे अनगडशा फकीर..! देहूत प्रवेश करताना ओढ्याजवळ त्यांचे स्मारक आहे. त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज व अनगडशा यांची भेट झाल्याचे सांगितले जाते. पंढरपूरला देहू वरून पालखी जाताना आजही पहिला विसावा व आरती त्यांच्या भेट स्थळावर होते. दोघांच्या भेटीविषयी एक कथा सांगितली जाते. अनगडशा हा खूप मोठा सिद्ध फकीर होता. देवाच्या दिलेल्या देणगीमुळेही त्याचा कटोरा भरला नाही. पण संत तुकाराम महाराजांच्या कन्या भागीरथीबाई यांच्या चिमूटभर पिठाने तो भरला. त्या वेळी अनघडशा यांचा अहंकार गेला आणि त्यांनी तुकोबांच्या चरणाशी लोटांगण घातले. पुढे जीवनभर त्यांची मैत्री राहिली असे उल्लेख आहेत. आजही त्यांचे वंशज बीजेच्या दिवशी उपवास धरतात अशी नोंद डॉ. सदानंद मोरे यांनी ‘तुकाराम दर्शन’ या ग्रंथात केलेली आहे.
मुस्लिम संतांचे वर्णनः
‘पवित्र ते कुळ पावन तो देश’ या मोठ्याअभंगात त्यांनी विविध जाती धर्मातील भक्तांचे वर्णन केलेले आहे-
‘कबीर मोमीन लतीफ मुसलमान। सेनान्हावी जाण विष्णुदास ।।’ ‘ कबीराचे मागी विणी शेले’
तुकोबांवर संत कबीरांचा मोठा प्रभाव दिसून येतो हे आपण सहज म्हणू शकतो. कबीरदास पंढरीचे वारकरी होते. तसेच संत तुकाराम महाराजांनी कबीरांच्या प्रभावातुन एकूण ३० हिंदी भाषेतील दोह्यांचे लेखन केलेले आहे. जे कबीरांची सरळ सरळ नाते सांगतात. याविषयी मी स्वतः ‘संत तुकारामांचे दोहे’ या नावाचा छोटासा ग्रंथ लिहिला आहे.
‘काफर’ची व्याख्या:
संत तुकाराम महाराजांनी ‘काफर’ कोणाला म्हणायचे ? यावर ३० दोघांपैकी एका दोह्यात स्पष्टपणे सांगितलेले आहे. कोठोर हृदयाचा तो
काफर अशी त्यांची व्याख्या आहे.
‘काफर सोही आपण बुझे ।
अल्ला दुनियां भर ।
कहे तुका तुम्हें सुनो रे भाई ।
हिरिदा जिन्होका कठोर ||१||
अर्थ- काफर तोच आहे जो दुटप्पी वागतो. तोंडाने सांगायचे अल्ला सगळ्या चराचरात आहे असे सांगायचे आणि इतरांशी वागताना मात्र कठोर हृदयाने वागायचे. असे वागणारा काफर असतो.
‘अल्ला’वर अभंग:
तुकोबारायांना मुस्लिम समाजातील लोकही मानायचे. त्यांच्या सानिध्यात त्या काळातील मुस्लिम फकीर, सुफी संत होते. तुकोबांनी डोईफोडा, दरवेश, मलंग, मुंडा यांची रूपके वापरून हिंदी भाषेमध्ये अभंग लिहिलेले आहेत. मुस्लिमांना मार्गदर्शन करताना त्यांनी अल्लावर विविध अभंग लिहिलेले आहेत.
आवल्ल नाम आल्ला बडा । लेते भुल न जाये ।
इलाम त्याकालजमुपरताही तुंब बजाये ||१||
आल्ला एक तुं नबी एक तुं ॥ध्रु.॥
काटतें सिर पावों हात नहीं जीव डराये ।
आगले देखो पिछले बुझो आपें हजुर आयें ॥२॥
सब सबरी नचाव म्याने खडा आपनी सात ।
हात पावों रखते जबाब । नहीं आगली बात ||३||
सुनो भाई बजार नहीं । सब हि नर चलावे ।
नन्हा बड़ा नहीं कोये । एक ठोर मिलावे ||४|
एक तरि नहीं प्यार जीवतनकी आस ।
कहे तुका सोहि मुंढा राखलिये पायेनपास ||५||
अल्लाच नाव हे सर्वात मोठं आहे. ते नामस्मरण करायला विसरू नका. या पद्धतीचे मार्गदर्शन त्यांनी ‘मुंढा’ या रूपकामध्ये सांगितलेले आहे.
तम भज्याय ते बुरा जिकीर तै करे ।
सीर काटे ऊर कुटे ताहां झड करे ||१||
ताहां एक तु ही ताहां एक तु ही ।
ताहां एक तु ही रे बाबा हम तुम्ह नहीं ॥ध्रु.॥
दिदार देखो भले नहीं किसे पछाने कोय ।
सच्चा नहीं पकड़ सके झुटा झुटे रोय ॥२॥ किसे कहे मेरा किन्हे सती लिया बास ।
नहीं मेलो मिले जीवना झुटा किया नास ||३||
सुनो भाई कैसा तो ही होय तैसा होय ।
बाट खाना आल्ला कहना एकबारां तो ही ||४||
भला लिया भेक मुंढे आपना नफा देख ।
कहे तुका सो ही सखा हाक आल्ला एक ||५||
डोईफोडा या रूपकात्मक अभंगांमध्ये तुकोबाराय सांगतात की, बाबा
रे तू डोकं का फोडून घेतोस ? तू असं काही करू नकोस. तू फक्त अल्लाहाचं नामस्मरण कर नीतिमत्तेने वाग.
अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज ।
गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ||१|| ख्याल मेरा साहेबका। बाबा हुवा करतार ।
व्हांटें आधे चढे पीठ । आपे हुवा असीवार ||२|
जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्यां अंदर भेस ।
कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ||३||
‘दरवेष’ या रूपकामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी जर अल्लाने अवकृपा केली तर राजाचा रंक होतो या पद्धतीचे मार्गदर्शन केलेल आहे.
अल्ला देवे अल्ला दिलावे । अल्ला दारु अल्ला खलावे ।
अल्ला बिगर नही कोय । अल्ला करे सो हि होये ||१||
मर्द होये वो खडा फीर । नामर्दकुं नहीं धीर ।
आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ।।धु ।।
सब रसोंका किया मार। भजनगोली एक हि सार ।
इमान तो सब ही सखा। थोडी तो भी लेकर जा ॥२॥
जिन्हो पास नीत सोये । वो हि बनकर ते रोवे ।
सांतो पांचो मार लगावे । उतार सो पीछे खावे ||३||
सब ज्वानी निकल जावे। पीछे गधडा मटटी खावे ।
गांवढाळ सो क्या लेवे। हगवनि भरी नहि धोवे ||४||
मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सो हि पाया ।
तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ||५||
बजारका बुझे भाव । वो हि पुसत आवे ठाव ।
फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लेंवो सखा ||६||
हा तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगामधून तुकोबाराय सांगतात, की देणारा घेणारा, करता करविता हा अल्हाच असतो. याप्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची मुस्लिम विषयक भूमिका आहे किंवा त्यांचा मुस्लिम विषयक सहसंबंध आहेत. त्यांनी सांगितलेल्या इतर नितीविषयक मार्गदर्शन हे तर सर्वच समाजासाठी लागू आहे.
श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड, मो.९४०५३४४६४२