लहरी हवामान, आर्थिक मंदी, साथीचे रोग या कारणांमुळे जगात आजही ७३३ दशलक्ष तर भारतात १९ कोटी लोक रात्री खायला अन्न न मिळाल्यामुळे उपाशी झोपतात. तसेच जगात तब्बल २.८ अब्ज लोकांना संतुलित आहार मिळत नाही, असा ताजा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाने प्रकाशित केला आहे. दरम्यान, भारतात ४० टक्के अन्नाची नासाडीही होत असल्याचे दिसून आले आहे.
जागतिक अन्न दिन दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जगातील १५० देशांत साजरा केला जातो. भूक आणि कुपोषणविरहीत जगाचे स्वप्न साकार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मात्र आजही जगात ७३३ दशलक्ष लोक उपाशीच राहत आहेत, अशी अवस्था विपुल अन्नधान्य असूनही आहे. त्यासाठी अन्न हा आमचा अधिकार असे यंदाच्या अन्न दिनाचे ब्रीदवाक्य संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केले आहे.

५० हजार कोटींच्या अन्नाची नासाडी : भारतात अन्नधान्याचे उत्पादन पुरेसे असले तरीही अन्न नासाडी मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे हे अन्न गरजूंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे भूकबळींची संख्या आटोक्यात आणणे सरकारसमोर आव्हान बनले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार भारतात तब्बल ४० टक्के अन्न वाया जाते. याचे खाण्यात रुपांतर केले तर पैशांत ही रक्कम ५० हजार कोटी रुपये इतकी होते. लग्नसोहळे, हॉटेल्स, कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमात आणि घरांतही मोठ्या प्रमाणावर अन्न टाकले जाते, असे या अहवालात म्हटले आहे.