गेल्या सहस्त्रकात जगातील अनेक प्रदेशांमधे मोठे नरसंहार करून त्या प्रदेशांचा ताबा मिळवणारे अनेक क्रूरकर्मा होऊन गेले. त्यातील अनेकांनी तेथील संस्कृतीही नष्ट करण्यात यश मिळविले. अशा क्रूरकर्मा राज्यकर्त्यांच्या यादीत चेंगझखान या मंगोलियन सम्राटाचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. असे म्हणतात की, चेंगिझखानाने त्यांच्या कारकिर्दीत सुमारे दोन ते अडीच कोटी माणसांची कत्तल केली असावी ! एवढेच नाही तर त्याला विरोध करणाऱ्यांची त्याने सरसकट कत्तल करताना तेथील महिलांवर बलात्कार करून त्यांना तर ठार मारलेच, पण तिथल्या कुत्र्या-मांजरांनाही ठार मारले. आपल्या भटक्या मंगोल टोळ्यांची एकजूट करून इतर टोळ्यांवर हल्ले करणे, लुटालूट करणे अशी सुरुवात करून पुढे आपले एक साम्राज्य स्थापन करणारा चेंगझखान हा बौद्ध धर्मीय होता. त्याच्या घोडेस्वारी आणि तिरंदाजीबद्दल तो विख्यात होता. चेंगझखानाच्या आक्रमकतेविषयी इतिहासकारांमध्ये मतभिन्नता आहे. काहींच्या मते अगणित हत्या करणारा हा सम्राट, एक पिसाट क्रूरकर्मा होता. परंतु, काहींच्या मते केवळ त्याला जे विरोध करतील त्यांनाच तो थेट यमसदनास धाडीत असे. आपल्या कारकिर्दीत चेंगिझखानाने इराण, गझनीसहित तत्कालीन पश्चिम भारताचा भाग असलेल्या काबूल, कंदहार, पेशावरसहित काश्मीरच्या काही भागांवर विजय मिळवत हा प्रदेश त्यांच्या साम्राज्याला जोडला. मंगोलियन वंशातील अनेक जमातींचे लोक टोळ्या करून हल्ली जिथे मंगोलिया हे राष्ट्र आहे, त्या प्रदेशात रहात होते. या भटक्या टोळ्या आजूबाजूच्या प्रदेशांवर आक्रमण करीत असत. पण, त्यांच्यात एकी नव्हती आणि एके ठिकाणी स्थायिक होऊन राहण्याची त्यांची वृत्ती नव्हती. त्यापैकी एका टोळीत १९६२ साली तेमुजीन याचा जन्म झाला. हा मुलगाच पुढे चेंगझखान या नावाने प्रसिद्ध झाला. दुसऱ्या टोळीवाल्यांकडून वडिलांचा खून झाला, तेव्हा तेमुजीन १२ वर्षांचा होता. चौदाव्या वर्षी तो कुटुंबप्रमुख आणि टोळीप्रमुख झाला. एवढ्या लहान वयात टोळीप्रमुख होऊन तेमुजीनने सर्व जबाबदारी स्वतःकडे घेतली, म्हणून टोळीच्या लोकांनी त्याला ‘चेंगिझखान’ (जगाचा प्रशासक) अशी बहुमान दर्शक उपाधी दिली. मंगोलियाच्या या भागात काही टोळ्यांमधील लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. टोग्रील या ख्रिश्चन टोळीप्रमुखाशी चेंगिझखानचे मित्रत्वाचे संबंध होते.

चेंगझखानाच्या राज्याच्या पूर्व आणि दक्षिण सरहद्दीपलीकडे मांचुरिया या प्रदेशात मांचुरीयन लोकांचे जीन हे राज्य होते. चेंगिझखानचा मित्र टोग्रील याच्या मदतीने मांचुरीयन राज्याची राजधानी यानझिंग म्हणजेच हल्लीचे बीजिंग त्याने जिंकली आणि त्याचबरोबर चीनचा उत्तर आणि पूर्वेकडील बराचसा प्रदेश आपल्या राज्याला जोडून अंमलाखाली आणला. यानझिंग आणि चीनचा उत्तरेतला प्रदेश जिंकल्यावर चेंगझखानाने आपला एक लष्करी अधिकारी प्रशासनासाठी तिथे ठेऊन स्वतः दुसऱ्या मोहिमांवर निघून गेला. इथून पुढे त्याने निरनिराळे दूरवरचे प्रदेश जिंकण्याचा धडाकाच लावला. त्याचा अचानक हल्ले करण्याचा वेग एवढा जबरदस्त असे आणि त्याची दहशत इतकी भयंकर असे की, चेंगिझखानाची फौज जाईल तिथल्या आजूबाजूच्या प्रदेशातल्या लोकांचे धाबे दणाणून जात असे.
केवळ १२ वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत त्याचे साम्राज्य पूर्वेकडे उत्तर चीनपासून पश्चिमेला रशिया, अफगाणिस्तानपर्यंत ते उत्तरेस सैबेरियापासून दक्षिणेस तिबेटपर्यंत पसरले. चेंगिझखानाची फौज एखाद्या वावटळीसारखी येऊन गावेच्या गावे लुटून आणि घरे जमीनदोस् करून निघून जाई. सुरुवातीच्या त्याच्या आक्रमणांमध्ये त्याने केलेल्या सामान्य लोकांची कत्तल आणि विध्वंसामुळे लोक भयभीत होत असत. जगातल्या अत्यंत क्रूर आक्रमकांमध्ये त्याचे नाव घेतले जात असे.
चेंगझखान याने आसपासच्या प्रदेशातील अनेक राज्ये जिंकली आणि त्यानंतर तेथील राजांनी चेंगिझखानाचे मांडलिकत्व स्वीकारले. त्यांना चेंगझखानाचे खानेट म्हटले जाते. विशेष म्हणजे त्या मांडलिक राजांनाही ‘खान’ म्हटले जाई आणि चेंगिझखानाला ग्रेट खान (बडाखान) म्हटले जाई. बड़ा खानाच्या साम्राज्याच्या पश्चिमेकडील हद्दीवर तानगूत येथे झिया राजवट होती. त्या झिया राजाला चेंगिझखानाने पराभूत करून तो प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट करून घेतला. झिया प्रदेशाच्या पलीकडे पश्चिमेला ख्वारेझम (हल्लीचे उझबेकिस्तान) नावाचे राज्य होते. युरोपमधून चीनकडे जाणारा व्यापारी रस्ता प्रसिद्ध सिल्करोड या ख्वारेझम राज्यातूनच पुढे जाई. या राज्यात शहा अल्लादीन महम्मद यांची सत्ता होती. मध्य आशियातील महत्वाचा प्रदेश अफगाणिस्तानातून काळा समुद्रापर्यंत या शहा अल्लादीनाच्याच अधिपत्याखाली येते असे. चेंगझखानाचे अल्लादीन महम्मद याच्याशी तसे व्यापारी संबंध होतेच. तिथे त्यांचे येणे जाणे होतेच, पण याशिवाय अल्लादीनच्या या सुपीक आणि संपन्न राज्यावर चेंगिझखानाचा डोळा होताच.
अल्लादीनच्या ख्वारेझमच्या राजधानीचे शहर समरकंद हे मोठे व्यापारी आणि संपन्न शहर होते. चेंगझखानच्या राज्यातील अनेक लोकांचे समरकंद येथे व्यापाराच्या निमित्ताने जाणे होत असे. एकदा असेच काही व्यापारी आपला माल घेऊन समरकंद येथे गेले होते. समरकंदचा एक सरदार इनालचक याने त्या व्यापाऱ्यांचा सर्व माल जप्त करून त्यांना अटकेत ठेवले. हे समजल्यावर चेंगझखानाने आपले तीन दूत शहा अल्लादीनकडे पाठविले. या तीन दूतांमध्ये दोन मंगोलियन आणि एक मुस्लिम होता. अल्लादीनाने त्या मुस्लिम माणसाला ठार मारून त्याचे शिर त्या दोन मंगोलियन दूतांबरोबर चेंगझखानाकडे पाठविले. ते पाहून अपमानित झालेल्या चेंगझखानाने याचा सूड उगविण्याची तयारी सुरू केली.
सुनीत पोतनीस