वाचनाचा आनंद काही आगळाच असतो. मनाजोगे पुस्तक जेव्हा हाती येतो ते हा ना काही जी दुःखे जिसका मखया पुस्तका पुस्तकावर तुटून पडतो आणि त्याच्या सहवासात हरवून नि हरखून जातो. वैराण वाळवंट असो, रणमैदान असो, समुद्र असो की पहाड असो, गुहा असो की तुरुंगाची कोठडी असो. वाचनप्रिय माणसाला एकदा का पुस्तक हाती आले की, रत्नभंडार सापडल्याचा आनंद होतो. नेपोलियन इतका वाचनप्रिय होता की, समरांगणावरही तो पुस्तकांची साथ सोडत नसे, असे म्हणतात. याचाच अर्थ असा की, ‘वाचना’चे काही शास्त्र होऊ शकत नाही आणि ‘कला’ दृष्ट्याही त्याचा विचार होऊ शकत नाही. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायाने ज्याला जसे, जितके, जेव्हा आणि जेथे वाचायचे असेल तसे तो वाचतो आणि आनंद प्राप्त करून घेतो.
वाचन हा शब्द ‘वच्’ या धातूपासून झाला आहे. ‘वच’ म्हणजे बोलणे. त्यामुळे मुळात वाचन याचा अर्थ ‘बोलणे’ असा होतो. ‘पुस्तक वाच’ याचा अर्थ पुस्तकास बोलव असा होतो. येथे ‘बोलव’ याचा अर्थ ‘हाक मारणे’ असा नसून ‘बोलते कर’ असा आहे. यावरून हे लक्षात येते की, प्रथम ‘बोलणे च अस्तित्वात होते आणि नंतर वाचन अस्तित्वात आले. वाचन जे लिहिले असते त्याचे होते. म्हणजे लेखनकला ही जेव्हापासून अस्तित्वात आली तेव्हापासून वाचन सुरू होते. ज्यावेळी ती अस्तित्वात नव्हती त्यावेळी ज्ञान हे वक्तृत्वाच्या, संभाषणाच्या अथवा बोलण्याच्या क्रियेतून मनात साठवून ठेवले जात असे. प्राचीन काळी वाचनाऐवजी ग्रंथाचे श्रवणच अधिक प्रमाणात होत असल्यामुळे त्या काळाला श्रवणसंस्कृतीचा काळ म्हटले जाते. या काळातले वाङ्मय हे प्रामुख्याने धर्मपर असायचे. या काळी अध्यापनाचे व संग्रहाचे साधन एकच असे. ते म्हणजे ब्राह्मणमुख अथवा गुरुमुख होय. तत्कालीन सर्व विद्या गुरूस मुखोद्गत करावी लागत असे. आणि ही विद्या साहजिकच विद्यार्थ्यांस गुरुमुखाने मिळे. त्यामुळे तत्कालीन प्रत्येक पढिक गुरूचे मुख हे एक स्वतंत्र ग्रंथसंग्रहालयच असे. मौखिक शिक्षण योग्य स्वरांसह व आविर्भावांसह मिळत असल्यामुळे त्याचा पुस्तकी विद्येपेक्षा साहजिकच चिरस्थायी संस्कार होई.
पुढे लेखनकलेचा शोध लागल्यावर पुस्तकांचे लेखन व संग्रह होऊ लागले. लेखक आपले वाङ्मय स्वतःच वा इतरांकरवी लिहून घेऊ लागले. अशा प्रकारे तयार झालेल्या हस्तलिखित प्रती व त्यावरून त्याच्या आणखी प्रती तयार करणारे व्यावसायिक निरनिराळ्या ठिकाणी जाऊन त्या प्रतींची विक्री करीत. परंतु या सर्व प्रक्रियेला साहजिकच मर्यादा असल्यामुळे ग्रंथांचा प्रसार व त्याचे वाचन कमी होत असे.
मुद्रणतंत्र अस्तित्वात आल्यानंतर मात्र ही परिस्थिती पालटली. आपल्या वाङ्मय संस्कृतीने श्रवणयुगातून वाचनयुगात प्रवेश केला. मुद्रणामुळे ग्रंथ सहजपणे वाचकांना उपलब्ध होऊ लागले. वाचनसंस्कृतीने मूळ धरून तिचा • विस्तार व्हायला लागला. आतापर्यंतचे ग्रंथ ज्याला प्रामुख्याने धार्मिक ग्रंथांतील कथांचा आधार होता त्याच्या कक्षा विस्तारात जाऊन जीवनातील सर्व विषयांचा लिखाणात अंतर्भाव व्हायला लागला. ग्रंथप्रकाशन, ग्रंथवितरण, ग्रंथविक्री, सार्वजनिक ग्रंथालये, वाचनालये, मासिके, वृत्तपत्रे वगैरे वाचनाची भूक भागविणारे अनेक घटक निर्माण झाले. त्यामुळे वाचकाला कोणत्याही वेळी, कुठेही आणि कोणतेही वाङ्मय वाचण्याची सोय उपलब्ध झाली. वाचनाची गरज आणि मागणी अमर्याद वाढल्यामुळे पुस्तक व्यवसायात आणि लेखन व्यवसायात धंदेवाईकपणा आला. तो येणे साहजिक होते.
वाचनापासून प्रामुख्याने दोन लाभ असतात. एक मनोरंजन आणि दुसरा ज्ञानप्राप्ती. प्रत्येकाच्या स्वभावानुसार तो ते प्राप्त करून घेत असतो. लहान वयात हौस व उत्सुकता यापोटी होणाऱ्या वाचनात मनोरंजन व ज्ञान दोन्ही एकरूपच असतात. मनोरंजन अथवा ज्ञान काहीही घ्या. त्याच्या मुळाशी आनंदप्राप्ती हेच उद्दिष्ट असते. काहींना ज्ञानविषयक वाङ्मयात रस असतो तर काहींना कलात्मक वाङ्मयात रस असतो. काहींना नैतिक बोधाची आवश्यकता वाटते तर काहींना आपल्या अतृप्त इच्छांची तृप्ती वाङ्मयाकडून करून घ्यावीशी वाटते. थोडक्यात व्यक्ती आपल्या गरजा भागविणारे वाङ्मय वाचण्यासाठी निवडीत असते आणि आनंदप्राप्ती करून घेत असते. अन्न जसे शरीरास तसे वाचन श्रवण वगैरे ज्ञानाची जी साधने ती मनास आवश्यक असतात. एकाने जसे शरीराचे पोषण होते तसे दुसऱ्याने मनाचे होते.
मनुष्य फार काळ काहीही न करता केवळ रिकामा राहू शकत नाही. मनास आनंद होईल अशा रीतीने वेळ घालविण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. ज्यावेळी वाचन रूपी करमणुकीचा मार्ग उपलब्ध नव्हता त्यावेळी मनुष्य श्रवण, संभाषण, खेळ, अनावश्यक चौकशा, चावडीवर जमून अनुपस्थित असलेल्या माणसांच्या निंदा किंवा भलत्या वेळेस निद्रा यात वेळ घालवीत. अजूनही वाचनाची अजिबात आवड नसलेली माणसे अशा प्रकारे वेळ घालवीत असतात. वाचनरूपी करमणुकीचे साधन उपलब्ध झाल्यानंतर मात्र ही परिस्थिती पालटली आणि वर उल्लेखिलेले पोरकट व निंद्य प्रकार कमी झाले.
वाचनाचा दुसरा लाभ ज्ञान. आजपर्यंतचे जेवढे मोठमोठे विद्वान, ज्ञानी माणसे होऊन गेली ती सर्व बहुतकरून जबर वाचन करणारी होती असे आढळेल. पूर्वी पाठांतराच्या पद्धतीने गुरू विद्यार्थ्यांना शिकवीत असे. वाचनतंत्र अस्तित्वात आल्यानंतर गुरू आणि शिष्य दोघांसमोरही ग्रंथ असतात. तरीही शिकवताना गुरूसमोर कोणतेही पुस्तक अथवा साधा कागदही नसलेला गुरू अजूनही श्रेष्ठ समजला जातो? जो पुस्तक हाती धरतो तो विद्वान गरू कसचा ? अशी काहीशी समजूत अजूनही आपल्यामध्ये आहे.
वाचनात श्रवणापेक्षा अनेक फायदे अधिक असतात. वाचन आपण आपल्या गतीने ठरवू शकतो. पाहिजे तेथे थांबून नंतरही टप्प्याटप्प्याने आपण त्याचे वाचन करू शकतो. जेथे अर्थ एका सहज वाचनौघात कळला नाही त्याचे पुनःपुन्हा वाचन करून तो कळून घेऊ शकतो. श्रवणामध्ये या सुविधा उपलब्ध नसतात. श्रवण करता करता झोप लागली तर तेवढ्या वेळात काय सांगितले गेले हे पुन्हा कळून घेण्याची सोय नसते. वाचन करता करता झोप लागली तर काही बिघडत नाही. ज्या ठिकाणी झोप लागली तेथून पुन्हा वाचन सुरू करता येते. काही काही ग्रंथांचे तर पुनर्वाचन आवश्यक असते. एका वाचनात ते समजणे कठीण असतात. यात प्रामुख्याने काव्यग्रंथांचा समावेश असतो. यांचा आस्वाद घुटक्याघुटक्यानेच घ्यावा लागतो. ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचे तर पाचवे किंवा सहावे वाचन हेच खरे वाचन असते. या पाचव्या-सहाव्या वाचनातच ज्ञानेश्वरी खरी समजायला लागते. पहिले दुसरे वाचन हे केवळ तिची तोंडओळख होण्यासाठी असते. काही ग्रंथ तर अनेक वेळा वाचून देखील पुन:पुन्हा वाचावेसे वाटतात. भिन्न भिन्न समयी वेगवेगळे आनंदानुभव ते देतात. प्रत्येक वाचनात नवे अर्थ उलगडतात. नवे संदर्भ तृप्ती देतात. याचे श्रेय अर्थातच अपूर्व कलानंद देणाऱ्या लेखकाच्या श्रेष्ठ प्रतिभाशक्तीकडे जाते. वाचन कोणी कोणत्या स्थानी करावे याबद्दल चर्चा करण्यात अर्थ नाही. कारण हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न असतो. परंतु वाचन आणि प्रवास यांचे मात्र फार पूर्वीपासूनचे नाते आहे. कुठलाही सुशिक्षित वाचनप्रिय माणूस हा प्रवासाला निघाला की, आपल्याबरोबर चार-दोन पुस्तके तरी घेतोच. काही पुस्तके ही बऱ्याच काळापासून वाचायची राहून गेल्यामुळे आणि प्रवासात इतर दुसरे काही करण्याजोगे नसल्यामुळे तो आठवणीने अशी पुस्तके आपल्याबरोबर घेतो. परंतु अनुभव असा येतो की, आठवून आठवून बरोबर घेतलेली पुस्तके प्रवासात वाचूनच होत नाहीत. सुरुवातीला थोडे इकडे तिकडे पाहण्यात, खिडकीतून बाहेर निसर्गसौंदर्य न्याहाळण्यात, प्रवाशांचे जागेसाठी आपापसात होणाऱ्या वादविवादांची मौज घेण्यात वेळ जात असल्यामुळे वाचनात काही केल्या चित्त एकाग्र होत नाही. वाचनासाठी आवश्यक असलेला मनाचा निवांतपणा आणि कुठल्याही व्यत्ययाविना आवश्यक असलेला सलग दीर्घकाळ न मिळाल्यामुळे जी पुस्तके वाचायची राहून गेली असतात ती तशीच राहतात. पण येथे हे सांगणे अवश्य आहे की, असा निवांत वेळ विमान प्रवासात मात्र निश्चित मिळतो.

माझा स्वतःचा अनुभव असा आहे की, एक वेळ एस. टी. अथवा रेल्वे यांच्या प्रवासात पुस्तक सोबत नसले तरी चालेल. पण विमान प्रवासात मात्र ते आवश्यक आहे. एकदा का विमान वर उडाले की खिडकीतून ढग पाहण्याशिवाय दुसरे कुठलेच काम नसते. अशा वेळी पुस्तक जर सोबत नसेल तर तो प्रवास विलक्षण बेचैनी वाढविणारा ठरतो. म्हणून विमान प्रवासात पुस्तक सोबत असणे अत्यंत आवश्यक ठरते.
वाचनासंबंधाने आणखीही बरेच काही गमतीदार अथवा गंभीर लिहिणे शक्य आहे. पण एका महत्त्वाच्या आणि आवश्यक मुद्यावर प्रकाश टाकणे गरजेचे आहे. वाचन हे ज्ञानप्राप्ती अथवा मनोरंजन कशाकरिताही होवो. पण त्यातून जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे अमोल कण ग्रहण झाले पाहिजे. वाचनाच्या पानांची संख्या जेवढी जास्त तेवढा मनुष्य विद्वान झाला, असे होत नाही. चारचौघांत सांगण्याकरिता भाराभर वाचन केले तर त्याला काही अर्थ राहात नाही; उलट व्यर्थ गर्व मात्र येतो. उलट जे वाचले ते थोडे जरी असले, तरी त्याचे मनन-चिंतन करून त्यातले ग्राह्य कोणते आणि त्याज्य कोणते याचा सारासारविवेक केला पाहिजे. असा विवेक जर जवळ नसेल तर पुस्तकातील विद्या पुस्तकातच राहिली असे समजावे. जे वाचले ते थोडे जरी असले तरी त्याचे मनन-चिंतन करून ते आत्मसात करणे महत्त्वाचे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्याचे आचरण करणे. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, पोथ्यांची पारायणे, पूजेचे मंत्र, अनेक प्रार्थना वगैरे आपण नित्यनेमाने म्हणत असतो, वाचत असतो; पण ते भाविकपणे. त्यातील किती असे असतात की, त्यांना त्यातील अर्थ कळतो? वाचनाने मनुष्य ज्ञानसमृद्ध होतो हे खरे. पण जीवनाचा अर्थ हा जीवन जगता जगता आलेल्या अनुभवानेच कळत जातो. हा अर्थ लक्षात येणे महत्त्वाचे असते. वाचनाचे महत्त्व, वाचनसंस्कृती याबद्दल आपल्याकडे फार बोलले जाते. अनेक ग्रंथांच्या वाचनाने लेखक आपले लिखाण, ग्रंथ सजवीत असतात. पण आश्चर्याची गोष्ट अशी की व्यास, वाल्मीकिंसारखे ग्रंथकार जे कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर अजूनही अढळ बसले आहेत आणि इतर ग्रंथकारांना विषय पुरवीत आहेत, त्यांच्या काळी वाचनसंस्कृती अजिबात नव्हती, ना वाचनाची सोय होती. तरी त्यांच्या ग्रंथांची सर अजूनही कोणास येत नाही. या महान ग्रंथकारांनी आपली ग्रंथनिर्मिती केली ती जीवनविषयक सखोल आणि विशाल चिंतनातून. यावरून हे स्पष्ट होते की, भाराभर वाचनाचा आणि प्रतिभापूरित विद्वतेचा काहीही संबंध नसतो. मोजकेच परंतु मननपूर्वक शोधकबुद्धीने जे वाचन होते, तेच खरे वाचन.
डॉ. राजेंद्र डोळके