नंदुरबार जिल्ह्यातील धडगावपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात या महालाचे अवशेष दृष्टीस पडतात. महालाचे बांधकाम सुमारे १५व्या शतकाच्या उत्तरार्धात झाले असण्याची शक्यता आहे. अक्काराणीच्या नावानेच या परिसराचे नाव अक्राणी महाल पडले आहे अशी या भागातील लोकांची मनोधारणा आहे, तथापि अक्काराणी ही खरोखरंच राणा प्रताप यांची बहीण होती का? अक्राणी महाल हे नाव या परिसराला तिच्याच नावावरून पडले का? हा संशोधनाचा विषय असल्याचेही स्थानिक लोक सांगतात. गॅझेट ऑफ द प्रेसिडेंसीमधील Volume-३मध्ये अक्राणीचा इतिहास दिलेला आहे.
भारतवर्ष आणि ब्रिटिश काळाच्या पूर्वीपासून थेट राजस्थानपर्यंत ५०० वर्षांच्या इतिहासाचा बुलंद साक्षीदार असलेला आणि बेफाम बेमुर्वत वारा, अफाट झोडपणारा पाऊस, बोडक्या अवस्थेत बसणारा उन्हाचा तडाखा, सातत्याने अद्यापही होत असलेली उपेक्षा यांच्याशी संघर्ष घेत समुद्र सपाटीपासून सुमारे १४६१ मीटर उंचीवर असलेल्या तोरणमाळ हिल स्टेशनलगतचा ‘अक्राणी महल’ (ता. धडगांव, जि. नंदुरबार) आणि त्याच्या अंगावर महाराणा प्रताप यांच्या वंशातील ‘अक्काराणी’ नामक स्वामीनिष्ठ राजपूत सुभेदारीणीच्या वास्तव्य खुणांची अद्यापही अस्फुट बोलकी करणारी सुबक, आकर्षक आणि नक्षीदार ‘देवळी’ (राणी काजल मंदिर) पाहून इतिहासाच्या संशोधकांना सातपुड्याच्या पडसावलीत निजलेल्या या राजवर्खी खुणांना ‘अक्राणी महल’ म्हणून अस्तित्व द्यावेसे वाटले असेल काय?
सातपुड्याच्या अजस्त्र पर्वतरांगांनी भक्कम मजबुती प्रदान केलेल्या आणि महाराणा प्रतापच्या राजवंशाशी असलेली नाळ सांगणाऱ्या पुण्य-पावन असलेल्या अक्राणी महलचा इतिहास हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. हळदी घाटाच्या युद्धानंतर मुस्लिमांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी महाराणा प्रतापांची बहीण ‘अक्काराणी’सह काही स्वामीनिष्ठ राजपुतांनी आपला वंश, धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी सातपुड्यातील या भागाचा आश्रय घेतल्याचे प्रसिद्ध इतिहास संशोधक एल. के. भारतीया यांनी त्यांच्या शोधनिबंधात सातपुड्याच्या या संस्थानबद्दल लिहिले आहे. ‘महाराष्ट्र ज्ञानकोश खंड -६ मध्ये १७व्या शतकात राणा गुमानसिंग याने अक्राणीचा किल्ला बांधल्याचा उल्लेख आहे. हे राणा गुमानसिंग काठीचे संस्थानिक होते, तर आर. ई. एन्थोव्हेन यांच्या मतानुसार उदयपूरच्या राणाने तेथून काही राजपुतांना हाकलून लावले. त्या राजपुतांनी पावागडचा आश्रय घेतला. कालांतराने तेथून ते जंगलाच्या आश्रयाने अक्राणी परिसरात आले व तेथेच रहिवास करू लागल्याचे नमूद केले आहे.
धडगावपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात या महालाचे अवशेष दृष्टीस पडतात. महालाचे बांधकाम सुमारे १५व्या शतकाच्या उत्तरार्धात झाले असण्याची शक्यता आहे. अक्काराणीच्या नावानेच या परिसराचे नाव अक्राणी महाल पडले आहे अशी या भागातील लोकांची मनोधारणा आहे, तथापि अक्काराणी ही खरोखरच राणा प्रताप यांची बहीण होती का? अक्राणी महाल हे नाव या परिसराला तिच्याच नावावरून पडले का? हा संशोधनाचा विषय असल्याचेही येथील स्थानिक लोक सांगतात. गॅझेट ऑफ द प्रेसिडेंसीमधील Volume -३ मध्ये अक्राणीचा इतिहास दिला आहे.

भग्नावस्थेत संपूर्ण विटांमध्ये बांधलेल्या या महलाचा बुरूज, प्रवेशद्वार बऱ्यापैकी सुस्थितीत असल्यासारखे आहेत. महालाच्या दक्षिण, पूर्व व पश्चिम दिशेच्या भिंती उभ्या आहेत. कुठे कुठे पडझड झाली असली तरीही हे अवशेष तेथील राजेशाही थाट, त्यांचा डामडौल याची साक्ष देतात. या महालात एक भुयार आहे. ते कोठे निघते याची माहिती अद्यापही उपलब्ध नाही. जुन्या काळातील दगडात घडविलेल्या फुटलेल्या वस्तू आज तेथे दिसतात. डॉ. नरसिंह परदेशी यांना या महालाच्या अवशेषांमध्ये उदयपूर, मेवाड संस्थानच्या मुद्रा (नाणी), राजस्थानी बनावटीच्या वास्तूचे अवशेष आढळले आहेत, तर तेथील आदिवासी बांधवांना चांदीची, तांब्याची नाणी सापडली आहेत.
खान्देशात महंमदी सत्ता असताना त्यात धडगावचाही समावेश होता. त्यावेळी प्रत्येक भाग स्थानिक मुख्य माणसांच्या ताब्यात असायचा. तेच तेथील कारभार बघत असत, परंतु इ.स. १७०० मध्ये महंमदी सत्तेच्या -हासानंतर या परगण्यास कुणी वारस राहिला नाही. त्यानंतर नर्मदेपलीकडील धुश्वयी येथील छावजी राणा यांनी या संस्थानचा ताबा घेतला. आपण मूळचे धार येथील ‘पवार’ असल्याचे राणा यज्ञदेवसिंग सांगतात. धार येथील पवार घराण्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. तेथील आनंदराव पवार यांनी दौलतराव शिंदे यांना अप्रत्यक्ष मदत केल्याचा इतिहास आहे.
छावजी राणा यांच्या मृत्यूनंतर अक्राणी हा सुभा त्यांचा मुलगा राणा गुमानसिंग यांच्याकडे वंशपरंपरेने आला. त्यांनीच हा महालवजा किल्ला बांधला व परिसरात शांतता प्रस्थापित केली. त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र हिम्मतसिंग यांनी अक्राणी येथे २८ वर्षे राज्य केले. यज्ञदेवसिंग यांच्या कागदपत्रांवरून राणा व पेशव्यांचे जमत नसावे असेही दिसून येते. कारण भाऊसिंग राणांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा भिकाजीभाऊ राणा यांच्याकडे रोषमाळ व अक्राणी महालची सत्ता आली. त्यावेळी भिकाजीभाऊ राणा आणि जुगार नाईक यांच्यात चिखली ( कानडी ) ता. शहादा येथे झालेल्या चकमकीत जुगार नाईक ठार झाले. त्यांचा तरुण मुलगा दिव्या नाईक सुडाने पेटून उठला. भिकाजी राणा यांच्याकडे तूर्तास अत्यंत कमी शिबंदी आणि घोडदळ आहे ही माहिती प्राप्त होताच त्याने रोषमाळच्या पायथ्याशी अचानक धडक दिली आणि पाच वर्षे राज्य करणाऱ्या भिकाजी राणाचा त्याने वध केला. ही संधी साधून पेशव्यांच्या एका तुकडीने अक्राणी व रोषमाळ ताब्यात घेतले. त्याचवेळी रामपूर आणि धडगावही पेशव्यांनी ताब्यात घेतले. तेथे प्रचंड लूट झाली. सन १८०३ मध्ये खान्देशात भीषण दुष्काळ पडला होता. त्या काळात सुलतानपूर हे अत्यंत भरभराटीचे जिल्ह्याचे ठिकाण होते.
त्यावेळी अक्राणीचा खरा वारस आनंदसिंग आठ वर्षांचाच होता. भिकाजीभाऊंचा खून झाल्यानंतर तो कसाबसा किल्यातून पळाला. त्यानंतर पेशव्यांनी आनंदसिंग यांचे काका दलेलसिंग आणि आई आनंदकुंवरबाई यांना बंदी केले. छोटा आनंद जीव वाचवून मथवारला गेला. तेथे तीन वर्षे व त्यानंतर रामपुरा येथे तीन वर्षे अशी सहा वर्षे तो मदत शोधत राहिला. त्याला कुणाकडूनही सहाय्य मिळाले नाही. शेवटी त्याने द्याचे मेजर जार्डिन यांची भेट घेतली. मेजर जार्डिन यांनी कोपर्ली (नंदुरबार) येथे येऊन पेशव्यांच्या ताब्यातून दलेलसिंग राणा आणि आनंदकुंवरबाईस १८१८ मध्ये मुक्त केले. अक्राणीच्या किल्ल्यावर ताबा मिळविण्यासाठी मेजर जार्डिन यांनी बडोद्याहून दोनशे शिबंदी रक्षण बंदोबस्तासाठी दिली. नंदुरबारहून १५० अरब सैन्य दिले. हे सारे सैन्य घेऊन राणा आनंदसिंगने अक्राणीवर पुनश्च ताबा मिळवला. ताबा प्रस्थापि झाल्यानंतर सोबत आलेले सैन्य पगार मागू लागले, परंतु आनंदसिंग राणांजवळ पैसे नव्हते. शिपाई ऐकेनात तेव्हा सारी शिबंदी पुन्हा मेजर जार्डिनकडे आली. या साऱ्या सैन्याचा त्या काळचा पगार १८ हजार रुपये इतका होता. (ब्रिटिशांच्या नोंदीनुसार अक्राणी महालचा वार्षिक महसूल १८ हजार रुपयांच्या पुढे होता.) शेवटी हे प्रकरण ब्रिटिशांचे राजदूत कॅप्टन ब्रीग्ज यांच्याकडे गेले. स्वतः ब्रज यांनी १८ हजार रुपये देणे देऊन धडगाव अक्राणी ब्रिटिश सत्तेच्या अमलात आणले. राणा आनंदसिंग यांना प्रतापपूर आणि गोपाळपूर (ता. तळोदा) ही गावे इनामात दिली आणि राजा ही पदवी आबाधित राहू दिली. १८२० पासून राणा कुटुंब प्रतापपूर व गोपाळपूरला स्थायिक झाले. आनंदसिंग यांच्यानंतर जसवंतसिंग, जयदेवसिंग, कालीकाकुमार आणि आता यज्ञदेवसिंग अशी पिढी आहे.
अक्राणी महालात तेथील आदिवासी बांधवांना सापडलेल्या एका नाण्यावर ‘शाह’ तर दुसऱ्यावर ‘कुतबद्दिन’ असा उल्लेख दिसून येतो. त्यावरील सन, वर्ष कापले गेले आहे, तर डॉ. नरसिंग परदेशी यांना राजस्थानातील चितोडगडच्याही अगोदरच्या आहड संस्कृतीतील एक खापराचे नाणे व दुसरे १७व्या शतकातील मेवाड संस्थानचे तांब्याचे नाणे सापडले आहे. या महलापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर शिन्दाई टेकडी आहे. या टेकडीवरून शहादा, तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा परिसराचे लोभस दर्शन होते. ही अतिउंच टेकडी म्हणजे त्या काळातील टेहळणीसाठीचा बुरुज असावा. तेथे खापराची एक चौकी असून त्यातच ‘शिन्दाई देवी’ची स्थापना केली गेली आहे.
महलावरून परतताना आमची पावलं देवी काजलच्या दर्शनासाठी वळली. मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या झऱ्याजवळ पावलं जड झाली. झऱ्यातून ओघळणारे पाणी मला अक्राणी महालाच्या रक्तबिलोर गौरस स्मृतीत शोकमग्न राणीच्या ओल्या पापण्यांसारखे भासत होते. अक्राणीच्या इतिहासाला किती, कोणत्या, कुठल्या घराण्यांची परंपरा आहे हा संशोधनाचा विषय आहे, मात्र अक्राणीचं हे अरण्यरुदन गेली ५०० वर्षे या शतकातून त्या शतकात ओघळत आहे. आम्ही मात्र करू नये ते करीत आहोत. अर्धसत्य सांगणाऱ्या इतिहासाचे ‘रुदाली’ झालो आहोत. अक्राणीच्या (अक्काराणी) अंतर्यामातील हे रुदन कधी आणि कोणाच्या कानी पडणार किंवा कधीतरी पडेल काय? हे मात्र काळच ठरवणार आहे. तोपर्यंत त्याने कोसळू नये एवढीच एक अपेक्षा.
रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी