भाषा ही केवळ भाषा नसते. तर, हजारो वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या भाषांमध्ये मूलभूत ज्ञानाचा एक महत्वपूर्ण संग्रह, ऐवज असतो. थेट अनुभवातून मिळालेले हे ज्ञान अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करण्यास सक्षम ठरत असते; परंतु या ज्ञानाची जणू आपल्याला गरजच नाही, अशा तऱ्हेने आपण आपल्या भाषांवर होणारे आघात निमूटपणे सहन करतो आणि ‘ज्ञानभाषा’ म्हणून परकीय भाषांच्या मागे लागतो. हेच आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या काळात चालू आहे.
वास्तविक त्या ‘ज्ञानभाषा’ नसून ‘रोजगारभाषा’ असतात आणि आपल्याला त्याचीच भुरळ पडते. खंत अशी की, पारंपरिक बोलीभाषांचा -हास होण्यात भारत पहिल्या स्थानावर आहे, हे वास्तव जेव्हा युनेस्कोच्या अहवालाद्वारे उघड झाले तेव्हा सरकार आणि समाज खडबडून जागा होईल असे वाटले होते; परंतु तसे घडले नाही. चमत्कारिक बाब अशी की, देश पारतंत्र्यात असताना नव्हे, तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बोलीभाषांवर मोठे संकट आले. भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्या संशोधनानुसार, आपण सुमारे तीनशे बोलीभाषा पूर्णपणे विसरून गेलो आहोत. तर, १९० बोलीभाषा अखेरचा श्वास घेत आहेत. सर्वांत दुःखद गोष्ट अशी की, बोलीभाषा लुप्त होण्याचे संकट आदिवासी भागांमध्ये सर्वाधिक आहे. कारण हिंसाचार, रोजगारासाठी धावाधाव आणि विकासाचे प्रकल्प यामुळे या विभागांतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत काही बोलीभाषांचा वापर हळूहळू कमी झाला आणि नंतर त्या लुप्तच झाल्या. दोष द्यायचा कोणाला ? पोट भरण्याच्या मागे लागलेल्या समाजाला की, धोरणकर्त्यांना ?