पाणी वापराचा ताळेबंद
एकविसाव्या शतकाच्या मध्यावधीत अथवा उत्तरार्धात पाणीप्रश्नावरून संघर्ष उफाळून येतील, अशी भाकिते अनेक जाणकारांकडून केली जाताहेत. पाणी प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असूनही पाणी वापराबाबत नागरिकांमध्ये सजगता दिसून येत नाही. आपण प्रत्यक्षरीत्या जेवढ्या पाण्याचा वापर करतो, त्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात आपण पाण्याचा अप्रत्यक्ष वापर करीत असतो. अनेक वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी हजारो-लाखो लिटर पाणी खर्ची पडलेले असते. त्याचा आपण कधीच हिशेब करीत नाही. अनेक देशांनी आगामी पाणी टंचाईचं सावट ओळखून जास्त पाण्याचा वापर होणाऱ्या वस्तू आणि अन्नधान्यं अन्य देशांमधून आयात करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात काय परिस्थिती आहे? एक अस्वस्थ करणारा आढावा…
उन्हाळा, पाणीटंचाई, चर्चा, सूचना… आणि मग पावसाळा ! कोणतेही नियोजन नाही. पीक पद्धतींमध्ये बदल नाहीत. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाय नाहीत. पाणी अडवून ते मुरवण्यासाठी होणारे तुटपुंजे प्रयत्न… पावसाळा संपतो आणि पुन्हा पाण्याची टंचाई वाढू लागते. निसर्गचक्र बदललं तरी बेजबाबदारपणाचं हे चक्र मात्र सुरूच आहे, परंतु लोकसंख्येबरोबर आणि पाणी वापरातील बदलांमुळे आपण केवढ्या मोठ्या संकटाकडे निघालो आहोत, याचा अंदाज जरी घेतला तरी भीतीनं कंप सुटेल. गेल्या ७५ वर्षांत आपण पाण्याच्या दृष्टीनं किती ‘गरीब’ झालो आहोत, हे पाहू या. १९५१ मध्ये आपल्या देशात प्रतिव्यक्ती १४ हजार १८० लिटर पाणी उपलब्ध होतं. आजमितीस प्रतिव्यक्ती केवळ ५ हजार १२० लिटर पाणी उपलब्ध आहे. २०१५ पर्यंत माणशी पाण्याची उपलब्धता आणखी कमी होऊन केवळ तीन हजार लिटर पाणीच एका व्यक्तीला मिळू शकेल. सध्या आपण पाण्याचे योग्य वाटप करू शकत नाही. असमतोल पाणी वाटपामुळे अनेक ठिकाणी घसे कोरडे आहेत, तर अनेक ठिकाणी पाण्याची बेसुमार उधळपट्टी चालली आहे. अशा तऱ्हेने २०२५ पर्यंत प्रवास केल्यानंतर आपलं काय होईल ? हा प्रश्न प्रत्येकाने गंभीरपणे स्वतःला विचारायला हवा. जगभरात कार्बनचा वापर किती प्रमाणात होतो, याची आकडेवारी ‘कार्बन फुटप्रिंट’वरून मिळू शकते. त्याच धर्तीवर मानवी हस्तक्षेपामुळे कुठे पाण्याचा किती वापर होतो, हे जाणून घेण्यासाठी आजकाल एका खास प्रणालीचा वापर केला जातो. या प्रणालीचे नाव आहे ‘वॉटर फुटप्रिंट’. आपण कोणत्या कारणास्तव किती पाणी वापरतो, याचे उत्तर ही प्रणाली आपल्याला देते.
सर्वात आधी आपल्याला दखल घेतली पाहिजे ती बाटलीबंद पाण्याची. गेल्या वीस वर्षांत भारतात बाटलीबंद पाण्याच्या व्यापारात मोठी वाढ झाली आहे. हा व्यवसाय करणाऱ्यांची प्रचंड भरभराट झाली आहे. ही भरभराट थक्क करणारी आहे. कारण या व्यवसायात नफ्याचं प्रमाण गुंतवणुकीच्या अनेक पट आहे. एक लिटर बाटलीबंद पाणी जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा ते कोणत्या दराने घेतो आणि त्यासाठी किती लिटर पाणी वाया घालवतो, हे माहीत आहे ? यासंदर्भातल्या आकडेवारीवर कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु हे एक अत्यंत कडवे सत्य आहे. हे सत्यच आपल्याला दिवसेंदिवस पाण्याच्या भीषण टंचाईकडे घेऊन चालले आहे. हे सत्य म्हणजे एक लिटर बाटलीबंद पाणी तयार करण्यासाठी सुमारे पाच लिटर पाणी खर्ची पडते. एका आकडेवारीनुसार जगभरात २००४ मध्ये १५४ अब्ज लिटर बाटलीबंद पाणी तयार करण्यासाठी ७७० अब्ज लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. याच प्रक्रियेसाठी भारतात २५.५ अब्ज लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली. बाटलीबंद पाणी आणि शीतपेये बनवणाऱ्या कंपन्यांविरुद्ध वाराणसीपासून केरळपर्यंत ग्रामस्थ आंदोलने करीत आहेत, ती अकारण नाहीत. कॅलिफोर्निया येथील पॅसिफिक इन्स्टिट्यूटचे म्हणणे असे आहे की, २००४ मध्ये अमेरिकेत २६ अब्ज लिटर बाटलीबंद पाणी विकण्यासाठी ज्या प्लॅस्टिकच्या बाटल्या तयार करण्यात आल्या, त्यासाठी दोन कोटी बॅरल तेलाचा वापर झाला. प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या बाटल्याही पाणी प्रदूषित करीत आहेत आणि जागतिक तापमानवाढीचे एक मोठे कारण बनल्या आहेत. पाण्याच्या उधळपट्टीचा शोध आपल्याला शेतशिवारातही घ्यावा लागेल. यासंदर्भातली आकडेवारी जितकी रोचक, तितकीच भयावह आहे. शेती हे असे क्षेत्र आहे, जिथे एकूण उपलब्ध पाण्याच्या ९० टक्के हिस्सा वापरला जातो. घरगुती वापरासाठी पाण्याचा केवळ पाच टक्के भाग खर्च होतो. हिंदुस्थानात एक किलो गव्हाचं पीक घेण्यासाठी १७०० लिटर पाणी खर्च केले जाते. म्हणजेच आपल्या घरात जर आपण दिवसाकाठी एक किलो गव्हाचे पदार्थ सेवन करीत असू तर आपण १७०० लिटर पाणी अप्रत्यक्षरीत्या वापरतो. एवढेच नव्हे, तर आपण जी जीन्स पॅन्ट वापरतो ती बनविण्यासाठीही हजारो लिटर पाण्याची गरज असते. अशाच प्रकारे एक कप कॉफीबरोबर आपण १४० लिटर पाणीही अप्रत्यक्षपणे पितो. याला आपण पाण्याचा आभासी वापर असं म्हणू शकतो; परंतु हा वापर प्रत्यक्षात झालेला असतो हे लक्षात घ्यायला हवं. आणखी एका रोचक माहितीकडे लक्ष वेधावेसे वाटते. मिस्र हा देश गव्हाची आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. चीनसुद्धा अन्नधान्यांची मोठ्या प्रमाणावर आयात करतो. वास्तविक, चिनी वस्तू संपूर्ण जगभर विकल्या जातात. मग हे देश अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्णतेचा विचार का करीत नाहीत, असा प्रश्न नक्कीच पडू शकेल, परंतु त्याचे उत्तर असे आहे की, या देशांनी अधिक पाण्याचा वापर होणारी पिके घेणे बंद केले आहे. या देशांमध्ये पाणीटंचाई एवढी भीषण झालेली नसतानासुद्धा त्यांनी हा निर्णय घेतला आहे. नील, व्हांगहो यांसारख्या मोठ्या नद्या या देशांमधून वाहतात. अर्थातच, हा निर्णय केवळ आणि केवळ पाणी वाचविण्यासाठीच घेण्यात आला आहे. काही देश जर पाण्याची बचत करण्यासाठी काही पिके घेणेच बंद करीत असतील तर आपल्याला पाणीटंचाईच्या प्रश्नाबाबत जगभरात किती सखोल विचार सुरू आहे याचा अंदाज येऊ शकतो.
आपल्या देशात यासंदर्भात काय चालले आहे ? काही उदाहरणांवरूनच आपल्याला याचा अंदाज येऊ शकेल. भारतानं सुमारे ३० लाखांहून अधिक टन बासमती तांदळाची निर्यात केली. हा तांदूळ पिकविण्यासाठी भारतात १० दशअब्ज लिटर पाणी खर्च झाले. दुसऱ्या शब्दांत आपण असे म्हणू शकतो की, ३७ लाख टन बासमती तांदळाबरोबरच हिंदुस्थानने १० दशअब्ज लिटर पाणीही अन्य देशांमध्ये पाठवले. किंमत मात्र केवळ तांदळाचीच मिळाली; पाण्याची नाही. उलटपक्षी आपल्याकडून बासमती तांदूळ घेणाऱ्या देशांना ३७ लाख टन तांदळासोबत १० दशअब्ज लिटर पाणी फुकट मिळालं किंवा त्या देशांमध्ये पाण्याची एवढ्या मोठ्या प्रमाणावर बचत झाली. हिंदुस्थान अनेक वर्षांपासून तांदूळ निर्यात करून त्यासोबत पाण्याचीही अशा प्रकारे अप्रत्यक्ष निर्यात करतो आहे.
या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण ‘वॉटर फुटप्रिंट’चा विचार करतो तेव्हा पहिला प्रश्न येतो की, अखेर ‘वॉटर फुटप्रिंट’ म्हणजे नेमकं काय ? आपल्या दररोजच्या अनेक उत्पादनांसाठी पाण्याचा वापर झालेला असतो. हा पाण्याचा अप्रत्यक्ष वापर होय. उदाहरणार्थ, एक कप कॉफीसाठी पाण्याचा आभासी वापर १४० लिटरपर्यंत होतो. आपली ‘वॉटर फुटप्रिंट’ केवळ आपण प्रत्यक्षपणे वापरलेलं पाणीच दर्शवीत नाही, तर आपण अप्रत्यक्षपणे वापर केलेल्या पाण्याचं प्रमाणही दर्शवितो. प्रत्यक्षपणे पाणी आपण पिण्यासाठी, साफसफाईसाठी, कपडे धुण्यासाठी वापरतो, परंतु दररोजच्या जीवनात आपण अप्रत्यक्षपणे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत असतो. या सर्व पाण्याची गोळाबेरीज म्हणजे आपली ‘वॉटर फुटप्रिंट’ होय. देशातील लोक जितक्या वस्तू आणि सेवांचा वापर करतात, त्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याची मोजदाद म्हणजे ‘वॉटर फुटप्रिंट’. ही ‘वॉटर फुटप्रिट’ आपल्यासमोर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित करते. यातील काही प्रश्न पुढीलप्रमाणे : एखाद्या कंपनीत वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा स्रोत कोणता आहे ? त्या स्रोताचं संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना केली गेली आहे ? ‘वॉटर फुटप्रिंट’ कमी करण्यासाठी आपण काही उपाय योजू शकतो का ? ‘वॉटर फुटप्रिंट’ चे प्रामुख्यानं तीन घटक आहेत. हिरवा, निळा आणि करडा. हे तीन रंग एकमेकांत विलीन होऊन पाण्याच्या वापराचं नेमकं चित्र आपल्याला दाखवितात. वापरण्यात आलेलं पाणी पावसाचं आहे, भूपृष्ठावरचं आहे की भूगर्भातलं आहे, याचं चित्र हे तीन रंग दर्शवितात. ‘वॉटर फुटप्रिंट’मुळं एखादी कंपनी, एखादी प्रक्रिया किंवा एखाद्या क्षेत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात वापरण्यात आलेल्या पाण्याचं प्रमाण आणि प्रदूषणाची स्थिती डोळ्यांसमोर येऊ शकते.
हिरवी ‘वॉटर फुटप्रिंट’ म्हणजे भूगर्भातलं पाणी होय. याचा वापर कृषी, हॉर्टिकल्चर आणि जंगलांमध्ये होतो. निळी ‘वॉटर फुटप्रिंट’ म्हणजे भूपृष्ठावरचं पाणी होय. या पाण्याचा वापर कृषी, उद्योग आणि घरगुती वापरासाठी होतो. करडी ‘वॉटर फुटप्रिंट’ म्हणजे ताजं पाणी (फ्रेश वॉटर) होय. जलप्रदूषण नष्ट करून पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी या पाण्याची आवश्यकता असते. ‘वॉटर फुटप्रिंट’चा संबंध ताज्या पाण्यातील मानवी हस्तक्षेप आणि मानवी वापराशी आहे. ‘फुटप्रिंट’च्या माध्यमातून पाणीटंचाई आणि प्रदूषणासारखे मुद्दे समजून घेता येतात. अनेक देशांनी आपली ‘वॉटर फुटप्रिंट’ कमी करण्यासाठी अधिक पाण्याचा वापर होणाऱ्या वस्तू अन्य देशांमधून मागविण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आपली ‘वॉटर फुटप्रिंट’ काय सांगते आणि ती कमी करता येईल का, याचा गांभीर्यानं विचार करण्याची हीच वेळ नव्हे का ?
रंगनाथ कोकणे (लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.)