ग्रामीण भाग जंगल व्याप्त असल्याने आरोग्यवर्धक अशी निरनिराळ्या प्रकारची औषधी वनस्पती, वृक्ष, वेली, फळे, कंदमुळे सहज उपलब्ध होतात, मात्र जंगलतोडीमुळे हा रानमेवा कमी होत आहे. थंडीच्या हंगामात रानमाळात मिळणारी आंबट, तुरट, गोड अशी स्वादिष्ट गावरान बोरांची चव निराळीच असते, मात्र ही गावरान बोरे अलीकडच्या काळात दृष्टीआड होऊन संकरित व कलमी मोठ्या आकारांच्या बोरांनी सर्वत्र बोलबाला आहे. गावरान बोरांची चव दुर्मिळ झाली आहे.
ग्रामीण भागासह शहरातील शेताच्या बांधावर अथवा कुरणावर मोठ्या प्रमाणावर बोरीची झाडे पुर्वी असायची. मात्र अलीकडे बांध
लहान होत असल्याने अशी झाडे कमी होऊ लागल्याने ही बोरे मिळणे कठीण झाले आहे. पूर्वीच्या काळी जंगलात असलेला रानमेवा कमी झाला असून त्यात बोरेही कमी झाली आहेत. गावरान बोरांची मजा या संकरित बोरांत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. पूर्वीच्या काळी गावासह शहरी भागांतही फक्त गावरान लहान आकाराची बोरे सर्वत्र मिळत असत. आता वेगवेगळ्या प्रकारच्या कलमी बोरांच्या जाती विकसित करण्यात आल्या, पण यास गावरान बोरांची चवच नाही.
वृक्षतोडीचा परिणाम : पूर्वी बांधावर, शेतांत बोर, आंबा, बाभूळ, चिंच, सीताफळ आदी झाडे मोठ्या प्रमाणात होती. या सर्व झाडांचे शेतकऱ्यांकडून योग्य संगोपन केले जात असे; परंतु अलीकडे तुरळक ठिकाणी गावरान बोरांची झाडे दृष्टीस पडत आहेत. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली गेली. यात गावरान बोरांचीही झाडे तोडून ती नष्ट करण्यात आली. त्यामुळे गावरान बोरांची चव दुर्मिळ बनत चालली असल्याचे चित्र आहे.
टपोऱ्या बोरांची सफरचंदाला टक्कर : रंगाने हिरवट, पिवळसर, पण चवीला गोड असणाऱ्या अॅपल बोरांची बाजारात आवक सुरू आहे. सफरचंदासारखा आकार असल्याने लक्ष वेधत आहे. बोर म्हटले की डोळ्यांसमोर काहीशी हिरवट आणि पिकल्यावर लाल भुरकट रंगाची लहान आंबट फळे येतात. मात्र, या व्यतिरिक्तही बाजारात सफरचंदाच्या आकाराची बोरे येत आहेत. बोरांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व ‘अ’ जीवनसत्त्व आणि पोटॅशियम असते. हे घटक रोग प्रतिकारक क्षमतेला बळकट बनवतात. बोरं खाल्ल्याने त्वचा दिर्घकाळ तरुण राहते. यामध्ये अँटी-एजिंग तत्त्व असतात आणि यामुळे त्वचा चमकदार, चिरतरुण राखण्यास मदत होते. बध्दकोष्टची समस्या असेल तर बोरं खाणे फायद्याचे असते. बोरं पचनक्रिया चांगली बनवण्यात मदत करते बोरांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फोरस असते. हे दात आणि हिरड्यांना मजबूत बनवण्याचे काम करते. कर्करोगाला प्रतिकार करणा-या पेशी वाढवण्याचे काम बोरं करतात. एक चमचा बोराचा रस आणि काळी मिरी यांचे सेवन केल्यास सर्दीपासून संरक्षण होते. अतिसार, थकवा तसेच भूक न लागणे आदी विकारांवरही वोर अतिशय गुणकारी आहेत. अस्थमा आणि मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी बोरं आवर्जून खावी. रक्तातील साखर नियंत्रित राखण्याचे काम बोरं करतात.
संक्रांतीला विशेष महत्व : गावरान बोरांचे संक्रांतीला विशेष महत्व आहे. आंबट, गोड, तुरट चवीचे बोर पाहून तोंडाला पाणी सुटल्यावाचून राहात नाही. सुहासिनी महिला वाण वाटताना गावरान बोरांचा वापर करतात. मोठ्या प्रमाणात ही बोरं उपलब्ध होत असल्याने ही बोरं सुकविली जातात. काही ठिकाणावरून त्यांची दक्षिणेकडील भागात निर्यातही होते. बोरकूट बोरड्या तसेच उकडलेली वोरं यासाठी या वोरांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. दिवसेंदिवस झाड कमी होत असल्याने गावरान बोरांचे उत्पादनही घटत चालले आहे.