छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणजे श्रीतुळजाभवानी आणि महाराजांची आई भवानीवर नितांत भक्ती होती. भोसलेकुळाचे वर्णन करणारा ग्रंथ ‘बाबाजीवंशवर्णनम्’ यात उल्लेख आहे तो असा-
श्रीमद्भोसलवंशोयं नेतरस्तु ममैव सः ।
सुर्यनारायणस्यायं श्रीमान वंशो महाद्युति ।
श्रीमान शंभूमहादेवः सर्वानंदप्रदायकः ।
भवानी चंडमुंडादिमहिषासुरमर्दिनी ।
कुलदैवतमेतस्य वंशस्य समुदीरितम् ।
म्हणजे भगवान विष्णू कथन करत आहेत की, ‘हा पवित्र भोसले वंश माझाच आहे. हा श्री सूर्यनारायणाचा वंश आहे. श्रीशंभूमहादेव आणि चंडमुंडमहिषासुरादीचा संहार करणारी श्रीभवानी ही या वंशाची कुलदैवते आहेत. ‘
शिवकाळात तुळजापूर स्वराज्यात नव्हते. एकतर स्वराज्याच्या मुख्य मावळी मुलखापासून तुळजापूर बरेच लांब पडे आणि राजकारणाच्या धामधुमीत वरचेवर तुळजापूरला जाणे महाराजांना अवघड पडे. असे असले तरी आपल्या आराध्य कुलदेवतेस महाराजांनी वेळोवेळी वस्त्रालंकार आणि निरनिराळी इनामे अर्पण केलेली आहेत. पण आजचा लेख तुळजापुराबद्दल नाही.
तुळजापूरला वेळोवेळी जाणे अवघड पडत असल्याने महाराजांनी प्रतापगडी तुळजाभवानीचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. देवीची मूर्ती घडवण्यासाठी योग्य अशी शिळा मिळवणे गरजेचे होते, त्यासाठी महाराजांनी मंबाजी नाईक बिन गोमाजी नाईक पानसरे यांना आज्ञा केली की, हिमालयाचे प्रदेशी नेपाळच्या सल्तनतीत त्रिशूळ गंडकीतून उत्तम शिळा शोध करून आणणे. सर्व साहित्य आणि अनुकूलता करून देऊन महाराजांनी मंबाजी नाईक यांना नेपाळला पाठवले (ऑक्टोबर १६६० ).
त्रिशूली गंडकी म्हणजे गंडकी नदीची उपनदी. ही नदी तिबेटमध्ये किरोंग येथे उगम पावते आणि पुढे दक्षिणेस जाऊन नेपाळमधील देवघाट येथे ती नारायणी नदीला मिळते. हीच नारायणी नदी पुढे भारतात प्रवेश करून गंडकी म्हणून ओळखली जाते. राजगडापासून देवघाट सुमारे दोन हजार किलोमीटर दूर आहे !
एवढा प्रचंड प्रवास करून मंबाजी नाईक नेपाळमध्ये गेले. त्याकाळी नेपाळमध्ये कृष्णशाह नावाचा राजा राज्य करीत होता. नाईक या राजाला भेटले असतील का ?
त्यांनी ती शिळा कशी शोधली असेल ? याची आज कल्पनाही करणे कठीण आहे. नेपाळमधून काली गंडकी आणि त्रिशूली गंडकी यांच्या संगमातून मंबाजी नाईकांनी उत्तम शिळा मिळवली आणि आई भवानीची मूर्ती नेपाळमध्येच घडवून घेतली. तिथून ती मुघली अमलातून सांभाळत सांभाळत त्यांनी राजगडी आणली. श्रीभवानी खड्ग, धनुष्य, बाण, ढाल, शंख, त्रिशूळ हाती धारण करून, मत्त महिषासुराचे वक्षी उजवे हाते त्रिशूळप्रहार करून, डावे हाते त्याची शेंडी धरून, सव्य पाय सिंहाचे पाठीवरी, मस्तकी मुकुटावरी शिवलिंग विराजमान झाले आहे, अंबा बहुत बहुत प्रसन्न मुद्रा करोन सुहास्यवदने दर्शन देते आहे ऐशी श्रीची मूर्ती श्रमेकरोन सिद्ध केली.
जुलै १६६१ मध्ये महाराजांनी सुमुहूर्तावर विधिपूर्वक श्रींची प्रतापगडी स्थापना केली. बहुत दानधर्म केला. नित्यपूजा, छबिना, होमहवन, नैवेद्य, नंदादीप यासाठी इनामे दिली. मंबाजी नाईक यांची आपले प्रतिनिधी म्हणून श्रीसन्निध नेमणूक केली.
आपल्या कुलदेवतेची उत्तम मूर्ती घडवावी, त्यासाठी उत्तम शिळा मिळवावी म्हणून महाराजांनी त्याकाळी दोन हजार किलोमीटर लांबून नेपाळमधून शिळा शोधून मूर्ती घडवून आणली. त्यासाठी त्या सर्वस्वी अपरिचित मुलखात मंबाजी नाईक पानसरे यांना पाठवले. महाराजांच्या आई भवानीवरील भक्तीचे हे अतुलनीय उदाहरण आहे. संदर्भ : राजा शिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे, सभासद बखर – कृष्णाजी अनंत
अश्विन पुंडलिक
