जेव्हा एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज भासते तेव्हा त्याला त्याच्याच रक्तगटाचे रक्त दिले जाते; पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, चुकून एखाद्याला त्याच्या रक्तगटाऐवजी दुसऱ्या रक्तगटाचे रक्त देण्यात आले तर काय होईल ?
रक्त हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ते शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे पोहोचवते. साहजिकच आपले शरीर रक्ताशिवाय कार्य करू शकत नाही. तुमच्या लक्षात आलेच असेल की, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा सर्वप्रथम डॉक्टर रक्ततपासणी करण्यास सांगतात. वास्तविक, या चाचणीद्वारे आपल्या शरीरात काय समस्या आहे हे डॉक्टरांना कळू शकते. रक्त तपासणीच्या माध्यमातून आपल्या शरीरात कोणते घटक कमी-जास्त आहेत हेदेखील डॉक्टर शोधू शकतात.
,जेव्हा एखाद्या व्यक्तीला रक्ताची कमतरता असते तेव्हा डॉक्टर त्याला रक्त देतात; परंतु त्या व्यक्तीला त्याच प्रकारचे रक्त दिले जाणे आवश्यक आहे, जे त्याच्या शरीरात आधीच आहे. ‘ए’, ‘बी’, ‘एबी’ आणि ‘ओ’ असे वेगवेगळे रक्तगट आहेत. जर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या गटाचे रक्त दिले गेले तर त्याच्या शरीरात अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. रक्त अनेक प्रकारच्या पेशी आणि द्रवपदार्थाने बनलेले असते. या द्रवाला प्लाझ्मा म्हणतात. रक्तामध्ये लाल रक्तपेशी सर्वात जास्त प्रमाणात असतात.
…तर जिवावर बेतू शकते ?
■ जेव्हा एखाद्या आजारी व्यक्तीला रक्त चढवले जाते तेव्हा हे काम अत्यंत काळजीपूर्वक केले जाते. त्यात रक्ततपासणी करणे आणि रक्ताचा योग्य प्र- कार निवडणे खूप महत्त्वाचे आहे. चुकीचे रक्त चढवल्यास आजारी व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. रुग्णाच्या रक्तगटापेक्षा वेगळे रक्त दिले तर त्याच्या शरीराची मोठी हानी होऊ शकते.
■ कधीकधी योग्य रक्त संक्रमणानंतरही एखाद्या व्यक्तीला अॅलर्जी होऊ शकते. अॅलर्जीमुळे खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो; परंतु डॉक्टर प्रतिजैविकांच्या मदतीने ही परिस्थिती नियंत्रित करतात.
■ जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या रक्तगटाचे रक्त दिले जाते तेव्हा शरीर त्या रक्तातील अँटिजनला बाहेरून आलेला अँटिजन समजते आणि त्याच्या विरुद्ध प्रतिपिंड बनवते. या प्रतिपिंडांमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि परिस्थिती गंभीर होते. ताप, थंडी वाजून येणे, मळमळ, अंगदुखी यासारख्या सौम्य लक्षणांपासून ते अधिक गंभीर लक्षणे दिसू शकतात. मूत्रपिंड निकामी होणे, रक्तात गुठळ्या तयार होणे एवढेच नाही तर मृत्यूचा धोका वाढतो.
असा ठरतो रक्तगट
■ लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर ए आणि बी हे दोन मुख्य प्रकारचे अँटिजन असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या लाल रक्तपेशींमध्ये फक्त ‘ए’ अँटिजन असेल तर त्याचा रक्तगट ‘ए’ असेल. जर फक्त ‘बी’ अँटिजन असेल तर रक्तगट ‘बी’ असेल. जर दोन्ही अँटिजन असतील तर रक्तगट ‘एबी’ असेल आणि जर दोन्ही अँटिजन नसतील तर रक्तगट ‘ओ’ असेल.
