फिफा २०३० विश्वचषकाचे मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये संयुक्त आयोजन करण्यात येणार आहे. फुटबॉलच्या या महाकुंभसाठी जगभरातून लाखो फुटबॉलप्रेमी येतील. अशा परिस्थितीत, देशाला स्वच्छ आणि आकर्षक बनवण्यासाठी, मोरोक्को काही क्रूर पावले उचलत असून, त्याबद्दल त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. एका वृत्तानुसार, २०३० च्या फिफा विश्वचषकापूर्वी मोरोक्कोने किमान ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याची योजना तयार करून तिची अंमलबजावणीही सुरू केली आहे.
फुटबॉल विश्वचषकासाठी मोरोक्कोने शहरे फुटबॉल चाहत्यांसाठी अधिक आकर्षक बनवण्यासाठी स्वच्छता प्रक्रियेचा एक भाग म्हणून भटक्या श्वानांची कत्तल सुरू केली आहे. ही बातमी समोर आल्यापासून, त्याला प्राणी हक्क संघटना आणि आंतरराष्ट्रीय संघटनांकडून बरीच टीका सहन करावी लागत आहे.
३० लाख श्वानांना मारण्याच्या या निर्णयावर प्राणिप्रेमी संघटनांनी जोरदार टीका केली आहे. काही वृत्तांत असा दावाही केला आहे की, मोरोक्कोने देशभरात हजारो श्वानांना मारले आहे आणि विश्वचषक जवळ येताच ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरातील प्राणिप्रेमी संघटना संतप्त झाल्या आहेत.
हे विषारी रसायन घेत आहे श्वानांचा जीव
1) इंटरनॅशनल ॲनिमल कोएलिशनने भटक्या श्वानांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रूर पद्धतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांना स्ट्राइकिन नावाचे विषारी औषध दिले जात आहे. हे औषध सामान्यतः कीटकनाशक म्हणून वापरले जाते. भटक्या श्वानांना रस्त्यावरच गोळ्या घातल्या जात आहेत किंवा पकडून कत्तलखान्यात पाठवले जात आहे. गोळीबारातून वाचलेल्या श्वानांच्या डोक्यात फावडे घालून त्यांना मारले जात असल्याचेही सांगण्यात येते.
2) ‘डेली मेलमधील वृत्तानुसार, प्रसिद्ध प्राणी हक्क कार्यकर्त्या जेन गुडॉल यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशनकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच मोरोक्कोच्या क्रूर कृत्याकडे डोळेझाक केल्याचा आरोप केला. या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. २०२३ मध्ये फिफाने देशाला यजमानपद देण्याची घोषणा केल्यानंतर श्वानांच्या हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
३) प्राणी हक्क समर्थक आता फिफाशी संपर्क साधत आहेत आणि मोरोक्कोविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत. मोरोक्को किंवा फिफाने अद्याप या वादाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही हे विशेष.
