वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क

मूर्तिजापूर : येथील सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर या संस्थेचे सातवे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन मूर्तिजापूर येथे रविवार दि.९ ऑक्टोबर २०२२ ला सकाळी -९.००ते रात्री ८.०० पर्यंत, भक्तीधाम मंदिर सभागृह, भारतीय ज्ञानपीठ शाळेच्या मागे, समतानगर मूर्तिजापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. यासाठी मूर्तिजापूर येथे साहित्यीकांची मांदियाळी जमणार आहे. यामध्ये संमेलनाध्यक्ष म्हणून यवतमाळ येथील प्रसिद्ध साहित्यीक विनय मिरासे उपस्थित राहणार आहेत. तर उद्घाटक मूर्तिजापूर येथील प्रतिथयश समिक्षक डॉ. चिंतामण कांबळे तर स्वागताध्यक्ष म्हणून समाजसेवक रवी राठी उपस्थित राहतील. प्रमुख अतिथींमध्ये किरण अग्रवाल अकोला लोकमत आवृत्तीचे कार्यकारी संपादक, कथाकार सुरेश पाचकवडे, म.रा .सा.सं. मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, श्याम कोल्हाळे, प्रमोद उपाध्ये, रंजना तोंडरे तसेच राज्यभरातून कवी, कथाकार, समिक्षक, गझलकार अशी मराठी साहित्यातील नामवंत मंडळी कार्यक्रमामध्ये सहभागी होईल. संमेलनामध्ये उद्घाटन, पुस्तक प्रकाशन, वाटेवरती काचा ग! तृतीय पंथी व्यक्तीची भळभळतं जगणं उलगडणारी, संवेदनशील मुलाखत, प्रथमच साहित्य विचारपीठावर सादर होणार आहे. निमंत्रीत कवींच्या कवितांचे श्रवणीय कविसंमेलन, बहारदार गझल मुशायरा, शेती – मातीच्या व्यथेची उपायात्मक नोंद मराठी साहित्यात कितपत घेतल्या गेली? एक समयोचित परिसंवाद, व समारोप अशा साहित्यविषयक कार्य क्रमांची रेलचेल संमेलनात राहणार आहे.
तेव्हा रसिक श्रोत्यांनी संमेलनात सहभागी होऊन कार्यक्रमाचा अवश्य आस्वाद घ्यावा असे आवाहन सृजन साहित्य संघाव्दारा करण्यात आले आहे. असे प्रसिद्ध प्रमुख विनोद महल्ले कळवितात.