एनसीआरबीच्या अहवालात आकडेवारी प्रसिद्ध
वऱ्हाडवृत्त डिजिटल
गेल्या वर्षी देशात रस्ते अपघातांत सुमारे १.५५ लाख लोक मृत्युमुखी पडले असून, २०२० सालच्या तुलनेत हा आकडा जास्तीचा आहे, अशी माहिती रविवारी उजेडात आली आहे. देशात दररोज ४२६, तर दरतासाला १८ जण मरण पावले आहेत. ही आकडेवारी इतर वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. या आकडेवारीवरून देशात वाहन चालविणे आता दिवसेंदिवस धोकादायक बनल्याचे दिसून येत आहे.
‘राष्ट्रीय गुन्हे तपशील ब्युरो’ अर्थात ‘एनसीआरबी’ने ‘भारतातील अपघाती मृत्यू व आत्महत्या-२०२१’ या शीर्षकाखाली एक अहवाल सार्वजनिक केला. २०२१ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत रस्ते अपघातांत मरण पावणाऱ्यांची संख्या देशात १२ टक्क्यांनी वाढली आहे. २०२१ साली एकूण ४ लाख ३ हजार रस्ते अपघात झाले. यात १.५५ लाख लोकांना प्राण गमवावा लागला. याशिवाय ३.७१ लाख जण अपघाताचे शिकार होऊन जखमी झाले. २०२० साली कोरोना महामारीमुळे देशव्यापी लॉकडाऊन लागू असतानाही ३.५४ लाख रस्ते अपघातांत १.३३ लाख लोक मृत्यूच्या दाढेत ओढले गेले. याशिवाय ३.३५ लाख नागरिक अपघातांत जखमी झाले, अशी माहिती ‘एनसीआरबी’ने उजेडात आणली आहे. देशात सर्वाधिक ३३,७११ एवढे रस्ते अपघात एकट्या उत्तर प्रदेशात झाले. यात २१,७९२ जण ठार, तर १९,८१३ जण जखमी झाले आहेत. पंजाबमध्ये गतवर्षी ६,०९७ रस्ते दुर्घटना घडल्या व यात ४,५१६ जण मरण पावले. झारखंडमध्ये ४,७२८ रस्ते अपघातांत ३,५१३ जणांचा मृत्यू झाला, तर ३,२२७ जखमी झाले. देशात सर्वात कमी रस्ते अपघात ईशान्य भारतातील मिझोरममध्ये झाले. राज्यात २०२१ साली अवघे ६४ अपघातांत तेवढेच जण ठार झाले, तर २८ जण जखमी झाले, अशी माहिती ‘एनसीआरबी’ने दिली.