ऑस्ट्रेलियातील संशोधनातून धक्कादायक माहिती समोर; स्मरणशक्तीला घातक
कॅनबेरा : ‘हायनोटिलेक्सोमेनिया’ म्हणजे नाकात बोट घालण्याची सवय. कुणी नावे ठेवेल एवढेच म्हणून ही सवय वाईट नाही. या सवयीमुळे अल्झायमर, डिमेन्शिया होऊ शकतो, असे ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ विद्यापीठातील संशोधनातून समोर आले आहे. त्यासाठी उंदरांवर अध्ययन करण्यात आले. नाकावाटे बॅक्टेरिया उंदरांच्या मेंदूपर्यंत पोहोचले आणि त्यामुळे उंदराला अल्झायमर झाल्याचे समोर आले. क्लॅमीडिया न्यूमोनिया नावाचा ‘सायंटिफिक रिपोटर्स’ या विज्ञानविषयक मासिकामध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
‘अल्झायमर’ हा मेंदूशी संबंधित आजार आहे. त्यात स्मरणशक्ती कमकुवत होते किंवा संपूर्ण नष्ट होते. नाकात बोट घातल्याने बोटाच्या नखामुळे, अगर बोट जोरात फिरविल्यामुळे नाकाच्या आतील बाजूस हलकीशी जखम झाली तरी या जखमेमुळे मेंदूपर्यंत क्लॅमीडिया न्यूमोनिया हे जीवाणू पोहोचू शकतात. वास घेण्याची क्षमता त्यामुळे गमावली जाऊ शकते. अल्झायमरची ही सुरुवातही ठरू शकते. न्यूमोनियाही होऊ शकतो. स्टॅफिलोकोकस नावाचा बॅक्टेरियाही या सवयीने नाकावाटे शरीरात जाऊ शकतो, असे निष्कर्षही संशोधकांनी काढले आहेत.
सन २००० मध्ये नाकात बोट घालण्याच्या सवयीवर एक सर्वेक्षण भारतात झाले. नाकात बोट घातल्याने आनंद मिळतो, असे या सवयीमागचे कारण बहुतांश लोकांनी तेव्हा सांगितले होते. बंगळूरच्या गलोर येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस’चे डॉ. चित्तरंजन आणि बी. एस. श्रीहरी यांनी हा उपक्रम राबविला होता.
नाकातील केस उपयुक्त
नाकातील केस हवा गाळून आत पाठवितात. नाकातील केस धूलिकण, परागकण आणि हवेतील अॅलर्जीन फुफ्फुसात जाऊ देत नाहीत. नाकातील केस नाकातील म्यूकस मेंब्रेनला बाहेर येण्यापासून रोखतात. हे सारे आरोग्याला उपयुक्त असते. बोटांनी नाकातील केस उपटण्याची सवयही त्यामुळे घातक आहे.
नाकात बोट घालणे, ही नुसती वाईट सवय नाही. ते आरोग्याला अपायकारकही आहे.
– जेम्स सेंट जॉन, संशोधक, ग्रिफिथ विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया