वऱ्हाडी बोलीभाषेतील कथा
दुनियेत लोकं भन्नाट प्रकारचे हायेत. तोंडावर गोळ बोलूनं मांग कारल्यासारखे कळू बोलतात. बरं तेयले पच्चातापाच्या सयदात घोयलं तरी ति मातर फरक पळत नाही. बरं जेयले मदत केली थे त लैच भारी वागतात जस् काय तेयले लोकायनं मदत कराव हा तेयचा हक्क अन् मदत केल्यावर सारं ईसरून जानं हा तेयचा परमोधर्म. बरं काही लोकं त येगळ्याच परकारचे असतात मदत करतीनं बोटभर अन् आव आनतीनं हातभर केल्याची. तेयची मदत त कवाच घेवू नोय. कारनं आवळा देवूनं कवळं घेनारे लोकं या कलियुगात बंबाट भरेल हाय. काही लोकं त लयच अजब असतेत. तोंडात साखर अन् बगलीत खंजर. तुम्ही समोर असले की, गोय गोय गुयाच्या भेलीवानी बनतीनं अन् तीस-या ईषयी खराब बोलतीनं असे लोकं तुम्ही नसल्यावर चवथ्या मानसाजौळ तुमच्या ईषयी ईख ऊगयतीनं. काम सरो अन् वयीद मरो असे काही लोकं असतात. ‘व्यक्ती तेवळ्या प्रवृत्ती’ हे मराठीतली म्हन कायी खोटी नाही. असे लोकं ओयखने एक कला असते.
चला त अशीच एक अजबगझब कायनी घेऊन येतो तुमच्यासाठी.
आटपाट नगर होतं. नगराच नाव होतं सत्यशिलनगर . ह्या गावात खरं बोलन्याची पध्दत होती. जस शनिशिंगनापूरात घराघराले कवाळं नाहीत तस ह्या गावात कोनीच खोटं बोलत नसे. कारनही तसच होतं. पिडीदर पिडी लोकसमजूत होती की, जो कोनी खोटं बोलनं थो मानूस नाहीत बाई मुकी होयनं. माय कोबंडाईच देऊळ गावाच्या येशीवर होतं पन् थ्याची दहशत अवघ्या गावावर होती. म्हनूनसन्या ह्याच कारनानं बरेच लोकं ह्या गावचा सोयरा ना करे. कारन पोरगी खोटं बोल्ते. ह्या गावात देल्ली त मूकी होयनं . ह्याच गावात एक प्रभाकर नावाचा मानूस राह्ये. एक डाव थ्यानं ईचार केला. घरात बायको अन् बाप बोलू देत नाही अन् कामावर सावकार बोलू देत नाही. मंग खोटं बोलूनं मुकच होवू. असा ईचार त्यान केला.
प्रभाकर सावकारा जौळ गेला. ” भाऊ माह्या बैल मेला आता जोळीले दुसरा बैल घेतो. सातशे रूपये पाह्यजे होते. “
” बरं हे घे. “
पयल खोटं बोलल्यावर प्रभाकरले रातभर झोप आली नाही. कारन थ्याले वाटे आता आपन खोटं बोल्लो माय कोंबडाई मूकं करते आता. पन पायटी ऊटल्यावर थो बायकोले सहज हाका मारते त अवाज निंगते. थो लय हरकिजते. जोरजो-यात हासाले लागते. जोरजो-यात अळ्ळावते. त्याच पयलं खोटं पचल होतं.
” बाप्पा लान लेकरावानीच करूनं राह्यले अज कायी झोंबल काय? काय पिस् लागलं. “
प्रभाकरची बायको शेवंता नवऱ्याले म्हनते.
पन् प्रभाकर बायकोले कायीच सांगत नाही. आता प्रभाकर कोनाचा कापूस चोर, कोनाचा हरबरा ऊपट, कोनाचे कन्स मोळूनं आन, खयातलं धान चोरूनं आन, कोनाचं सरपन गायब कर अस करत होता. खोट बोलन्यात थो बीरबलाचाही बाप झाला झाला होता. चोरीमारी अन् खोट बोलूनं थ्याच्याजौळ बंबाट पैसा
जमा झाला होता. हप्त्यातूनं तीन खेपा थो तमाशे पाहाले जाये शेजीच्या बळ्ळावर जाय. बायको वाट पाहू पाहू थकूनं जाये. घरी आल्यावर थो अमक्या गावातला ढमका मेला टमका गेला असा थो सांगे. दिसमास लोटत होते. प्रभाकर खोट बोलन्यात अखिनच गब्बर अन् तरबेज होत होता. गावात कोनालेच कानोकान खबर नोती की, चोरी करून खोट प्रभाकर खोटा बोलते म्हनून.
एका रोजी पायटीच गावाच्या शेजीच असलेल्या सखाराम मोरेच्या वावरात प्रभाकर घुसते. वावर कापसानं पांड भक झालं असते. जस काय अभायचं मातीवर लोयनं घेवूनं राह्यलं. पायटीच जावूनं कापूस थो येचाले लागते. खंदाळी भरते. गाठोय बांदते. तेवढ्यात सखाराम वावरात चक्कर माराले येते. गाठोळ्याजौळ प्रभाकर ऊबा दिसते.
” काय बावा अज पायटीच कुकळे. “
सखाराम प्रभाकरले बोलते…
” कायी नाही माया वावरातूनं कापूस येचून आनला अन् गाठोयाची गाठ सुटली थे बांधत होतो. “
” बरं “
दिस मास साल लोटत होते. प्रभाकरचं खोटं बोलूनं लोकायले फसोनं कायी थांबत नोत. आता थो खोट अन् चोरीच्या बलबुत्यावर शिरीमंत होत होता.
एका रोजी नदीत थ्याले आंघोय कराची ईच्छा झाली. वाहत्या धारीत त्यानं ऊळी टाकली. थंन्डगार पानी होतं. बुचकया मारत होता. गुयन्या टाकत होता. जस् थ्यानं तोंड गुयनी कराले खोल्ल तसा डोकळा त्याच्या चिबीचा कुटका तोळूनं पयाला. प्रभाकरचं रगत भांबय झालं. आता त्याची वाचा गेली. काठावदरले कपळे घालूनं घरी आला. आता थो मुका झाला होता. त्याचे करम थ्याले आठोत होते. गावाचा नेम त्यानं तोळ्ळा होता. मनातूनं कोंबळादेवीले थो ईनवनी करत होता. ‘ हे कोंबळामाय मले माफ कर माह्यी चूक पदरात घे. मले बोलत कर.. आसवायच्या धारा त्याच्या थांबत नोत्या. बायकोले अन् अवघ्या गावाले कयलं होतं प्रभाकर मूका झाला म्हनूनसन्या.
लेखक : सु.पुं.अढाऊकर, अकोला , ९७६९२०२५९७