वृत्तसंस्था : भूतदया हा आपल्याकडे कळीचा शब्द आहे. ते उत्तमही आहे; पण ही भूतदयाही आता कायद्याच्या चौकटीत आलेली आहे. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणारेही कायद्याच्या कक्षेत आलेले आहेत. तुम्ही एखाद्या भटक्या कुत्र्याला खाऊ घालत असाल आणि तोच जर कुणाला नेमका चावला, तर कुत्र्याचे काही होणार नाही; पण तुम्हाला मात्र ६ महिन्यांचा कारावास भोगावा लागेल. दंड बसेल तो वेगळा!
तेव्हा विशेषतः रात्रपाळीनंतर कामावरून घरी परतताना कुत्र्यांसाठी खास बिस्किटाचे पाकीट वा आणखी अन्य काही सोबत घेत असाल, घरून निघताना या कुत्र्यांना भरवत असाल तर इथून पुढे कायद्याचे हात तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात, याचे भान ठेवा. भटकी कुत्री एक मोठी समस्या आहे. पूर्वी संख्या वाढली म्हणजे पालिकेचे लोक गुपचूप येऊन विषारी पेढे भरवून ती आटोक्यात आणत असत; पण पेटासह तत्कालीन केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी भटक्या कुत्र्यांना प्रदान केलेल्या कायदेशीर सुरक्षा कवचामुळे ते बंद झाले.
नसबंदीची शस्त्रक्रिया हा पर्याय मग राबविला जाऊ लागला; पण तो परवडत नाही. सबब भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चाललेली आहे. श्वानदंशाचे प्रकार व प्रमाणही वाढलेले आहे. आता कायद्यानेच आणखी एक नवा पर्याय या समस्येवरील उपाय म्हणून समोर आणलेला आहे.
भारतीय न्याय संहिता सेक्शन २९१ भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन २९१९ नुसार भटक्या कुत्र्याला कुणी खाऊ घालेल तो त्या कुत्र्याचा मालक मानला जाईल व श्वानदंशाला जबाबदार धरला जाईल. गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला ६ महिने कारावास व दंडही होईल. कोण बघतंय म्हणू नका. सीसीटीव्ही कॅमेरे हल्ली कुठेही असतात.