अ. भा. मराठी साहित्य महामंडळ निवड समितीकडून स्थळाची पाहणी
नवी दिल्ली: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या मराठी संमेलनासाठी स्थळ निवड समितीने गुरुवार, १ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील नियोजित स्थळाची पाहणी केली. देशाची राजधानी नवी दिल्ली येथील सरहद्द संस्थेतर्फे संमेलनासाठी निमंत्रण आल्याने महामंडळ सदस्यांनी इचलकरंजी येथे भेट दिल्यानंतर सरहद्द संस्थेच्या प्रस्तावाप्रमाणे गुरुवारी शहरातील इंडिया इंटरनॅशनल संस्था सभागृह तसेच तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे भेट दिली.
फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात संमेलन घेतल्यास उत्तम वातावरण असेल, असे सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी सांगितले. कमीत कमी चार ते पाच हजार साहित्यप्रेमी हजर राहतील, असा अंदाज व्यक्त केला. महाराष्ट्र सदन, जैन भवन, महाराष्ट्र भवन वेस्टर्न कोर्ट, संत नामदेव भवन येथे सुमारे दीड हजार लोकांना वरील ठिकाणी राहण्याची सोय करता येणार असल्याचे सांगितले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व स्थळे महामंडळ सदस्यांना दाखवली. त्यानंतर एक बैठक घेण्यात आली. यावेळी महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. उषा तांबे, उपाध्यक्ष गुरय्या रे. स्वामी, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, सदस्य प्रदीप दाते, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. सुनीता राजे पवार निमंत्रक संस्थेतर्फे संजय नहार, विजय नाईक, अतुल जैन, भारताचे माजी उच्चायुक्त व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे, शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे, आनंद पाटील, श्रीराम जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यानंतर मुंबई येथील वांद्रा लायब्ररी यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार शनिवारी पाहणी करण्यात येणार आहे.